तुळजापुरात चरणतीर्थासाठी महिलांना प्रवेश नाकारला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

सरव्यवस्थापकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला

सरव्यवस्थापकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला
तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास चरणतीर्थावेळी नित्य दर्शनासाठी प्रवेश नाकारल्याने महिला भाविक आक्रमक झाल्या. "आम्हाला प्रवेश मिळेपर्यंत महंतांनाही मंदिरात जाऊ देणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. मंदिर समितीच्या सरव्यवस्थापकांनी मध्यस्थी केल्यानंतर महिलांना प्रवेश मिळाला आणि हा वाद मिटला.

तुळजाभवानी मंदिरात पहाटे चरणतीर्थाच्या वेळी गाभाऱ्यात प्रवेश करून महिला दर्शन घेतात. या वेळी देवीचे महंत तुकोजीबुवा यांनी दरवाजा उघडल्यावर चरणतीर्थ होते. आज पहाटे चरणतीर्थासाठी आलेल्या महिलांना सुरक्षारक्षकांनी मंदिरात जाण्यापासून रोखले, त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. काही काळानंतर तेथे महंत तुकोजीबुवा आले, त्यांनाही अडवून महिलांनी हा प्रकार सांगितला.

महंत तुकोजीबुवांनी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला व महिलांना प्रवेश द्यावा, असे सूचित केले. त्यानंतर पवार यांनी संबंधितांशी संपर्क साधून महिलांना मंदिरात सोडण्याची सूचना केली. त्यामुळे लगेचच हा प्रश्न मिटला.

तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थाच्यावेळी महिला भाविकांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधितांना सूचना देऊन लगेचच हा प्रश्‍न सोडविला. महिला भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.
- सुनील पवार, सरव्यवस्थापक, तुळजाभवानी मंदिर समिती