गुऱ्हाळाच्या परंपरेचा अवीट 'रस'

muktapeeth
muktapeeth

उन्हाळ्याच्या दिवसांत आणि मे महिन्याच्या सुटीत, आवर्जून गुऱ्हाळांत सहकुटुंब जाऊन, उसाच्या रसाचा स्वाद घेण्याची परंपरा, महाराष्ट्रात अनेक कुटुंबांनी, पिढ्यान्‌पिढ्या जपली आहे. गुऱ्हाळांचे बाह्य स्वरूप बदलले, यंत्रसामग्री बदलली, रुचीपालट झाले, तरीही संगणकयुगाच्या जमान्यात, गुऱ्हाळाचा व्यवसाय, आकर्षक स्वरूपात, तीच "गोडी' कायम ठेवून, बहरलेला दिसतोय ! बहुसंख्य ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री आली, तरी बैलघुंगरांच्या खुणखणाटाने ग्राहकांची पावले आपोआपच गुऱ्हाळांकडे वळताहेत.

पारंपरिक गुऱ्हाळांमध्ये पूर्वी, लाकडी चरक, बैलांच्या साह्याने चालविले जात होते. नगर रस्त्यावर अशी गुऱ्हाळे अजूनही पाहायला मिळतात. पुण्यात तुळशीबागेजवळील काकाकुवा मॅन्शन, तसेच उपनगरांत चंदननगरसारख्या ठिकाणी अशी गुऱ्हाळे अगदी 2000 पर्यंत पाहायला मिळत होती. हंगामी मंडप आणि बांबूच्या तट्ट्यांच्या आडोशाने, बहुसंख्य गुऱ्हाळे उभारली जात होती. पोस्टर्स आणि कॅलेंडर्स हीच अंतर्गत सजावट होती. कालांतराने हे सर्व बदलत गेले आणि गुऱ्हाळे देखील संगणक युगातील मॉल संस्कृतीला आता सामोरी जात आहेत !

गुऱ्हाळाच्या व्यवसायातील बदलांचा आढावा घेताना स. प. कॉलेज चौकाजवळील "धन्वंतरी रसवंती गृहा'चे मालक अनिल काळोखे यांनी सांगितले, की विजेच्या उपलब्धतेने आणि वाढत्या शहरीकरणातील जागेच्या टंचाईने बैलांचे चरक मागे पडून हाताने फिरविण्याचे लाकडी चरक आणि यंत्रे आली. सुलभतेसाठी, यंत्राला मोटार बसवून रोलर आणि क्रशरची जोड आली. आवाजरहित यंत्रासाठी, गिअरबॉक्‍स आले. मुख्यत्वे किर्लोस्कर कंपनीची मशिन अगदी 2000 पर्यंत गुऱ्हाळामध्ये वापरली जात होती. शिवापूरचा ऊस हा त्याच्या गोडी आणि उताराच्या वैशिष्ट्यांमुळे सर्वत्र वापरला जातो. रुचीपालट म्हणून उसाबरोबर काही ठिकाणी, पायनापल किंवा संत्र्याच्या स्वादाची जोड दिली जात असली, तरी आले-लिंबाच्या पारंपरिक स्वादालाच, ग्राहकांची पसंती असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात, जगदाळे परिवाराचे, शैलेश रसवंती गृह हे बारमाही गुऱ्हाळ आहे. आरोग्य जागृतीमुळे कृत्रिम पेयापेक्षा, नैसर्गिक पेये म्हणून, उसाच्या रसाला, दिवसेंदिवस वाढती मागणी आहे, असे जगदाळे यांनी सांगितले. रसासाठी त्यांनी स्वतः गुऱ्हाळाच्या नावाचे कागदी पेले तयार करून घेतले आहेत. रसाबरोबर सेंद्रिय गूळ देखील, त्यांनी विक्रीस ठेवला आहे.

शनिपार चौकातील मुरलीधर रसवंती गृह हे पुण्यातील मोजक्‍या, जुन्या बारमाही गुऱ्हाळांपैकी एक आहे. लक्ष्मण मारणे हे व्यवसायाचे संस्थापक असून, 1946 पासून, या व्यवसायात असून, त्यांच्यापश्‍चात, कन्या मधुरा भेलके, त्यांच्या सहा भगिनींच्या सहकाऱ्याने व्यवसायाचा कारभार पाहत आहेत. बंदिस्त अद्ययावत दुकानात, बाराही महिने, गुऱ्हाळ चालविण्याचा प्रयोग यशस्वी करण्याचे आव्हान पेलणे हे दिव्य ठरले, हे सांगताना त्यांनी जनसामान्यांमध्ये जाणीवपूर्वक, आरोग्यजागृती वाढत असल्याची माहिती दिली. मुंबईवरून आणलेली अद्ययावत मशिनरी आणि गरजेनुसार तयार करून घेतलेल्या तीन लाट्यांचा क्रशर हे आपल्या सरवंतीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुरलीधरमध्ये तरुण आणि कौटुंबिक ग्राहकांची वर्दळ मोठी असून, कॅफे आणि पिझ्झा हट प्रमाणे लवकरच इथेही रसाच्या ग्लासबरोबर पब्लिक सेल्फी काढतील, असा आत्मविश्‍वास मधुराताईंना आहे.

गुऱ्हाळ व्यवसायावर मनस्वी प्रेम असल्यामुळे एखाद्या तरुण दांपत्याने, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थिरस्थावर नोकरी सोडून, याच क्षेत्रात अद्ययावतता आणून, तो व्यवसाय केल्याचे उदाहरणही याच पुण्यात आहे. मिलिंद आणि कीर्ती दातार हे दोघेही Jometric या आय.टी. कंपनीमधील उच्चपदस्थ अधिकारी होते. उसाच्या रसाच्या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास करून, या क्षेत्रातील संशोधन संस्था, त्यांचे कार्य, यंत्रसामग्रीतील त्रुटी, सुरक्षितता, स्वच्छता, टिकाऊपणा याचा सर्वांगीण अभ्यास या दोघांनी सलग दोन वर्षे करून, ऑक्‍टोबर 2012 मध्ये स्वनिर्मित यंत्रसामग्रीसह हाच व्यवसाय सुरू केला. यंत्राचा छोटा आकार, स्टीलचा वापर, आवाजरहित आणि स्वच्छतापूरक अशी ही मशिनरी असून, "पुणे केन' या नावे, मुख्यत्वे आय.टी. कंपन्यांमध्ये अशी अद्ययावत गुऱ्हाळे चौदा ठिकाणी कार्यरत आहेत. वार्षिक चार लाख रसाच्या ग्लासांची क्षमता, या व्यवसायाने ओलांडली आहे. नोकरीपेक्षा या वेगळ्या वाटेतील, योगदानाचे महत्त्व अनमोल आहे, असे दोघांनी सांगितले.
भारतीय संस्कृती ही परंपरा जपणारी आणि जरूर तेथे परिवर्तन स्वीकारणारी मानली जाते. कृषिप्रधान अर्थव्यवस्थेमधील, गुऱ्हाळसुद्धा याला अपवाद नाही. "फास्ट फूडच्या' जमान्यात, बैल घुंगरांच्या खणखणाटात, गुऱ्हाळांमध्ये सहकुटुंब हजेरी लावण्यात, तीच गोडी आणि तोच रस आजही टिकून आहे त्याचे कारण हेच असावे, असे वाटते.

टीप ः पुणे शहर आणि उपनगरांत, एकूण सातशेपेक्षा अधिक, हंगामी गुऱ्हाळे आहेत. बारमाही गुळ्हाळ व्यावसायिक सुमारे पंचवीस आहेत.
हमरस्त्यावर फुटपाथकडेने चालवली जाणारी (हाताने) गुऱ्हाळ सुमारे दीडशे असून, दुष्काळी भागातील शेतमजूर जोडप्यांचा तो चरितार्थाचा व्यवसाय असल्याचे समजले. एकंदरीत सुमारे पाच हजारपेक्षा अधिक जणांना, गुऱ्हाळे रोजगार उपलब्ध करून देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com