सैनिकासी वागणे ते कैसे? (मुक्‍तपीठ)

- कर्नल (निवृत्त) अरविंद वसंत जोगळेकर
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

संकटाच्या काळात लष्करी जवानाची आठवण येते; पण शांततेच्या काळात सैनिकांची आठवण ठेवली जात नाही. साध्या कारणांसाठी त्याची अडवणूक केली जाते. त्यांना आपण दुखावतो हे कुणी जाणेल का?

नुकत्याच पूंछ आणि उरीजवळील द्रास येथे १२ माउंट ब्रिगेडवर झालेल्या हल्ल्यामुळे जनमानसात 

संकटाच्या काळात लष्करी जवानाची आठवण येते; पण शांततेच्या काळात सैनिकांची आठवण ठेवली जात नाही. साध्या कारणांसाठी त्याची अडवणूक केली जाते. त्यांना आपण दुखावतो हे कुणी जाणेल का?

नुकत्याच पूंछ आणि उरीजवळील द्रास येथे १२ माउंट ब्रिगेडवर झालेल्या हल्ल्यामुळे जनमानसात 

प्रचंड क्षोभ उसळला. त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे जनतेत उत्साह निर्माण झाला. पण एक गोष्ट नेहमीच लक्षात येते ती म्हणजे, फक्त संकटाच्या वेळीच माणसाला देवाची आणि लष्करी जवानाची आठवण येत असते. पण कालांतराने सामान्य जनता हे सगळे विसरूनही जाते. काही कारणाने एखादा जवान आपल्यासमोर आला, तर त्याच्याशी आपले वागणे कसे असते, ते आठवा. 

आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, दहशतीशिवाय जगत आहोत त्याचे खरे श्रेय सदैव तत्पर असलेल्या जवानाला द्यायला हवे. स्वतंत्र भारताला कराव्या लागलेल्या तीनही युद्धानंतर अनेक कलावंतांनी- लेखकांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर येऊन आम्हा सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम केले होते. १९६३ मध्ये मी आसाममधील तेजपूर येथे असताना राज कपूर, किशोरकुमार, सुनील दत्त, मुकेश, वैजयंतीमाला आणि लता मंगेशकर यांच्यासारखे कलाकार येऊन आमच्यासोबत राहिले होते. काही साहित्यिक आणि कवी पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट आणि डोगरा रेजिमेंट यांसारख्या विविध रेजिमेंटना भेट देऊन त्यांच्यासाठी कथा-कथन, अनुभव कथनासारखे कार्यक्रम करून त्यांचे मनोबल वाढवत होते. 

भारतीय सैनिक चौदा हजार फूट उंची असलेल्या अगदी सियाचीन भागात दुर्गम बर्फाळ प्रदेशात आणि शून्याच्या खाली गेलेल्या वातावरणात राहून देशप्रेमाने ओतःप्रोत भरलेल्या भावनेने आपल्या भारतभूमीचे रक्षण करतात. त्यांच्या या खडतर प्रवासाची आणि तेथील वास्तव्याची प्रचिती घेण्यास हरकत नाही. सैनिकाबद्दल आपल्या मनात असणारे प्रेम, आदर व भावना या नुसत्याच कशा दिखावू असतात याबाबतीतील माझ्या पुण्यातील एका मित्राने नुकताच मला सांगितलेला अनुभव लक्षात घेण्याजोगा आहे.
 माझा मित्र व त्यांचे कुटुंब एका नामांकित यात्रा कंपनीबरोबर काश्‍मीरच्या सहलीला गेले होते. यात्रा कंपनीने रेल्वेची एक संपूर्ण बोगीच त्यांच्यासाठी आरक्षित केलेली होती. परतीच्या प्रवासात ते सगळे जम्मूतावी एक्‍स्प्रेसने पुण्याला येण्यास निघाले होते. संध्याकाळी ज्या वेळी जम्मूतावी एक्‍स्प्रेस जम्मूच्या फलाटावरून निघाली. गाडी हळू हळू वेग पकडत असतानाच या मित्रांच्या डब्यात अचानक गणवेशामध्ये असलेला एक जवान त्याची बॅग घेऊन चढला. आपल्यासाठी संपूर्ण आरक्षण असलेल्या बोगीमध्ये कोणीतरी एक आगंतूक चढलेला बघून बोगीतील काही जणांनी त्याच्यावर आरडाओरडा करत त्याला खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत गाडीने बराच वेग घेतला होता आणि गाडी फलाट सोडून बाहेर पडली होती. कर्मधर्म संयोगाने तो गाडीत चढलेला जवानही मराठीच होता. बोगीमधील प्रवासीदेखील मराठीच आहेत हे बघून त्याला थोडा दिलासा वाटला व तो त्यांना म्हणाला, की ‘‘मी साताऱ्याचा असून, माझी आई आजारी असल्याची तार आजच सकाळी मला मिळाली आणि लगेच माझी रजा मंजूर झाल्यामुळे लागलीच मी घरी जाण्यासाठी निघालो. या सगळ्या धांदलीत मी फलाटावर थोडा उशिरा पोचलो. गाडी निघत होती, त्यामुळे नाईलाजाने मला समोर दिसत असलेल्या तुमच्या डब्यात चढावे लागले. पुढचे स्थानक येईतोवर येथे दारातच थांबेन आणि पुढच्या स्थानकावर गाडी थांबेल, तेव्हा मी उतरेन. अगदी पुढच्या टोकाला आमच्यासाठी वेगळी लष्करी बोगी आहे, त्यात जाईन.’’

पुढे काही अंतरावर गाडी सिग्नलसाठी थांबली, तेव्हा पुन्हा एकदा बोगीतील त्या प्रवाशांनी त्याला खाली उतरून जाण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तेव्हा प्रवाशांपैकी कोणीतरी त्याला म्हणाले, की ‘अरे, कसला तू सैनिक? तुला काही शिस्त आहे की नाही? कोणत्याही डब्यात चढतोस आणि उतरून जाईन म्हणालास तरी जात नाहीस.’

त्यावर इतका वेळ मौन बाळगलेला तो जवान चिडला आणि त्यांना म्हणाला, की ‘आज मी जिवंत असताना तुम्ही मला साधे उभे राहण्यासाठी येथे थांबू देत नाही आहात. उद्या जर मी युद्धामध्ये हुतात्मा झालो, तर मात्र माझे पार्थिव जेव्हा विमानतळावर येईल तेव्हा तुमच्यापैकी काहीजण माझ्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करतील. मला मानवंदना देताना छायाचित्रे काढून जगासमोर आपल्याला सैनिकाबद्दल वाटत असलेली कृतज्ञता व्यक्त करतील.’ तो हे बोलत असतानाच गाडी एका स्थानकावर थांबली आणि तो जवान उतरून निघून गेला. त्याने सगळ्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले होते. तो उतरून गेल्यानंतरही बराच काळ डब्यातील सर्व प्रवासी सुन्न बसून होते.

टॅग्स