समस्या सोडविणाराच होतो यशस्वी उद्योजक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपला जुना काळ विसरू नये. मी फक्त यशाकडे बघतो आणि अजूनही मला यशस्वी व्हायचे आहे. व्यवसाय करताना कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते. उद्योगात उडी घेताना घाबरू नका. सकारात्मक विचार करा. एकदा उडी मारणे शिकाच. टेन्शन येईल, समस्या येतील. मात्र, जो समस्या सोडवू शकतो तोच यशस्वी उद्योजक होऊ शकतो, असा मोलाचा सल्ला प्रख्यात उद्योजक, "मसाला किंग‘ डॉ. धनंजय दातार यांनी तरुण उद्योजकांना दिला. 

औरंगाबाद - माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपला जुना काळ विसरू नये. मी फक्त यशाकडे बघतो आणि अजूनही मला यशस्वी व्हायचे आहे. व्यवसाय करताना कोणतेही काम चांगले किंवा वाईट नसते. उद्योगात उडी घेताना घाबरू नका. सकारात्मक विचार करा. एकदा उडी मारणे शिकाच. टेन्शन येईल, समस्या येतील. मात्र, जो समस्या सोडवू शकतो तोच यशस्वी उद्योजक होऊ शकतो, असा मोलाचा सल्ला प्रख्यात उद्योजक, "मसाला किंग‘ डॉ. धनंजय दातार यांनी तरुण उद्योजकांना दिला. 

 
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्रतर्फे बीड बायपासवरील गुरू लॉन्स येथे आयोजित राज्यस्तरीय दोनदिवसीय ब्रह्मोद्योग प्रदर्शन आणि ब्राह्मण उद्योजक संमेलनात झालेल्या परिसंवादात जागतिक कीर्तीचे उद्योजक डॉ. धनंजय दातार यांनी अतिशय परखड आणि नेमकेपणाने आपला जीवनप्रवास उलगडत तरुणांना यशाची गुपितेही सांगितली. प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. 

"अल अदिल‘ या नावाने आखाती देशात आपली तब्बल 33 आऊटलेट्‌स, दोन पिठाच्या गिरण्या व 2 मसाला फॅक्‍टरी चालविणारे श्री. दातार यांनी आपली यशाची वाटचाल, त्यासाठी करावे लागलेले प्रयत्न, कष्ट, गरिबी, संघर्ष अशा अनेक अंगांनी फुलवत नेली. आपण अनेक गोष्टी अनुभवातूनच शिकतो. मात्र, प्रत्येक अनुभवाला धैर्याने सामोरे जाण्याची आपली तयारी हवी, असे ते म्हणाले. 

अकोला येथील मूळ रहिवासी असलेले श्री. दातार यांचे लहानपण अतिशय गरिबीत गेले. ते म्हणाले, की शाळेत जाताना पायात चप्पल नसायची. फाटके कपडे असायचे. पाऊस आल्यावर शाळेत घोंगडी घेऊन जायचो. दुपारी वरण-चपाती मिळत होती. रात्री दही-चपाती मिळायची, त्यात साखर मात्र नसायची. यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी दुबईला गेलो. तेथे वडील जॉबला होते. त्यांचा करार संपल्यानंतर त्यांनी तेथे दुकान सुरू केले. 16-16 तास तेथे काम करत होतो. माझे वजन पन्नास किलोही नसताना मी पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाची पोती उचलत होतो. झाडू मारायचो, फरशी पुसायचो, गोडाऊनमध्ये वास्तव्य केले. कुठल्याही कामाची मी कधीही लाज बाळगली नाही. मात्र, मनात मोठा होण्याची इच्छा होती. एक दिवस मी मोठे होऊनच दाखविणार, अशी जिद्द होती. मी फक्त यशाकडे बघत होतो आणि आजही यशाकडेच बघतो. पैसा आहे म्हणून लोक बोलतात. श्रीमंताने फाटकी जीन्स घातली तर ती फॅशन आणि गरिबाने घातली तर ती फाटकी. शेवटी माणूसच; मात्र फरक पैशांचा येतो. त्यामुळे माणसाने आपला जुना काळ विसरू नये. 

 

शिक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले, की माणसाला एवढे शिक्षण हवे की त्याला फक्त नोटा मोजता आल्या पाहिजेत. आकडे कळाले पाहिजेत. मी दहावीत गणितात पाचवेळा नापास झालो. तिकडेही अनेक कमी शिकलेले लोक जिद्द, मेहनतीच्या जोरावर मोठे उद्योजक बनले आहेत. 

 
व्यवहारज्ञान, धाडस, सारासार विवेकबुद्धी आणि "मौका देखकर चौका मारणे‘ जमायला हवे. इंग्रजी भाषेचे अकारण स्तोम माजवू नका. ती येत नसेल तरी काही बिघडत नाही. "दिमाग मेरा, पैसा तुम्हारा‘ हे सूत्र सांगत त्यांनी स्वतःच्या पैशाने व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला. बॅंकांकडून कर्ज काढा, त्यांचे हप्ते व्यवस्थित फेडा, स्वतःची पत निर्माण करा, असा सल्लाही त्यांनी दिला. धंद्यातून पैसा, नफा मिळविणे हे ध्येय असले तरी स्वतःच्या आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. मिळविलेल्या पैशाचा चांगला उपभोगही घ्या, असेही त्यांनी नमूद केले. 

व्यवसाय करताना कोणतेही काम लहान नसते हे पक्के लक्षात असू द्या. "मार, नाही तर मर‘ अशी तीव्र स्पर्धा असताना तिला धैर्याने सामोरे जा, जितक्‍या स्पर्धेला सामोरे जाल तितके मोठे व्हाल. सर्वच अंगांनी संपन्न व्हाल. समस्या येतच असतात. त्या सोडवून पुढे जायला हवे. आव्हाने असली की मनात जिद्द निर्माण होते. त्यामुळे माझ्यापेक्षाही मोठे होऊन दाखवा हे माझे तुम्हाला आव्हान आहे, असे श्रोत्यांना उद्देशून श्री. दातार यांनी म्हटले आणि आपल्या मनोगताचा समारोप केला.
 

आई-वडिलांचा वाटा मोठा
आई-वडील, पत्नी यांचा आपल्या यशामध्ये खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. व्यवसायात सुरवातीला दागिने विकले. आईचे मंगळसूत्र विकले. दुबईत व्यवसायात पैसे लावले. "मौका देखकर चौका मारणे‘ आयुष्यात शिकलो. उद्योगात नफा झाला. हे सर्व करताना मला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, जेव्हा मी आईला तिचे मंगळसूत्र परत आणून दिले तेव्हा तिने माझ्या गालावरून फिरविलेला हात हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे, असे श्री. दातार यांनी नमूद केले.
 

धनंजय दातार म्हणतात...
""आपल्याला मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मनात सतत असायला हवी. स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जीवापाड कष्ट करण्याची तयारी हवी.‘‘
 

""माणसाने आपला जुना काळ विसरू नये. ग्राहक आपल्यासाठी देव आहे. त्यामुळे पैसा आला म्हणून स्वतःला अतिशहाणे, अतिहुशार समजू नका.‘‘
 

""श्रीमंताने फाटकी जीन्स घातली तर ती फॅशन आणि गरिबाने घातली तर ती फाटकी. शेवटी माणूसच; मात्र फरक पैशांचा येतो.‘‘
 

""व्यवहारज्ञान, धाडस, सारासार विवेकबुद्धी आणि "मौका देखकर चौका मारणे‘ जमायला हवे.‘‘