विद्यापीठाच्या लौकिकासाठी खेळणे ठरतोय गुन्हा!

आदित्य वाघमारे
मंगळवार, 4 एप्रिल 2017

औरंगाबाद  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विविध क्रीडा स्पर्धांत प्रतिनिधित्व करणे आता खेळाडूंसाठी जणू गुन्हाच ठरतो आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यापीठाच्या लौकिकासाठी खेळणाऱ्या औरंगाबादच्या शिवानी पाटीलला आता परीक्षेपासून वंचित ठेवले जाते आहे.

औरंगाबाद  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विविध क्रीडा स्पर्धांत प्रतिनिधित्व करणे आता खेळाडूंसाठी जणू गुन्हाच ठरतो आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यापीठाच्या लौकिकासाठी खेळणाऱ्या औरंगाबादच्या शिवानी पाटीलला आता परीक्षेपासून वंचित ठेवले जाते आहे.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यशस्वी होत सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या शिवानी पाटील हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या योगासन संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी जागा मिळविली. बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या शिवनीने कुरुक्षेत्र येथे ता. 13 ते 21 मार्चदरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. या कालावधीत तिचे ता. 17, 18 आणि 20 या तारखांना काही पेपर झाले होते. तिची ही परीक्षा घेण्यात येईल, अशी ग्वाही विद्यापीठाने दिल्यावर शिवानी स्पर्धेसाठी रवाना झाली. परीक्षा आणि स्पर्धा एकत्र येत असताना तिने विद्यापीठाच्या लौकिकासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरविले.

स्पर्धेहून माघारी परतल्यावर मात्र आता दोन आठवडे उलटूनही तिच्या परीक्षेचे अद्याप विद्यापीठाकडून नियोजन करण्यात आलेले नाही. पदवीचे तिचे हे अंतिम वर्ष असून, परीक्षा न दिल्यास तिचे वर्ष वाया जाण्याची भीती बळावली आहे. विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी परराज्यांतील स्पर्धांत सहभागी होणे खेळाडूंच्या शिक्षणाच्या मुळावर उठत असेल, तर हा एकप्रकारचा गुन्हाच ठरत असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे.

अशा खेळाडूंचे नुकसान टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विशेष परीक्षा आयोजित करण्याचा नियम बनविला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मात्र खेळडूंसाठी असा कल्याणकारी निर्णय घेतलेला नाही.

परीक्षेसाठीचा प्रस्ताव तयार
प्रदीप दुबे (संचालक, क्रीडा विभाग) - अंतिम वर्षाला असलेल्या शिवानीचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी क्रीडा विभागातर्फे तिच्या परीक्षेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तिची परीक्षा घेण्यासाठी क्रीडा विभाग प्रयत्नशील आहे.

विद्यापीठाकडे विचारणा करणार - अंबादास दानवे (पदाधिकारी, योग संघटना)
विद्यापीठाने शिवानीला सांगितले असल्यास त्यांना परीक्षा घ्यावीच लागेल. तिच्यावर अन्याय होत असेल तर विद्यापीठाकडे संघटनेतर्फे विचारणा करण्यात येईल.

मानसिकतेवर विपरीत परिणाम - चंद्रशेखर पाटील (शिवानीचे वडील) - पालकांच्या आणि खेळाडूंच्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होतो. परीक्षा वेळापत्रकात स्पर्धा येऊ नयेत याची खबरदारी घ्यावी, अन्यथा विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात यावे. अशाने खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार नाही.

Web Title: Shivani Patil now deprived of examination