कार्यकर्ती घडताना...

अश्‍विनी पांडे
शनिवार, 25 मार्च 2017

 

एक साधी गृहिणी. स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी. अचानक तिला पक्षाचं काम करायला बोलावलं जातं. राजकारणाची साद ऐकून ती उत्सुकतेनं जाते आणि कार्यकर्ती म्हणून घडत जाते.

 

 

एक साधी गृहिणी. स्वतःचा व्यवसाय सांभाळणारी. अचानक तिला पक्षाचं काम करायला बोलावलं जातं. राजकारणाची साद ऐकून ती उत्सुकतेनं जाते आणि कार्यकर्ती म्हणून घडत जाते.

 

"येऊन, येऊन येणार कोण? ...'
"ताई, माई, अक्का, विचार करा पक्का...'
या घोषणा लहानपणी मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात राहून मीही दिल्या होत्या; पण हायस्कूलनंतर कधी या घोषणांशी माझा संबंध आला नव्हता. या घोषणा कधी माझ्यासाठी वापरल्या जातील असे वाटलेही नव्हते. पण त्या मी नुकत्याच ऐकल्या.
मी फक्त एक गृहिणी होते. घर आणि माझा पार्लरचा व्यवसाय मी यशस्वीपणे पार पाडत होते. महिलांसाठी कमी शुल्कामध्ये कोर्सेस घेत होते. त्यांना पायावर उभे करताना खूप आनंद मिळत होता. अनेक संस्थांतर्फे मी महिला सबलीकरणासाठी झटत होते. माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण मी यश-अपयश पार पाडत पुढे जात होते. ह्यामध्ये अनेक विचारांची, स्वभावाची माणसे समोर आली. त्यांच्याशी आपुलकीचे ऋणानुबंध निर्माण झाले.

गेल्या वर्षी मार्चनंतर आयुष्यात एक वेगळे वळण आले. त्यामुळे माझा दिनक्रम एकदम बदलून गेला. ते वळण म्हणजे माझा "राजकारणा'त प्रवेश. राजकारण मला अगदीच अपरिचित नव्हते. माझ्या नवऱ्याचा त्यांच्या उमेदीच्या दिवसापासून आतापर्यंत असा तीस वर्षांचा राजकीय मंडळीत वावर आहे. त्यातील वीस वर्षे मी त्यांना साथ देत आहे. राजकारणाबाहेर राहून मी त्यांना माझ्या परीने मदत करत होते. त्यांना मिळणारा पक्षातला मान-सन्मान पाहून आनंद होत होता. घरी पक्षाच्या बैठका व्हायच्या, पक्षश्रेष्ठी यायचे. अनेक योजना ठरायच्या. ते ऐकत होते. त्यांचा पाहुणचार करत होते. या काळात अनेक आमंत्रणे-निमंत्रणे आली, पण आम्ही दोघांनी फक्त पक्षाचे काम करायचे असे ठरविले आणि वैयक्तिक जीवनाला महत्त्व दिले. पण गेल्या मार्चमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते घरी आले. त्यांनी मला पक्षात सक्रिय होण्याची विनंती केली. विनंती कसली आदेशच दिला जणू. आणि माझा राजकारणातला प्रवास सुरू झाला. राजकारणात सर्वांत महत्त्वाचे असते, ते म्हणजे तुमचे "पद'. पक्षाने मला थेट "पदाधिकारी' म्हणूनच आणले. त्यामुळे पक्षातील काही जुन्या लोकांना प्रश्‍न पडले. कोण ही, कशासाठी आली, आम्ही नव्हतो का? हा सूर फार दिवस राहिला नाही. मला त्यांनी मोठ्या मनाने सामावून घेतले.

प्रत्यक्ष पक्षात काम करू लागल्यावर माझी पक्ष नेत्यांची जवळून ओळख झाली. त्यांची भाषणे, विचार ऐकणे, त्यातून आपली बैठक पक्की करत नेणे, इतरांना विचारधारा समजावून सांगणे हे सगळे करताना मी कार्यकर्ती म्हणून घडत गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या सगळ्यांची नियोजनबद्ध दूरदृष्टी मला जवळून अनुभवता आली. यातूनच मी अधिकाधिक "सक्रिय' होत गेले; मग चालू झाले राजकीय कार्यक्रम. कधी सभा, कधी भाषणे, आंदोलन रॅली, सणवारांचे सार्वजनिक कार्यक्रम, कोपरा सभा, त्यात मी सहभागी होऊ लागले. छोट्या सभांमधून भाषणे करू लागले. पक्षानेही मी पुढे जावे व एक यशस्वी कार्यकर्ती व्हावे ह्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. मग मी उत्साहाने एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडे तिकीट मागितले.
मग चालू झाला निवडणुकीचा "रणसंग्राम.' ज्या घोषणांशी माझा संबंध नव्हता, त्या घोषणा आता माझ्यासाठी माझे सहकारी देऊ लागले. मी निवडणुकीचे काही जास्त टेन्शन घेतले नाही; पण आतून इच्छा वाढत होती. आकांक्षा होती.
पण तिकिटाच्या शर्यतीत तिकीट एकालाच मिळणार होते. आणि अगदी स्वाभाविकपणे ते मला न मिळता पक्षातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला मिळाले, अर्थात त्यातही मला आनंद झाला. कारण पक्षाने घेतलेला तो निर्णय योग्यच होता. ज्याला उमेदवारी मिळाली होती ते पक्षासाठी कितीतरी आधीपासून काम करीत आले होते. त्यामुळे माझ्या मनात आकांक्षा जागी झाली होती, तरी मी नाराज नाही झाले. राजकारणात मनातल्या इच्छा मनात ठेवून पक्षासाठी काम करायचे असते हेही शिकले आणि एक कार्यकर्ती म्हणून आमच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले. आम्ही एकदिलाने लढलो म्हणूनच यशस्वी झालो. आमच्या कर्तव्यात शंभर टक्के यशस्वी झालो असे वाटले. माझ्यातली कार्यकर्ती घडते आहे. रोज नवे काही धडे गिरवते आहे. एक शर्यत हुकली, तरी अजून पुढच्या शर्यती बाकी आहेत. मला शर्यतीत उतरायचे आहे, जिंकायचे आहे.

एक कार्यकर्ती म्हणून मी माझी कर्तव्ये पार पाडते आहे, हे समाधान मोठे आहे. राजकारणात उतरल्यावर वैयक्तिक आयुष्य आणि माणूसपणही जपते आहे. व्यक्तिगत संबंध चांगले राहतील, याचेही भान सांभाळते आहे.
मी पक्षाची एक यशस्वी कार्यकर्ती म्हणून काम करत राहीन.