मोबाईल चार्जिंग करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

येरोळ - घरात मोबाईल चार्जिंग करीत असताना मोबाईल वायरमधून अचानक विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव (दे., ता. शिरूर अनंतपाळ) येथे शुक्रवारी (ता. 19) सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. शंकर गणपत कुंभार (वय 17) असे मृताचे नाव आहे.

येरोळ - घरात मोबाईल चार्जिंग करीत असताना मोबाईल वायरमधून अचानक विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तळेगाव (दे., ता. शिरूर अनंतपाळ) येथे शुक्रवारी (ता. 19) सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. शंकर गणपत कुंभार (वय 17) असे मृताचे नाव आहे.

गावाला वीजपुरवठा करणाऱ्या डीपीमध्ये अर्थिंगचा दोष असल्याने अनेक वेळा घराघरातील फ्रीज, टीव्हीमध्ये करंट उतरण्याचे प्रकार घडत आहेत. डीपीच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा शाखा अभियंता ए. डी. जावळे व लाईनमन चौधरी यांना लेखी, तोंडी सांगूनसुध्दा लक्ष दिले नसल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या युवकाचा मृत्यू वीज कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विजेचा शॉक लागून झाल्याने संतप्त गावकरी सकाळी आठ वाजता मृतदेहासह वीज मंडळ कार्यालयापुढे आले. साकोळचे शाखा अभियंता ए. डी. जावळे व लाईनमन चौधरी यांना निलंबित करा, अशी मागणी करीत तब्बल चार तास म्हणजे दुपारी बारापर्यंत ठाण मांडून बसले. दुपारी निलंगा वीज विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. आर. कुलकर्णी व सहायक अभियंता सुधीर केंद्रे यांनी ग्रामस्थांना भेटून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमचे मत वरिष्ठांना कळवू व योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. वीज मंडळाने शाखा अभियंता व लाईनमन यांना त्वरित निलंबित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सरपंच पंडित शिंदे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जगदीश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, महादेव परमेश्वर कुंभार यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. बीट जमादार यू. एस. पवार तपास करीत आहेत.