महिलादिनीच खुलले "तिच्या' चेहऱ्यावर हास्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

लातूर - लहानपणापासूनच ओठाचे व्यंग असूनही गरीब परिस्थिती असल्याने त्याकडे आई-वडिलांनी दुर्लक्ष केले. वयात आल्यानंतर आई-वडिलांनी एकाशी लग्न लावून दिले. पण व्यंग असल्याने पतीने सोडून दिले. आईजवळ राहून तिने अकरा वर्षे काढली. व्यंग असल्याने समाजात फिरता येईना. अशा एका तीस वर्षांच्या महिलेवर येथील प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत शस्त्रक्रिया केली. यातून या महिलेला तीस वर्षांनंतर जगण्याची नवी उमेद मिळाली. लहाने रुग्णालयात या महिलेच्या हस्ते महिला दिनाचा केक कापून तिला गावाकडे पाठविण्यात आले. रुग्णालयातून जाताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

रुई (ता. कंधार, जि. नांदेड) येथील सुरेखा गंगाधर गोंदलवाड (वय 30) असे तिचे नाव आहे. ही महिला जन्मतःच दुभंगलेले ओठ घेऊन जगत होती. आई-वडील अशिक्षित, घरची गरीब परिस्थिती त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रियाच होऊ शकली नव्हती. वयात आल्यानंतर आईवडिलांनी तिचे लग्न मसलगा (ता. नांदेड) येथील एका शेतमजुराशी लावून दिले. दुभंगलेले ओठ असल्याने पतीकडून या महिलेला नेहमीच तुच्छतेची वागणूक मिळत होती. या कारणाने पतीने सोडून दिले. दुसरे लग्न गेले.

गेल्या 11 वर्षापासून ती आईसोबत राहत आहे. व्यंग असल्याने ती स्वतःला घरात लपवून ठेवण्याचा प्रयत्न करायची. सणसमारंभातही कोठेही ती जात नसे. या महिलेच्या आईला एकाने या व्यंगावरील उपचाराची माहिती दिली. त्यानंतर ता. सात मार्च रोजी ही महिला आईला घेऊन येथील लहाने रुग्णालयात आली. त्यात ता. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने डॉ. विठ्ठल लहाने व त्यांच्या टीमने या महिलेवर बुधवारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जगण्याची नवीन उमेद दिली. डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. कल्पना लहाने, डॉ. राजेश शाह यांनी मोफत शस्त्रक्रिया केली.

'दुभंगलेले ओठ व टाळू हे जन्मजात व्यंग असते. ते दुरुस्त होणारे आहे. लहाने रुग्णालयात आतापर्यंत सात हजार जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या व्यंगावर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे अशी वेळ कोणावर येऊ नये याकरिता लहान वयातच शस्त्रक्रिया करून घेणे अधिक चांगले आहे.
- डॉ. विठ्ठल लहाने, प्लास्टिक सर्जन

Web Title: surgery on lips