बीडमध्ये राष्ट्रवादीच; व्यथित पंकजा मुंडेंचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सगळं काही करुनही जनतेने असा कौल का दिला, याचे विश्‍लेषण आत्ताच करता येणार नाही. मात्र हा पराभव स्वीकारत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवेन...

बीड - परळी येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या धक्कादायक निकालांनंतर व्यथित झालेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (गुरुवार) राजीनामा देण्याची घोषणा केली.

पंकजा यांचे चुलत बंधु धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने परळी विधानसभा मतदारसंघामधील जिल्हा परिषदांमध्ये जोरदार मुसंडी मारत पंकजा यांना पूर्ण पराभूत केले आहे. याआधी, बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही धनंजय यांनी राष्ट्रवादीचेच वर्चस्व दाखवून दिले होते. "सगळं काही करुनही जनतेने असा कौल का दिला, याचे विश्‍लेषण आत्ताच करता येणार नाही. मात्र हा पराभव स्वीकारत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवेन,' असे पंकजा यांनी घोषित केले आहे.

दरम्यान सहानुभूतीचे राजकारण दरवेळी चलत नसते, असा टोला विजयी धनंजय यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटूंबामधील राजकीय वाद नव्या प्रखरतेने उफाळून वर आला होता. या पार्श्‍वभूमीवर पंकजा यांच्या जिल्ह्यातील राजकीय प्रभावास धनंजय यांनी यशस्वीरित्या सुरुंग लावल्याचेच या ताज्या निकालांमधून दिसून आले आहे

जनतेच्या मनातील नायक कोण, याचे उत्तर परळीतील जनतेचेच दिले आहे. हा विजय म्हणजे आमच्या कामांची पावती. सहानुभूतीचे राजकारण प्रत्येक वेळी नसते

-  धनंजय मुंडे