अंबानगरीत रंगला अश्‍व रिंगण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

अंबाजोगाई - शहरातील योगेश्‍वरी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (ता. तीन) सायंकाळी पाच पालख्या एकत्रित आल्या. त्यांतील वारकऱ्यांनी गोल रिंगण करून अश्‍व फिरविले. या रिंगण सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी कुस्त्यांसह इतर खेळ आणि कसरती सादर केल्या. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी अंबाजोगाईकरांची गर्दी उसळली होती.

अंबाजोगाई - शहरातील योगेश्‍वरी महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (ता. तीन) सायंकाळी पाच पालख्या एकत्रित आल्या. त्यांतील वारकऱ्यांनी गोल रिंगण करून अश्‍व फिरविले. या रिंगण सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी कुस्त्यांसह इतर खेळ आणि कसरती सादर केल्या. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी अंबाजोगाईकरांची गर्दी उसळली होती.

मागील चार वर्षांपासून मराठवाड्यातीला हा एकमेव रिंगण सोहळा येथे होतो. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नरसी नामदेव (जि. नांदेड), अकोट येथील तिरुपती बालाजी दिंडी, कोंडूर (जि. हिंगोली) येथील संत विठोबा, गणोरी (जि. अमरावती) येथील महंमद खान महाराज व अकोला येथील भाऊसागर माऊली अशा पाच पालख्यांचे वाजतगाजत योगेश्‍वरी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले. या वेळी मैदानावर वारकऱ्यांचा भगवा ध्वज फडकावण्यात आला. उपस्थित वारकऱ्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, दिलीप सांगळे, अंकुशराव काळदाते, मारुतीराव रेड्डी, सुधाकर महाराज शिंदे, बाबा महाराज जवळगावकर, उद्धवराव आपेगावकर, जयकुमार लोढा, डॉ. नरेंद्र काळे, वैजनाथ देशमुख, श्रीरंग सुरवसे, दिलीप गित्ते, नागेश औताडे, अनंत आरसुडे, बळीराम चोपणे, विनोद मुंदडा, सुनील मुथ्था, नूर पटेल आदींनी केले. पालखीतील पादुका व अश्‍वपूजन करून या रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला. टाळ, मृदंगाच्या तालात ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. विविध फुलांनी सजविलेला अश्‍व रिंगणात उतरविण्यात आला. वारकऱ्यांच्या साथीने गोल रिंगणात अश्‍व वेगात धावत असतानाचे दृश्‍य डोळ्यास साठविण्यासाठी अंबाजोगाईकरांनी मोठी गर्दी केली. या रिंगणातच महिला वारकऱ्यांच्या फुगड्या, ज्येष्ठ वारकऱ्यांच्या कुस्त्यांचे खेळही रंगले होते. काही वारकऱ्यांनी संत ज्ञानोबा माऊलींनी चालविलेल्या भिंतीचाही केलेला मनोरा उपस्थितांचे आकर्षण ठरला.

अभंगवाणी रंगली
या अश्‍व रिंगण सोहळ्यानिमित्त सुभाष शेप यांच्या अभंगवाणीचाही कार्यक्रम झाला. श्री. शेप यांनी सादर केलेल्या रचनांनी या वेळी उपस्थित भाविकांना भक्‍तिरसात चिंब भिजविले. या वेळी उपस्थित वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व फराळाची सोयही स्वागत समितीतर्फे करण्यात आली होती.