कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, क्रांती चौकात केले धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता.10) क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या.

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता.10) क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या.

आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींसह शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सकाळीच मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी शेतकरी कर्जमुक्‍त झालाच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्जमुक्‍ती आमच्या हक्‍काची, नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कर्जमाफी प्रकरणात शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिकाला भाव नाही, यामुळे शेतकरी आणखी कर्जबाजारी होत आहे. यासाठी लवकरात लवकर कर्जमुक्‍ती मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही तीव्र आंदोलन केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही असा इशारा दिला. आमदार संजय शिरसाट म्हणाले, की उत्तर प्रदेशात सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. जे योगींना जमले ते महाराष्ट्राच्या फडणवीसांना का जमू शकले नाही? असा सवाल केला. योगी सरकारने कर्जमाफी कशी दिली, याचा अभ्यास आता फडणवीस सरकार करीत आहे, मग अडीच वर्षे काय केले? अशी टीका त्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख भाऊ सांगळे, बाबासाहेब जगताप, अवचित वळवळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आनंदीताई अन्नदाते, रंजना कुलकर्णी यांनीही या वेळी मनोगत व्यक्‍त केले.

आंदोलनात गजानन मनगटे, मोहन मेघावाले, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, नंदकुमार घोडेले, विनोद बोंबले, जिजा कोरडे, सुभाष कानडे, प्रकाश दुबे, बप्पा दळवी, किशोर कुकलारे, रमेश बोरनारे, अंकुश सुंभ, केतन काजे, रमेश दहीहंडे, राजू दानवे, रावसाहेब आमले, संजय बारवाल, रमेश बहुले, लक्ष्मण राजपूत, नरेश भालेराव, दिग्विजय शेरखाने, बापू पवार, विजय वाघचौरे, वसंतभाई शर्मा, गोपाळ कुलकर्णी, राजू वरकड, अविनाश गलांडे, आत्माराम पवार, सचिन खैरे आदी सहभागी झाले होते.