शिक्षा सुनावण्यापूर्वीच संशयित आरोपी पसार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

औरंगाबाद - जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षेतून बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील 59 वर्षीय संशयित आरोपी पळून गेल्याची घटना मंगळवारी (ता. 25) सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली. 

औरंगाबाद - जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षेतून बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील 59 वर्षीय संशयित आरोपी पळून गेल्याची घटना मंगळवारी (ता. 25) सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली. 

निर्सगनगर परिसरातील तेरावर्षीय अल्पवयीन मुलीस त्याच भागातील सांडू हरी चव्हाण (वय 59) याने झाडाखाली बोलवून बळजबरीने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घर गाठले व घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली होती. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होती. या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने जामिनावर असलेल्या सांडू चव्हाणला न्यायालयात बोलविण्यात आले होते. त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यात आल्यानंतर शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे लक्षात येताच, सांडूने लघुशंकेसाठी जाण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने तातडीने परवानगी दिली; मात्र पंधरा मिनिटे झाले तरी तो परत आला नसल्याने छावणी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी न्यायालयातील सर्व मजल्यावरील स्वच्छतागृहे आणि परिसरात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शोध घेऊन तो सापडला नसल्याचे न्यायालयास सांगण्यात आल्यावर न्यायालयाने सांडू चव्हाणच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले.