रस्त्यांच्या ७३ कामांवर मजूरच नसल्याचे उघड

रस्त्यांच्या ७३ कामांवर मजूरच नसल्याचे उघड

अंबाजोगाईतील मनरेगा कामातील नफेखोरी चव्हाट्यावर, मस्टरवर ११ हजार मजूर; प्रत्यक्ष कामावर एकही नाही
बीड - बेरोजगारांसह मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने रोजगार हमी कायदा करीत मनरेगातून मजुरांना कामाची हमी दिली; परंतु मनरेगाअंतर्गत कागदावरच मजूरसंख्या दाखवून कसा निधी लाटला जातो, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्‍यातील रस्त्यांच्या ७३ कामांना अधिकाऱ्यांनी दिलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’मधून आला आहे. मनरेगाच्या संकेतस्थळावर अंबाजोगाई तालुक्‍यात ७३ रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दाखवून त्यावर तब्बल ११ हजार मजूर काम करीत असल्याचे दाखविले जात होते. मात्र प्रत्यक्षात कामावर एकाही ठिकाणी तपासणी पथकाला मजूरच आढळला नाही. हा धक्कादायक प्रकार पाहून तपासणी पथकही चक्रावून गेले.

अंबाजोगाई तालुक्‍यात गत महिन्यात एकाच वेळी ७३ रस्त्यांची कामे सुरू केल्याचे दाखविण्यात आले. त्यानुसार मनरेगा संकेतस्थळावर मजुरांची नोंदही घेण्यास सुरवात झाली. गत महिन्यातील १३ एप्रिलच्या नोंदीनुसार मनरेगाअंतर्गत ७३ रस्त्यांच्या कामांवर सुमारे ११ हजार मजूर राबत असल्याची नोंद घेण्यात आली. परंतु एकाच वेळी ७३ रस्त्यांची कामे सुरू झाली म्हणजे एकाच वेळी मजुरांनी कामाची मागणी कशी काय केली?, अशी शंका रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना आल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दक्षता पथक, गटविकास अधिकारी, नरेगा तसेच तहसील कार्यालयाच्या पथकामार्फत अचानक तपासणी केली, तालुक्‍यातील ७३ रस्त्यांपैकी एकाही ठिकाणी मजूर उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. सर्वच कामे केवळ संकेतस्थळावरच सुरू असल्याची नोंद घेतली जात असल्याचे या भेटीदरम्यान आढळून आले. 

मनरेगाची बहुतांश कामे ही मजुरांऐवजी प्रत्यक्षात यंत्राद्वारेच उरकण्यावर कंत्राटदारांचा अथवा स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भर असतो. मनरेगा कामांवर कागदी घोडे नाचविण्याचा हा प्रकार सर्रास सुरू आहे; परंतु एकाच वेळी ७३ रस्त्यांची कामे दाखवून एकाही ठिकाणी मजूर नसल्याचे उघड झाल्याने मनरेगातील ‘अर्थकारण’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. स्थानिक पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही यामध्ये हात असल्यानेच हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

याबाबतचा अहवाल तपासणी पथकाने रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांना दिला असून यावर ते काय कारवाई, करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

या गावांत सुरू होते मजुरांविना काम
अंबाजोगाई तालुक्‍यातील ७३ रस्त्यांच्या कामांवर मजूरच उपस्थित नव्हते; परंतु कागदोपत्री मात्र ११ हजार मजुरांची नोंद घेतली जात होती. यामध्ये भतानवाडी, डोंगर पिंपळा, घाटनांदूर, अंजनपूर, कुसळवाडी, मगरवाडी, बाभळगाव, नवाबवाडी, साळुंकवाडी, वरवटी, चिचखंडी, तळणी, चोपणवाडी, उजनी, डिघोळअंबा, साकुड, जोगाईवाडी, धसवाडी, धावडी, पूस, गिरवली (बावणे), गिरवली (अंजणी), गित्ता, जवळगाव, केंद्रेवाडी, कोळकानडी, कुंबेफळ, ममदापूर, मोरेवाडी, मुडेगाव, मुरकुटवाडी, पठाण मांडवा, सायगाव, शेपेवाडी, तडोळा, उमरी, वाघाळा, वरपगाव आदी गावांमध्ये  रस्त्यांची कामे मजुरांविनाच सुरू असल्याचे दाखविले जात होते.

तपासणी पथकाच्या भेटीनंतर सर्वच कामे केली बंद
अंबाजोगाईतील ७३ रस्त्यांच्या कामांना मनरेगा विभागाच्या पथकांनी १३ एप्रिल ते पुढे दोन आठवड्याच्या काळात अचानक भेटी देऊन तपासणी केल्यावर एकाही ठिकाणी मजुरांची उपस्थिती नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली. यानंतर हे प्रकरण अंगाशी येऊ शकते, हे जाणून पंचायत समिती प्रशासनाने सर्वच ७३ रस्त्यांची कामे अवघ्या तीनच आठवड्यांत बंद केली; परंतु तीन आठवडे काम सुरू असल्याचे दाखविल्याने शासनाला मात्र लाखोंचा भुर्दंड पडणार असून या कालावधीतील कामाचे मस्टर न काढण्याची म्हणजेच बिले न काढण्याची मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित देशमुख यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com