पोटात गुप्ती खुपसून तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - दोन सख्ख्या भावांनी पंचवीस वर्षीय तरुणाच्या पोटात गुप्ती खुपसून खून केला. ही घटना क्रांती चौक येथे भीमजयंती मिरवणुकीदरम्यान शनिवारी (ता. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आशीष संजय साळवे (रा. रमानगर) असे मृताचे नाव आहे.

औरंगाबाद - दोन सख्ख्या भावांनी पंचवीस वर्षीय तरुणाच्या पोटात गुप्ती खुपसून खून केला. ही घटना क्रांती चौक येथे भीमजयंती मिरवणुकीदरम्यान शनिवारी (ता. १४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आशीष संजय साळवे (रा. रमानगर) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल गौतम जाधव (वय २०) व अविनाश गौतम जाधव (वय २२, रा. रमानगर) अशी संशयितांची नावे असून, ते सख्खे भाऊ आहेत. आशीष हा दोघांच्या भावकीसोबत राहत होता. कुणाल व अविनाशचे भावकीसोबत बिनसलेले होते व ते आशीषला भावकीतील व्यक्तींसोबत राहू नको, असे सक्त बजावत होते; पण आशीषने त्यांचे ऐकले नाही. यातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी गर्दीत त्याच्या पोटात गुप्ती खुपसली. दरम्यान, आशीषला एका खासगी रुग्णालयात नेले; परंतु त्यादरम्यान तो मृत झाला. याप्रकरणी दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली.

सात दिवसांपूर्वीच दिली तक्रार
आशीषला होणारा त्रास पाहून जाधव बंधूंविरुद्ध त्याच्याच भावकीतील व्यक्तीने पोलिस ठाण्यात सात दिवसांपूर्वी तक्रार दिली. याचाही राग जाधव बंधूंना होता. १४ एप्रिलला दिवसभर एका मित्रमंडळाच्या स्टेजवर आशीषने काम केले. त्यावेळी खुन्नस काढून दोघा भावांनी त्याला स्टेजवरून खाली खेचले व अविनाशने पोटात गुप्ती खुपसून ते पसार झाले.

दीड वर्षापूर्वीच झाले लग्न
मृत आशीष एका बॅंकेत चार वर्षांपासून कामाला होता. त्याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते, तर संशयित अविनाश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून संशयित दोघा भावांनी आशीषच्या लग्नात तसेच सहा महिन्यांपूर्वीही वाद घातला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

संशयितांना कचनेर येथून अटक
खूनप्रकरणी कुणाल जाधव व अविनाश जाधव या सख्ख्या भावांना कचनेर फाटा येथील एका ढाब्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी (ता. १५) अटक केली. दोघे कचनेर येथील फाट्यालगत असलेल्या ढाब्यावर लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला समजली. यानंतर सहायक आयुक्त रामेश्‍वर थोरात व त्यांच्या पथकाने कचनेर येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई श्री. थोरात यांच्यासह सुभाष शेळके, घनश्‍याम सोनवणे, सतीश हंबर्डे, विजयानंद गवळी, अशरफ सय्यद, सिद्धार्थ थोरात यांनी केली.

Web Title: youth murder in aurangabad