विष्णूनगरमध्ये एकाच रात्रीत दोन घरफोड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद - विष्णूनगनर येथील दोन घरी डल्ला मारून चोरांनी तब्बल साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड व तीन मोबाईल लंपास केले. ही घटना रविवारी (ता. २७) पहाटे उघडकीस आली. शहरात तीन-चार दिवसांपासून मोठ्या घरफोड्या होत असून, हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

औरंगाबाद - विष्णूनगनर येथील दोन घरी डल्ला मारून चोरांनी तब्बल साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड व तीन मोबाईल लंपास केले. ही घटना रविवारी (ता. २७) पहाटे उघडकीस आली. शहरात तीन-चार दिवसांपासून मोठ्या घरफोड्या होत असून, हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमिटेशन ज्वेलरी दुकानाचे प्रकाश बाबूलाल कोटेचा (वय ४२, रा. विष्णूनगर) शनिवारी (ता. २६) सकाळी त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी नाशिकला गेले होते. ही संधी साधून चोरांनी घराचे कुलूप तोडून बेडरूमच्या कपाटातून साडेसतरा तोळ्यांचे विविध आभूषणे व अलंकार लांबविले. त्यानंतर सव्वा लाख रुपये घेऊन पोबारा केला. 

कोटेच्या यांच्या घरावर डल्ला मारल्यावर चोरांनी याच भागातील नामदेव तुकाराम बनकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. बनकर यांच्या घरातील सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. चोरांनी घरात प्रवेश करून तीन मोबाईल व ३० हजार रुपये लंपास केले. तुकाराम बनकर पहाटे साडेपाचनंतर उठून खाली आले तेव्हा घरात चोरी झाल्याची बाब उघड झाली. तसेच चोरांनी कोटेचा यांचे घर फोडल्याचेही लक्षात आले. 

या घटनेची माहिती समजताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बी. जी. वेव्हळ, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, काशीनाथ महांडुळे, गुन्हे शाखेचे पथक घनश्‍याम सोनवणे, सहायक भंडारे, उपनिरीक्षक बहुरे यांनी घटनास्थळी पाहणी करीत ठसेतज्ज्ञांनी ठसे घेऊन श्‍वानांनी चोरांचा माग काढला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन्ही चोरींच्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली.

घरफोडीदरम्यान संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फुटेजवरून तडिपार व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत आहोत. या घटनेतील चोरी करण्याची पद्धत आणि तशा पद्धतीची चोरी करणाऱ्या चोरांची माहिती जाणून घेतली जात आहे. 
- घनश्‍याम सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.

Web Title: theft in aurangabad