तो माझ्यासाठी थांबला होता!

कर्नल अरविंद जोगळेकर
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

सगळे काही सुरळीत चाललेले असते. अचानक आपणच मृत्यूच्या दिशेने पावले टाकत जातो. काही फुटांवर मृत्यू दिसतो. तेवढ्यात पायाखाली आशेचा दगड येतो. आपण वाचतो.

सगळे काही सुरळीत चाललेले असते. अचानक आपणच मृत्यूच्या दिशेने पावले टाकत जातो. काही फुटांवर मृत्यू दिसतो. तेवढ्यात पायाखाली आशेचा दगड येतो. आपण वाचतो.

ही 1966च्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट आहे. मी उत्तरांचलातील पिथोरागड जिल्ह्यातील धाराचुला येथील मुख्यालयात संदेश वहनाचा प्रमुख होतो. तिन्ही बाजूंनी धारा म्हणजेच पर्वत व त्यामुळे त्याचा आकार एखाद्या चुलीसारखा झाला असल्याकारणाने त्याला धाराचुला असे म्हणतात. आमच्या मुख्यालयाकडे संपूर्ण उत्तर प्रदेश-तिबेट सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी होती. अर्थातच चारधाम विभागाच्या संरक्षणाचीही जबाबदारी आमच्याकडेच होती. त्यामुळे मला वारंवार चारधाम या भागामध्ये कामानिमित्त जावे लागे. या दुर्गम भागामध्ये रस्ते बांधणीची व दुरुस्तीची कामे सुरू होती. "बॉर्डर रोड टास्क फोर्स'कडून रस्ते बांधणी केली जात होती. हिमालयात बांधलेले रस्ते संपूर्ण निर्वेधक रहदारीसाठी सक्षम होण्यास दहा ते पंधरा वर्षांचा अवधी लागतो.

मी त्या पावसाळ्यात जोशी मठ येथील बेस कॅम्पकडे जोंगामधून जात होतो. या भागामध्ये दोन तऱ्हेने "लॅण्डस्लाईड' होतात. एक आहे "ड्राय लॅण्डस्लाईड'. जेव्हा पाऊस पडून गेल्यावर ऊन पडते, त्यानंतर डोंगराच्या उतारावरील जमीन वाळल्यामुळे त्यावरील मोठ्या-मोठ्या खडकांचा आधार कमकुवत होतो व ते घरंगळत खाली येतात. त्यांचा आकार प्रचंड असल्यामुळे त्यांच्याबरोबर बरीच माती व लहान-मोठे दगडही खाली येत असतात. त्यामुळे बरीच वित्तहानी व जीवितहानी होते. दुसऱ्या प्रकारच्या "लॅण्डस्लाईड'ला "वेट लॅण्डस्लाईड' म्हणतात. डोंगर माथ्यावर ढगफुटी झाल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दगड व माती खाली घरंगळत येत जाते, त्यामुळे रस्ते बंद होतात. साधारण दुपारी दोनची वेळ असेल. मी नंदप्रयाग पार करून थोडी फार पर्जन्यवृष्टी होत असताना कर्णप्रयागकडे चाललो होतो. साधारण पाच-सात किलोमीटर गेल्यावर वाहतूक थांबलेली दिसली. पुढे "वेट लॅण्डस्लाईड'मुळे रस्ता बंद झाला होता. तिथे मी जवळ जाऊन बघितल्यावर मला दिसले, की ती लॅण्डस्लाईड फक्त तीस-चाळीस फूट एवढीच आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या मदतीने बॉर्डर रोड टास्क फोर्सकडून रस्ता पूर्ववत करण्याचे काम चालू होते. या पथकांचे व लष्कराचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. मी या प्रकारच्या लहान लॅण्डस्लाईडमधून एक-दोनदा सुखरूप गेलो असल्याने मला नको तेवढा आत्मविश्‍वास होता. दिवसभर प्रवासामुळे दमल्याने तेथील एखाद्या खेड्यात रात्र काढणे माझ्या जिवावर आले होते. जोशी मठला पोचून आपल्याच बंकरमध्ये विश्रांती घ्यावी म्हणून मी पलीकडे जायचे ठरवले. मी माझा ड्रायव्हर व रेडिओ ऑपरेटर यांना रस्ता ठीक झाल्यावर येण्यास सांगितले. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. मग माझा सहायक शंभूनाथ पिल्ले याला बरोबर घेऊन निघालो.

मी व शंभूनाथने लॅण्डस्लाईड पार करायला सुरवात केली. दोर आमच्यापासून पाच ते सात फूट अंतरावर होता. चार-पाच पावले टाकून दोर पकडता येईल याची खात्री होती. पण त्या ओल्या वाहत्या मातीतून दोन पावले टाकल्यानंतर लक्षात आले की, आम्ही दोरापासून दूर जात आहोत. नदीच्या पात्राकडे घसरत आहोत. येथे अलकनंदेचे पात्र रुंद व भयानक आहे. त्याच्या प्रवाहाच्या थोडे आत जाणाऱ्यालासुद्धा तो थंड प्रवाह आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. बॉर्डर रोडचे लोक आमच्याकडे दोरखंड सरकवण्याचा खूप प्रयत्न करत होते. तेथील रस्ता नदीच्या किनाऱ्याकडूनच जात असल्याने नदीचे पात्र रस्त्याच्या खूपच लगत आहे. त्यामुळे मला आता शेवटची घटका जवळ येत आहे याची जाणीव होऊ लागली. आम्ही अजून चार ते पाच फूट खाली घसरलो असतो तर आमची जीवनयात्रा मावळल्यातच जमा होती. त्यामुळे आता खूप नेटाने पाऊल वर टाकणे एवढेच मला व माझा हात घट्ट धरलेल्या शंभूनाथला शक्‍य होते. तेवढ्यात मला माझ्या पायाखाली एक दगड लागला. अशा वेळी पायाखाली दगड सापडणे ही अत्यंत गंभीर गोष्ट होऊ शकते. कारण तो जर दगड निसटला तर तो आपल्याबरोबर आम्हालाही प्रवाहात घेऊन गेला असता; पण येथेच आमच्या आयुष्याची दोरी बळकट असावी. तो दगड मुळीच हलत नव्हता. मी नेटाने सर्व जोर लावून एक पाऊल दोरखंडाच्या बाजूने टाकल्याबरोबर माझ्या डाव्या हातात दोरखंड आला. तेवढ्यात बॉर्डर रोडचे जवान अजून एका दोरखंडाच्या साह्याने खाली उतरले. हळूहळू त्यांच्या मदतीने आम्ही दोघे सुखरूप वरपर्यंत पोचलो. आपण वर पोचलो आहोत यावर माझा विश्‍वासच बसत नव्हता. मी अजूनही मानसिकदृष्ट्या त्या प्रसंगातून स्थिरावलोच नव्हतो व भांबावूनच मी जेथून सुखरूप वर आलो त्या जागेकडे शून्य नजरेने बघत होतो. कृतज्ञतेच्या भावनेने मी खाली पाहिले तर ज्यावर पाय ठेवून मी वर चढलो, तो दगड खाली घरंगळत जाऊन नदीत विसर्जित होताना दिसला. जणू तो माझ्यासाठीच थांबला होता!