वॉटर एटीएमवर भागतेय पाच गावांची तहान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

गाव पुनवर्सित झाल्यापासून पिण्यासाठी अशुद्ध पाणी मिळत होते. गावाला पिण्यास मुबलक शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायत आणि बुलडाणा अर्बन बॅंक यांच्यातर्फे जलशुद्धीकरण यंत्र व वॉटर एटीएम बसविले. याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सुमित मुंदडा, सरपंच

विविध उपक्रम राबवून गावास ‘स्मार्ट व्हिलेज’ बनविण्याचा आमचा संकल्प आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. लवकरच गाव आयएसओ करू.
- विजय वांढेकर, ग्रामसेवक

अमळनेर येथे दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने सुरू केला उपक्रम, दरमहा दीड हजाराचे उत्पन्न
कायगाव - अमळनेर (ता. गंगापूर) येथे दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या जलशुद्धीकरण यंत्र व वॉटर एटीएमच्या पाण्यावर चार ते पाच गावांची तहान भागत आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍नही काहीअंशी सुटला आहे.

ग्रामपंचायत आणि बुलडाणा अर्बन बॅंक यांच्यातर्फे गेल्या पाच जूनला हा प्रकल्प सुरू झाला. येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ग्रामस्थ दररोज साडेचार हजार लिटर पाणी पिण्यासाठी घेऊन जातात.

वॉटर एटीएम मशीनमध्ये एक रुपया टाकला तर तीन लिटर पाणी मिळते आणि पाच रुपयांचे नाणे टाकले तर पंधरा लिटर पाणी मिळते. यातून ग्रामपंचायतीला १५०० रुपये उत्पन्न मिळते. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत वॉटर एटीएमची सेवा सुरू असते. अमळनेर, वस्ती, कायगाव, लखमापूर, गणेशवाडी येथील ग्रामस्थ येथून पाणी घेऊन जातात. दुष्काळ व पाणीटंचाईतही पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी फिल्टर पाण्याची सोय झाली आहे.

आमदार प्रशांत बंब, बुलडाणा बॅंकेचे सुकेश झंवर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे यांनी या उपक्रमास भेट देऊन पाहणी करीत कौतुक केले   होते.