लातूर - कानपटीवर बंदूक लाऊन फेसबूकवर फोटो पडला महागात

facebook
facebook

लातूर - कानपटीवर रिव्हॉल्वर लाऊन काढलेला फोटो फेसबुकवर टाकला. सिनेस्टाईल करत केलेली ही नसती उठाठेव एका शस्त्र परवानाधारकाच्या अंगलट आली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या व्यक्तीचा शस्त्र परवाना रद्द करून त्याच्याकडील शस्त्र काडतुसासह जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. प्रवीण पंडीतराव गादेवार (रा. अहमदपूर) असे या शस्त्र परवानाधारक व्यक्तीचे नाव आहे.

सन 2006 पासून श्री. गादेवार यांच्याकडे अधिकृत शस्त्र परवाना आहे. मागील महिन्यात त्यांनी स्वतःकडील रिव्हॉल्वर स्वतःच्या कानपटीवर ठेऊन मोबाईलवर फोटो काढला. हा फोटो त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला. सोशल मिडियावर त्याची चर्चा घडून आली. याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांना कळाली. त्यांनाही हा फोटो सोशल मिडियावरून मिळाला. याची गंभीर दखल घेऊन त्यांनी गादेवार यांना अधिकृत शस्त्राचा गैरवापर केल्याप्रकरणी नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले. त्यावर गादेवार यांनी फोटो काढल्याचे मान्य करून चुकून फोटो फेसबुकवर पडल्याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे केला. त्यावरून श्रीकांत यांनी गादेवार यांना अधिकृत परवान्याद्वारे घेतलेल्या शस्त्राचा आक्षेपार्ह अवस्थेत फोटो काढून फेसबुकवर प्रसारित करण्यासह शस्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याप्रकरणी दोषी धरले. त्यानंतर शस्त्र नियम 2016 मधील तरतुदीनुसार गादेवार यांचा परवाना रद्द केला आहे. त्यांच्याकडील शस्त्र व सर्व शिल्लक काडतुसे तत्काळ जप्त करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदपूरच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

आणखी तीन परवाने रद्द
कायद्यातील नवीन तरतुदीनुसार जिल्हाधिकारी श्रीकांत हे शस्त्र परवानाधारकांची नव्याने पडताळणी करून त्यांच्या शस्त्र परवान्याचे नुतनीकरण करत आहेत. मागील काही महिन्यात त्यांनी तब्बल तीनशे शस्त्र परवानाधारकांची पडताळणी केली. यात पोलिसांत गुन्हे दाखल असणे, शस्त्राची गरज नसणे व शारिरीक क्षमता (वयोवृद्ध) नसणे आदी कारणांमुळे त्यांनी पहिल्या टप्प्यात आठ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले. दुसऱ्या टप्प्यात याच कारणांवरून तिघांचे परवाने रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com