हृदयविकाराने पोलिस जमादाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - कायम विनाअनुदानित शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर मुंबईतील पोलिस जमादाराचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी जामा मशीद चौकात (ता. चार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. राहुल प्रकाश कांबळे, असे जमादाराचे नाव आहे. ते लोहमार्ग पोलिस दलात कार्यरत होते.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईतून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. यात मुंबई येथील लोहमार्ग पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन दिवसांपूर्वी हे पथक शहरात आले होते. यात राहुल प्रकाश कांबळे (वय- ५०, रा. बीडीडी चाळ, वरळी, मुंबई) यांचा समावेश होता.

जामा मशीद चौकात ते बंदोबस्तावर होते. शिक्षक मोर्चेकरी व पोलिस यांच्यात वाद सुरू होता. यानंतर लाठीमार, मोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर काही वेळातच राहुल कांबळे यांच्या छातीत कळ येऊन त्यांना श्‍वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला. ते खाली कोसळत असताना तेथे उपस्थित पोलिस, अन्य प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धावपळ करून त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून घाटीत उपचारासाठी दाखल केले.

अतिदक्षता विभागात कांबळे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. दरम्यान, घाटीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे यांनी धाव घेतली. कांबळे यांचा मृतदेह मुंबई येथे हलविण्यात आला.

बंदोबस्तावरच गमावला जीव
अतिताण व दोन दिवसांपासूनची गस्त राहुल कांबळे करीत होते. त्यांचा बंदोबस्तावर असतानाच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिस धास्तावले. त्यांनी घाटीत धाव घेतली. बंदोबस्तावरच कांबळे यांचा मृत्यू झाल्याने पोलिस विभागात हळहळ व्यक्त झाली.

आज अर्ध्यावर झेंडा उतरवणार
लाठीहल्ल्यानंतर धावपळीमुळे बंदोबस्तावरील पोलिस जमादार राहुल कांबळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यामुळे बुधवारी (ता. पाच) औरंगाबाद पोलिस आयुक्तालय व राहुल कांबळे कार्यरत असलेले कार्यालय येथे पोलिस विभागाचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे.

बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच झेंडा उतरवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. पोलिस आयुक्तालयात दुपारी पावणेबारा वाजता औरंगाबाद पोलिस विभागातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Web Title: police death by heart attack