महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

लातूर - महावितरणमधील वर्ग तीन व चार संवर्गातील लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येत्या 1 एप्रिलपासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभाशिवाय आपल्या पाल्यांना नोकरी देण्याचा पर्याय महावितरणने खुला ठेवला आहे. 

लातूर - महावितरणमधील वर्ग तीन व चार संवर्गातील लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ आदी पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येत्या 1 एप्रिलपासून मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभाशिवाय आपल्या पाल्यांना नोकरी देण्याचा पर्याय महावितरणने खुला ठेवला आहे. 

आजारपण व अपघातासह अन्य कारणांमुळे काम न करू शकणाऱ्या व वय वाढलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. यात वर्ग तीन संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी 45 ते 53 वर्ष, तर वर्ग चारसाठी 45 ते 55 वर्ष वयाची मर्यादा आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना "दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही', असे जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे. योजनेत आर्थिक लाभ किंवा पाल्यासाठी नोकरी, यापैकी एक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यात विद्युत सहायक या पदावर पाल्यांना नोकरी मिळणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना पाल्यांची शैक्षणिक माहिती अर्जात देणे आवश्‍यक आहे. यासाठी पाल्य दहावी किंवा बारावीसोबत महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळाचा इलेक्‍ट्रिकल किंवा वायरमनचा आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. पाल्यांना नोकरी देण्याची इच्छा नसलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेत सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी 35, तर विहित सेवानिवृत्तीपूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी 25 दिवसांचा पगार अशा सूत्रानुसार आर्थिक लाभ मिळणार आहे. हा लाभ पंधरा लाख रुपयांपर्यंतच असणार आहे. आर्थिक लाभाऐवजी पाल्याच्या नोकरीचा पर्याय दिल्यानंतर आयटीआयचा अभ्यासक्रम उत्तीर्ण नसलेल्या पाल्यांना तो पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली जाणार आहे. अशा उमेदवारांना सुरवातीला तीन वर्षांच्या कंत्राटाच्या कालावधीत दरमहा सात हजार पाचशे एकत्रित वेतन मिळणार आहे. अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना "विद्युत सहायक' या पदावर नियुक्ती देऊन त्यानंतर पहिल्या वर्षी दरमहा सात हजार पाचशे रुपये, दुसऱ्या वर्षासाठी दरमहा आठ हजार पाचशे रुपये, तर तिसऱ्या वर्षासाठी दरमहा साडेनऊ हजार रुपये एकत्रित वेतन मिळणार आहे. 

नोकरीत समावून घेणार 
जागेच्या उपलब्धतेनुसार अर्हताप्राप्त पाल्यांना "तंत्रज्ञ या पदावर नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. तीन वर्षांत आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण करू न शकणाऱ्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणाऱ्या एकूण रकमेतून वजा करून उर्वरित रक्कम संबंधित कर्मचाऱ्यास अदा करण्यात येणार आहे. या रकमेवर व्याज देण्यात येणार नाही किंवा कर्मचाऱ्यास पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात येणार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या नोकरीसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष (मागास उमेदवारासाठी 5 वर्ष शिथिल) असून कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरदरम्यान या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

Web Title: Pre-retirement plans for MSEB employees