आमदार अब्दुल सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचा रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

सिल्लोड तालुक्‍यातील दहीगाव येथे शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ करतांना धार्मिक भावना दुखावतील असा शब्द प्रयोग केल्याने सिल्लोड-सोयगाव कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी सिल्लोड शिवसेनेतर्फे (ता.16) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद- सिल्लोड तालुक्‍यातील दहीगाव येथे शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ करतांना धार्मिक भावना दुखावतील असा शब्द प्रयोग केल्याने सिल्लोड-सोयगाव कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी सिल्लोड शिवसेनेतर्फे (ता.16) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

मंगळवारी (ता. 13) दहिगाव शिवारातील शेतात जाऊन शेतकऱ्यांना मारहाण व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. धार्मिक भावना दुखावतील अशी शिवागीळ केल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून सिल्लोड व औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या विरोधात आंदोलन, निदर्शने सुरु झाली आहेत. शुक्रवारी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने सत्तारांच्या अटकेच्या मागणीसाठी सकाळी रास्तारोको करण्यात आला. नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते सुनील पाटील मिरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलनात सहभाग घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची जमीन हडपणाऱ्या, हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना अटक झालीच पाहिजे, शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवसेनेच्या रास्तारोकोमुळे या चौकातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. 

हिंदूजागरणच्या वतीने सिल्लोड बंदची हाक 
शेतकऱ्याला मारहाण व धार्मिक भावाना दुखावल्याच्या निषेधार्थ व आमदार अब्दुल सत्तार यांच्या अटकेच्या मागणीसाठी हिंदूजागरण मंचतर्फे शनिवारी (ता. 16) सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपने यापुर्वीच तहसीलदारांना निवेदन देऊन सत्तार यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला होता. भाजप, शिवसेना व आता हिंदूजागरण मंच देखील सत्तारांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे दिसते.