सुती कपडे वापरा; उन्हात जाणे टाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

उन्हाचा पारा ३६ अंशांवर; मुलांचीही घ्या काळजी

बीड - यंदा अतिवृष्टीनंतर उन्हाळाही तीव्र जाणवत असून सध्या उन्हाचा पारा ३६ अंशांवर पोचला आहे. उष्माघातासह उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सुती कपड्यांचा वापर, मुलांना उन्हात जाण्यापासून रोखणे आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे. 

मागचे तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळाही तीव्र जाणवला. मात्र, त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहिले. अद्यापही जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे तीव्र उन्हाळा जाणवणार नाही, असे तर्क लावले जात आहेत; पण यंदाही उन्हाचे चटके अधिक जाणवणार आहेत. सध्या उन्हाचा पारा ३६ अंशांवर पोचला आहे. त्यामुळे उन्हाचे दुष्परिणाम झाल्यानंतर त्यावर उपाय करण्यापेक्षा अगोदरच उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  

काय करावे
भरपूर पाणी प्या, अगदी तहान नसतानाही हलके, पातळ आणि सुती; तसेच छिद्र असलेल्या कपड्यांचा वापर करा. डोक्‍याला सुती कपडा गुंडाळावा, उसाचा रस, लिंबू-सरबत, ज्यूस, मीठ-साखरमिश्रित पाणी प्यावे, चक्कर, अशक्तपणा, जास्त घाम येत असल्यास तत्काळ सावलीत यावे आणि शक्‍य तितक्‍या लवकर डॉक्‍टरांना दाखवावे. 

हे टाळावे
उन्हात जाणे टाळावे, लहान मुलांना उन्हात जाऊ देऊ नये, गरोदर स्त्रिया व कामगार महिलांनी उन्हात जाणे टाळावे, उन्हात दुचाकीवरून प्रवास टाळावा, उन्हात जाताना डोक्‍याला ओला कपडा बांधू नये. 

उन्हामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर उपाय करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेणे चांगले आहे. विशेषत: बालकांना सकाळी नऊपासूनच उन्हात जाण्यापासून टाळावे. थकवा, चक्कर असे काही जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जावे. 
- डॉ. हनुमंत पारखे (बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड)

Web Title: summer increase in beed