मोठ्या क्षीरसागरांचे बळ कोणाच्या पारड्यात

मोठ्या क्षीरसागरांचे बळ कोणाच्या पारड्यात

बीड - नगरपालिकेच्या निवडणुकीत क्षीरसागर घरातूनच दोन पॅनेल निश्‍चित झाले असून दोन नगराध्यक्षपदासाठी दोन सख्खे भावंडेच आमने-सामने येणार हेही निश्‍चित आहे; मात्र त्यांचे थोरले बंधू आमदार जयदत्त क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार व दोन भावंडांपैकी कोणाच्या पारड्यात बळ टाकणार याकडे क्षीरसागर घराण्याच्या कट्टर समर्थकांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदासह जिल्ह्याचे पक्षाचे प्रमुख नेते आणि पक्षाच्या विधिमंडळातील उपनेते अशी पक्षाची महत्त्वाची पदे श्री. क्षीरसागर यांच्याकडे आहेत. पालिकेवर मागच्या 30 वर्षांपासून अपवाद वगळता क्षीरसागरांची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीत घरातच दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे थोरले बंधू रवींद्र क्षीरसागर व पुतणे सभापती संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर रवींद्र क्षीरसागर यांनी काकू- नाना विकास आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, सुरवातीला अंतर्गत वाद चौकटीच्या आत मिटवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयत्नही केले; पण शेवटी घरातील दोघे एकाच पदासाठी आमने-सामने लढणार हे निश्‍चित आहे. या दोन्ही भावंडांच्या भूमिका स्पष्ट झाल्या असल्या तरी आता जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार आणि आपले राजकीय बळ कोणाच्या पारड्यात टाकणार यावर बरेच अवलंबून आहे; कारण क्षीरसागर घराण्याशी निष्ठा जपणाऱ्यांबरोबरच जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक या निर्णयामुळे काय करावे अशा संभ्रमात आहेत. जयदत्त क्षीरसागरांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच हा संभ्रम दूर होणार आहे.

भूमिकेला मोठे महत्त्व
शहरातील पक्षाच्या मतदारांसह व्यापारी, नोकरदार असा मोठा वर्ग जयदत्त क्षीरसागर यांना मानणारा आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत; मात्र दोघेही सख्खे भावंडेच असून डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरेही बंधूच आहेत; पण ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे कोणाकडून लढावे असा पेच त्यांच्यापुढे असला तरी त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com