पोलिस कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

खुलताबाद येथील घटना : गुन्हा दाखल

पत्नी माहेरी गेल्याने सुधाकर कोळी हा घरी एकटाच होता. त्याने या अल्पवयीन मुलीस घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला.

खुलताबाद : खुलताबाद पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत सुधाकर मगन कोळी या पोलिस कर्मचाऱ्याने शहरातील लहानी आळीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी (ता.16) रात्री घडली.

याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी (ता.17) दिलेल्या तक्रारीवरून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर कोळी हा लहानी आळीत राहतो. पत्नी माहेरी गेल्याने तो घरी एकटाच होता. त्याने या अल्पवयीन मुलीस घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. त्याच वेळी रात्री पीडित मुलीचे वडील घरी आले असता त्यांना मुलगी घरी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तरी ती न सापडल्याने त्यांनी खुलताबाद पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी त्यांना तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा विचार बदलला व ते घरी आले असता मुलगी घरी आल्याचे दिसले. त्यांनी सकाळी मुलीला विश्‍वासात घेऊन एवढ्या रात्री कुठे गेली होती, याबाबत विचारणा केली असता मुलीने झालेला प्रकार वडिलांना सांगितला. सदर पोलिसाने आपल्यावर अतिप्रसंग केला व याबाबत कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले.

पीडित मुलीच्या वडिलांनी गुरुवारी (ता.17) सकाळीच खुलताबाद पोलिस ठाणे गाठून सदर पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यावरून पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.