बंड शमविण्यासाठी बैठकांवर जोर 

कैलास चव्हाण 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

परभणी - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. बंड शमविण्यासाठी बुधवारी (ता. एक) रात्रभर बैठकांचा जोर सुरू होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष म्हणून तर कुणी अन्य पक्षाचा झेंडा ऐनवेळी हाती घेत स्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करून पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील जिल्ह्यातील नेते मंडळी या नाराजी नाट्याने हतबल झाली असून नाना तऱ्हांनी बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी सरसावली आहेत.

परभणी - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. बंड शमविण्यासाठी बुधवारी (ता. एक) रात्रभर बैठकांचा जोर सुरू होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अपक्ष म्हणून तर कुणी अन्य पक्षाचा झेंडा ऐनवेळी हाती घेत स्वपक्षीय उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करून पक्षालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील जिल्ह्यातील नेते मंडळी या नाराजी नाट्याने हतबल झाली असून नाना तऱ्हांनी बंडखोरांची नाराजी दूर करण्यासाठी सरसावली आहेत. दरम्यान, पक्षाअंतर्गत तडजोडी आणि प्रस्थापितांच्या कुटुंब प्रेमामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी गेल्याने बंडखोरांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात निवडणुक रणधुमाळीत वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळत आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्षांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारांची ही संख्या 515 च्या घरात गेली आहे. काही पक्षांचे शेवटच्या क्षणी उमेदवार निश्‍चित करण्यात आले. अनेकांना शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवूनही उमेदवारी न मिळाल्याने नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. काहींनी शेवटच्या दिवशी अन्य पक्षांशी संपर्क साधून उमेदवारी मिळण्यात यश मिळविल्याने चुरस वाढली आहे. जिल्ह्यात अंतर्गत तडजोडीच्या राजकारणाने कळस गाठत निष्ठावंतांना नाइलाजाने बंडखोरी करण्यास भाग पाडले आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांना धोबीपछाड देण्याची खेळी मातब्बरांकडून खेळली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीतल्या तडजोडीच्या खेळात हे नेते आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेत असल्याचे बोललते जात आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या जुन्या समर्थकांना पुन्हा झेडपीच्या माध्यमातून चर्चेत आणले गेले आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता वरपुडकरांच्या संगतीने कॉंग्रेसमय झालेल्या झेडपीच्या माजी पदाधिकारी, सदस्यांना यावेळेस उमेदवारी मिळाली. तिकीट वाटपावर वरपुडकर यांचाच दबदबा असल्याचे अखेरच्या दिवशी दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक तालुक्‍यातील नेत्याला तिकीट वाटपाचे अधिकार दिले होते; तरीही आमदार विजय भाबंळे, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे आणि खुद्द जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या शिफारशींशिवाय तिकीट वाटप झाले नाही, हेही तितकेच खरे. सर्वाधिक बंडखोरी गंगाखेड मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीच्या काहींनी ऐन निवडणुकीत पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. शिवसेनेत खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड यांनी आपआपल्या समर्थकांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला आहे; तरीही याही पक्षातील नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवार मिळविताना दमछाक झाली. त्यामुळे त्यांनी काही आयात उमेदवारांचा भरणा केल्याचे बोलले जात आहे. 

घराणेशाहीचा बोलबाला 
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या नव्या पिढीने पाऊल टाकले आहे. कुणी पहिल्यांदाच तर कुणी दुसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार यांचे नातू, पुत्र, सून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अशा काही गटांच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे.

Web Title: parbhani zp