शोरूमची शेकडो वाहने भंगारात! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

औरंगाबाद - भारत स्टेज-3 (बीएस-3) वाहनांची विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2017 पासून बंदी घातली. या निर्णयाने गाफील असलेल्या वाहन कंपन्या आणि शोरूम चालकांवर वाहने भंगारात काढण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद शहरात चारचाकी, तीनचाकी अशी जवळपास हजारावर वाहने सध्या विविध शोरूममध्ये आहेत. या वाहनांची विक्री कशी करावी, अशी चिंता गुरुवारी (ता. तीस) दिवसभर शोरूम चालकांना होती. विविध शोरूमच्या अधिकाऱ्यांनी परिवहन कार्यालयात फेऱ्या मारून तोडगा निघतो का याचीही चाचपणी केली. या निर्णयाने अंदाजे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. 

औरंगाबाद - भारत स्टेज-3 (बीएस-3) वाहनांची विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2017 पासून बंदी घातली. या निर्णयाने गाफील असलेल्या वाहन कंपन्या आणि शोरूम चालकांवर वाहने भंगारात काढण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद शहरात चारचाकी, तीनचाकी अशी जवळपास हजारावर वाहने सध्या विविध शोरूममध्ये आहेत. या वाहनांची विक्री कशी करावी, अशी चिंता गुरुवारी (ता. तीस) दिवसभर शोरूम चालकांना होती. विविध शोरूमच्या अधिकाऱ्यांनी परिवहन कार्यालयात फेऱ्या मारून तोडगा निघतो का याचीही चाचपणी केली. या निर्णयाने अंदाजे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. 

देशभरात वाहनांसाठी भारत स्टेज-4 या उत्सर्जन मानकांची (भारत स्टेज इमिशन स्टॅंडर्ड) अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारत स्टेज-3 च्या सर्व वाहनांच्या नोंदणीवर बंदी घातली. भारत स्टेज (बीएस) मानकांची सन 2000 पासून कार्यवाही सुरू झालेली आहे. याद्वारे वाहनांसह अन्य इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित घटकांबाबत केंद्र सरकारने काही मानके निश्‍चित केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मानके व त्याच्या कार्यवाहीचे वेळापत्रक निश्‍चित केलेले आहे. युरोपीय नियमकानुसार भारत स्टेज-4 (बीएस-4) निश्‍चित केले जातात. एप्रिल 2010 पासून देशभरातील तेरा मोठ्या शहरांत याची अंमलबजावणी पूर्वीच सुरू झालेली आहे. संपूर्ण देशभरात एप्रिलपासून ही अंमलबजावणी सुरू होत आहे. याविरोधात वाहन कंपन्या न्यायालयात गेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने वाहन कंपन्यांना दिलासा दिला नाही. 

नवी-कोरी हजारो वाहने भंगारात 
देशभरात भारत स्टेज-4 (बीएस-4) च्या निर्णयाने गाफील असलेल्या वाहन उद्योजक कंपन्या व व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. देशभरात जवळपास आठ लाख वाहने या निर्णयाने भंगारात निघण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद शहरात शिल्लक असलेल्या दुचाकी भरघोस सूट दिल्याने हातोहात विक्री झाल्या. मात्र या निर्णयाने चारचाकी वाहनांवर संक्रांत आली आहे. चारचाकी वाहनांमध्ये अलिशान चारचाकी कारसह ट्रॅक्‍टर, ट्रक, मिनीट्रक, मिनी ऍपेसारखी वाहने शिल्लक आहेत. त्यात ट्रान्स्पोर्टच्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. अशा वाहनांचा आकडा अंदाजे एक हजाराच्या जवळपास आहे. शुक्रवार (ता. 31) हा वाहन नोंदणीसाठी शेवटचा दिवस असल्याने या एकाच दिवसामध्ये वाहने कशी विक्री करावीत किंवा वाहनांचे काय करावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आरटीओत चाचपणी 
भारत स्टेज-3 ची वाहने कशी अधिकृत करावीत यासाठी गुरुवारी (ता. तीस) विविध कंपन्यांचे विक्री अधिकारी, प्रतिनिधी आरटीओ कार्यालयात ठाण मांडून होते. शिल्लक असलेली चारचाकी वाहने दोन दिवसाच्या आत शोरूमच्या किंवा अन्य काहींच्या नावावर करून घेणे आणि नंतर मोठा डिस्काउंट देऊन किंवा सेकंडहॅण्ड म्हणून विक्री करणे हा एक पर्याय समोर असल्याने तसे करावे का, याबद्दल विचार करण्यात येत होता. काही चारचाकी उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्ष-दोन वर्षापासूनच भारत स्टेज-4 चा अवलंब सुरू केलेला आहे. मात्र अनेक कंपन्या अद्यापपर्यंत गाफील होत्या किंवा त्यांचे उत्पादन जाणूनबुजून सुरू होते. अशा कंपन्या आणि वाहने खरेदी करून ठेवलेले शोरूमचालक अडचणीत सापडले आहेत. 

सध्या शोरूममध्ये असलेल्या वाहनांची नोंदणी 31 मार्चपर्यंत करता येईल. शोरूमच्या नावावर वाहने नोंदणी करता येऊ शकतात. मात्र हा निर्णय शोरूमचालकांचा आहे. परिवहन आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार बीएस-3 श्रेणीतील वाहनांची नोंदणी 1 एप्रिलनंतर कुठल्याही परिस्थितीत केली जाणार नाही. 
- किरण मोरे (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी) 

वाहनांच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेता, हा निर्णय अपेक्षित होता. यापूर्वीच सर्व वाहन उत्पादकांना सूचना दिल्या होत्या. विदेशी कंपनीच्या वाहनांनी पूर्वीच बीएस-4 चा अवलंब केलेला आहे. देशातील काही वाहन उत्पादकांनी उत्पादन सुरूच ठेवल्याने अशा कंपन्यांना फटका बसणार आहे. 
- मनीष धूत (अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑटोमोबाईल ऍथोरॉईज्ड डीलर असोसिएशन) 

बीएस-3 ची वाहने 1 एप्रिलनंतर नोंदणी होणार नसल्याने वाहने विक्री करणाऱ्या शोरूमालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. रत्नप्रभा मोटर्समध्ये जवळपास पन्नास वाहने उभी आहेत. या निर्णयाने शहराचे अंदाजे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवसभरात ज्या दुचाकी विक्री केल्या त्या तोट्यात विक्री झाल्या. 
- मानसिंग पवार (रत्नप्रभा मोटर्स) 

Web Title: Showroom hundreds of junk vehicles