पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने मुलांसह घेतले विष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

केज - तालुक्‍यातील होळ येथील पांडुरंग आश्रूबा घुगे (वय 25) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडल्याचा अंदाज आहे. दरम्यान, पतीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पत्नीने दोन चिमुकल्यांना विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. होळ येथील पांडुरंग आश्रूबा घुगे यांचे इंदूबाई यांच्याशी साडेचार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पांडुरंग हे रसवंतीचा हंगामी व्यवसाय करून शेती करत होते. त्यांना एक मुलगा व दुसरी मुलगी होती. पती-पत्नीत किरकोळ कारणावरून वाद होत असत. अशाच काहीशा कारणामुळे पांडुरंग घुगे दोन दिवसांपासून घरी नव्हते. सोमवारी चंदनसावरगाव शिवारातील पेट्रोलपंपाच्या पाठीमागे शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती कुटुंबीयास समजताच पांडुरंग यांची पत्नी इंदूबाई (वय 22) हिने अडीच वर्षांचा पवन व सहा महिन्यांच्या चिमुकलीस विष पाजले. त्यानंतर तिनेही विष प्राशन केले. आईसह दोन चिमुकल्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, इंदूबाई घुगे यांची प्रकृती नियंत्रणात आहे.