जलयुक्त आवार बनविणारा लातूर पॅटर्न राज्यभर नेऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुशांत सांगवे
रविवार, 3 जून 2018

'नवा लातूर पॅटर्न' सरकार राज्यभर घेऊन जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी झटणारे लातूरकर हे खरे जलनायक आहेत, असेही ते म्हणाले.

लातूर - 'जलयुक्त शिवार' हा उपक्रम राज्य सरकारने राबविला. आता आवार जलयुक्त बनविणारा उपक्रम लातूरमध्ये सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू झालेला 'नवा लातूर पॅटर्न' सरकार राज्यभर घेऊन जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी झटणारे लातूरकर हे खरे जलनायक आहेत, असेही ते म्हणाले.

लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी 'इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान' सुरू झाले आहे. या अभियानाच्या कामाची पाहणी करून फडणवीस यांनी अभियानात सहभागी झालेल्या जलयोध्यांशी संवाद साधला. या वेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "आम्ही राजकारणातील लोक राजकीय, प्रशासकीय कामे करतो; पण रचनात्मक कार्य अधिक केले पाहिजे. अशा कामातूनच अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडते. आजच्या काळात पाणी या विषयावर जास्त काम करणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते, पाण्याभोवती संस्कृती टिकते. ती फुलते. पाणी नसेल तर संस्कृती संपते. म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते." 

सध्या वेगवेगळ्या उपक्रमातून आपले आवार जलयुक्त बनविणे जास्त गरजेचे आहे. हे येणाऱ्या पिढी करता आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: we will apply latur pattern to the state says CM devendra fadnavis