परळीतील संच क्रमांक आठमधून वीजनिर्मिती सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

परळी वैजनाथ - सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च करून येथे उभारण्यात आलेल्या 250 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेच्या संच क्रमांक आठमधून तब्बल साडेसात वर्षांनंतर सोमवारी (ता. दहा) मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरवात झाली आहे. सध्या हा संच 80 मेगावॉट क्षमतेने वीजनिर्मिती करत आहे.

परळी वैजनाथ - सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च करून येथे उभारण्यात आलेल्या 250 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेच्या संच क्रमांक आठमधून तब्बल साडेसात वर्षांनंतर सोमवारी (ता. दहा) मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरवात झाली आहे. सध्या हा संच 80 मेगावॉट क्षमतेने वीजनिर्मिती करत आहे.

या संचातून वीजनिर्मितीची प्रक्रिया यशस्वी सुरू झाल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचारी, कामगारांनी आनंद व्यक्‍त केला आहे.

राज्यातील विजेची गरज भागविण्यासाठी यापूर्वीच्या तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा विस्तार करण्यासाठी पुढाकार घेतला. येथे 30 मेगावॉट क्षमतेचे दोन, 210 मेगावॉट क्षमतेचे तीन असे एकूण पाच वीजनिर्मिती संच कार्यान्वित होते. त्यानंतर परळी-गंगाखेड मार्गावर दाऊतपूर शिवारात 239 हेक्‍टर शेतजमिनीवर जानेवारी 2004 ला 250 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक सहाच्या उभारणीला सुरवात झाली. या संचाला जोडूनच तेवढ्याच क्षमतेचा संच क्रमांक सातही उभारण्यात आला. या संचातून ऑक्‍टोबर 2009 मध्ये प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली. याच दरम्यान ऑगस्ट 2009 मध्ये संच क्रमांक सहा व सातला लागूनच 250 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या संच क्रमांक आठच्या उभारणीच्या कामाला वीजनिर्मिती कंपनीने सुरवात केली. सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. 2009 पासून या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. 2017 उजाडूनही म्हणजेच साडेसात वर्षे उलटूनही अद्याप या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरवात झाली नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून वीजनिर्मितीच्या चाचण्या घेतल्या जात होत्या; परंतु अपुरे राहिलेले काम, होणारा तांत्रिक बिघाड अशा कारणांमुळे वीजनिर्मिती या संचातून होऊ शकली नव्हती.

गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात संच क्रमांक आठमधून प्रत्यक्ष वीजनिर्मितीची चाचणी घेण्यात आली. चाचणी घेऊनही अद्याप हा प्रकल्प सुरू झाला नव्हता. अखेर सोमवारी (ता. दहा) मध्यरात्रीनंतर या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीजनिर्मितीला सुरवात झाली. गेल्या वीस तासांपासून या संचातून सुरळीत वीजनिर्मिती सुरू असून 80 ते 90 मेगावॉट क्षमतेने हा प्रकल्प चालवला जात आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे राज्यातील विजेची गरज भागण्यास मदत होणार आहे.

परळी येथील वीजनिर्मिती केंद्रातील संचाची संख्या आठ व क्षमता 1440 मेगावॉट होणार असली तरी या संचातील संच क्रमांक एक, दोन कायमस्वरूपी बंद केले गेले आहेत. संच क्रमांक तीनही बंदच आहे. 210 मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक चार व पाच पाणी व कोळसा या कारणामुळे बंद आहेत. सध्या केवळ 250 मेगावॉट क्षमतेचे सहा, सात व आठ हे तीनच संच सुरू आहेत.