सुरवाडीचा सोपान झाला उपजिल्हाधिकारी, राज्यात तिसरा

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 31 मे 2018

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी येथील सोपान प्रभाकर टोम्पे या शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी येथील सोपान प्रभाकर टोम्पे या शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला असून त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औंढा नागनाथ येथील नागनाथ विद्यालय माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सन 2011 मध्ये हिंगोली येथून डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 2013 मध्ये हिंगोली येथे तलाठी भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली. दोन वर्षे तलाठी म्हणून काम केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले. सन 2015 मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांची मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली.  त्यानंतर  दिलेल्या स्पर्धा परीक्षेत बेलापुर येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली. सध्या ते विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 मात्र तलाठी म्हणून काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे महसूल विभागात अधिकारी म्हणून काम करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अभ्यास सुरू केला मागील वर्षी झालेल्या पूर्व मुख्य परीक्षा मध्ये त्यांनी यश मिळवले. मागील महिन्यात झालेल्या मुलाखतीनंतर बुधवारी (ता. 30) अंतिम निकाल जाहिर झाला. यामध्ये टोम्पे यांनी राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. हिंगोलीची उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर जवळा बाजार येथील नानासाहेब कदम यांनी यावेळी मार्गदर्शन केल्याचे टोम्पे यांनी सांगितले. पुढील काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिषद घेऊन जिल्हाधिकारी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

सुरवाडी सारख्या ग्रामीण भागातून शेतकऱ्याच्या मुलाने मिळविलेले यश जिल्ह्यातील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे जिद्द व परिश्रमाच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळवता येते असा विश्वास श्री. टोम्पे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: sopan becomes deputy collector from surwadi