निरक्षर मातापित्यांचा मुलगा बनला न्यूरॉलॉजिस्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

किल्लेधारूर - तालुक्‍यातील आरणवाडी या लहान खेड्यातील विलास चांगदेव शिनगारे हा चौदा वर्षांच्या खडतर प्रवासातून न्यूरॉलॉजिस्ट बनला आहे. त्याने न्यूरोलॉजीच्या शेवटच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून डी.एम. ही पदवी मिळविल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

 

किल्लेधारूर - तालुक्‍यातील आरणवाडी या लहान खेड्यातील विलास चांगदेव शिनगारे हा चौदा वर्षांच्या खडतर प्रवासातून न्यूरॉलॉजिस्ट बनला आहे. त्याने न्यूरोलॉजीच्या शेवटच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून डी.एम. ही पदवी मिळविल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. 

 

डोंगराळ भागातील आरणवाडी हे छोटेसे गाव. गावात जायला धड रस्ताही नाही. वडील चांगदेव आणि आई कमलबाई शिनगारे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. दोघेही निरक्षर. लहानपणापासून बुद्धिमत्तेची चुणूक दाखविणाऱ्या विलासचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. शिकवणी न लावता २००० मध्ये धारूरमधून तो दहावी उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणासाठी अंबाजोगाईच्या योगेश्‍वरी महाविद्यालयात  विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती नसल्याने कोणत्याही विषयाची शिकवणी नाही. आईचे सर्व आयुष्य उपचारावर सुरू होते; तरीही एम.एच.सी.ई.टी. परीक्षेत बीड जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवत त्याने राज्यात खुल्या प्रवर्गात ४४४ वा क्रमांक मिळविला. वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते. जमीन विकण्यास काढली. कोणी घेईना. विलासचा मोठा भाऊ सतीशने सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. प्रवेशाची शेवटची तारीख असताना आदल्या दिवशीच त्याला पैसे मिळाले. विलास सायंकाळी औरंगाबादला पोचला. कोठे थांबावे म्हणून गोंधळला. पैसे चोरीस गेले तर शेवटची संधीही जाईल या भीतीने चालत घाटी वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता धरला. सकाळी प्रवेश अर्ज भरला. नंतर सायंकाळी होस्टेलचे पैसे भरण्यासाठी पैशांची अडचण आली. त्यासाठी आणखी पाच हजार रुपये लागणार होते. औरंगाबादेत ओळखीचेही कोणी नसल्याने शेवटी अधिष्ठातांना भेटला आणि गावचा रस्ता धरला. पुन्हा सावकारांकडून पैसे घेतले. एकदाचा एमबीबीएसचा प्रवेश झाला. चार वर्षांच्या काळात मोठा भाऊ सतीशने ऊस तोडणीसाठी गाडीवर नोकरी करत विलासला आधार दिला. 

 

विलासलाही परिस्थितीची जाणीव होती. मित्रांचे कपडे, पुस्तके वापरून तो अभ्यास करीत होता. समीर जोशी, संदीप कानसुरकर या मित्रांच्या मदतीबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो. आईचा आजार बळावला होता. उपचारासाठी देऊळगाव राजा येथे शासकीय रुग्णालयात नोकरी स्वीकारली. आईची तब्येत बिघडली. त्यातच त्यांचे निधन झाले. आईचे दुःख पेलवत विलासने डी.एम.च्या परीक्षेची तयारी सुरू केली. बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्यातून १०० वा क्रमांक मिळविला. मुंबईच्या नायर रुग्णालयात मेडिसिनला प्रवेश घेतला. डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी प्रोत्साहन दिले. डी. एम. न्यूरोलॉजीचा सोमवारी (ता. १२) निकाल लागला. यात डॉ. विलास शिनगारे याने चांगली श्रेणी आणि गुण मिळविले. २००२ ते १०१४ या चौदा वर्षांच्या खडतर प्रवासातून आरणवाडीचा डॉ. विलास शिनगारे न्यूरॉलॉजिस्ट बनला.