अठरा लाख भरूनही मुलाला नोकरी न मिळाल्याने पित्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

चाकूर - मुलाच्या नोकरीसाठी अठरा लाख रुपये भरूनही संस्थाचालकाने नोकरीवरून काढल्यामुळे वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झरी (बु.) येथे घडली आहे.

चाकूर - मुलाच्या नोकरीसाठी अठरा लाख रुपये भरूनही संस्थाचालकाने नोकरीवरून काढल्यामुळे वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना झरी (बु.) येथे घडली आहे.

झरी (बु.) येथील सुधाकर सखाराम खंदारे यांनी मुलगा विनायक यास शिक्षकाची नोकरी लावण्यासाठी संस्थाचालकास अठरा लाख रुपये दिले होते. मुंबई येथील शाळेवर मुलास शिक्षकाची नोकरी देण्यात आली होती. एक वर्षापासून मुलगा विनावेतन काम करीत होता. म्हणून वडिलांनी संस्थाचालकास वेतनाबाबत विचारणा केली असता मुलास नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पैशाची मागणी केल्यानंतर पैसेही दिले जात नव्हते. खंदारे यांनी शेती विकून व पाहुण्यांकडून उसनवारीने पैसे घेतले होते. संस्थाचालक पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे सुधाकर खंदारे यांनी बुधवारी ता. 28 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, यानंतर विनायक खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थाचालक तनिष्क कांबळे (रा. लातूर), संजय आलापुरे, कमलाकर जायभाये, मीराबाई जायभाये (रा. अहमदपूर), संभाजी पाटील (रा. मुखेड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.