गुरुधन अतिपावन

दादा पासलकर
शुक्रवार, 21 जुलै 2017

एकलव्यासारखी ध्वनिफितीवरून भजनांची नक्कल करायला शिकलो. गुरू भेटलेही. पण त्यांनी द्रोणाचार्यांसारखा अंगठा मागून नाही घेतला. उलट कोणतेही शुल्क न घेता गळ्यात गाणे दिले.

एकलव्यासारखी ध्वनिफितीवरून भजनांची नक्कल करायला शिकलो. गुरू भेटलेही. पण त्यांनी द्रोणाचार्यांसारखा अंगठा मागून नाही घेतला. उलट कोणतेही शुल्क न घेता गळ्यात गाणे दिले.

मी फक्त कथनकार. हे कथन आहे सुनील नारायण पासलकर याचे. त्याच्याच शब्दात सांगतो.
माझी पहिली गुरुपौर्णिमा होती. उद्‌घोषणा झाली. सुनील नारायण पासलकर आपल्यासमोर भीमपलास रागातील भजन सादर करतील. मंचावर ध्वनिवर्धकासमोर बसून स्वर लावला. भजन सुरू केले. स्वर घेतानाच गुरूंना वाकून नमस्कार केला आणि भजन सुरू केले. पण सुरवातीला कोमल निशाद लागेना. मी प्रयत्न करीत होते. परंतु व्यर्थ. गुरुजी समोरूनच हार्मोनियम वादकावर कडाडले, ""अरे तो चुकला तरी त्याला जागेवर आणण्याचे यंत्र तुझ्याकडे आहे ना?'' पेटीवादक स्वतः सावरला आणि त्याने मलाही सावरले.

गुरू पंडित यादवराज फड यांची शिस्त एकपट असेल, परंतु प्रेम दहापट असते. मावळ मुलुखातील मोसे खोऱ्यातील तव हे माझं गाव. गाव संपूर्ण इतिहासाची पार्श्‍वभूमी असलेले, तर आडनाव पासलकर हे शिवभारतात अग्रणी ठरलेले. परंतु या आठवणींवर किती जगायचे? तव गाव वरसगाव धरणात गेले, मग आपण काय करायचे? घरातल्या तीन पिढ्या वारकरी संप्रदायात होत्या. माझे वडील नारायणराव श्रीपतराव पासलकर हे मृदंगाचार्य डवरी गुरुजींचे शिष्य. त्यामुळे वादन आणि भजन रक्तात घट्ट मुरलेले. बालपणापासून वडिलांसोबत भजनांचे असंख्य कार्यक्रम केल्याने अन्य काही सुचत नव्हते. परंतु पोटातील आगीसाठी कला दुरावली होती. तब्बल दहा वर्षे मी पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम केले आणि चरितार्थ चालविला. पोटाची भूक भागत होती. परंतु मनाची भूक सतावत होती.

पाषाण येथे मामांच्या घरी राहत असताना दहिभाते यांच्याकडे पूजेनिमित्त भजनाचा कार्यक्रम होता. ध्वनिफितीवरून पाठांतर केलेले भजन मी सहजसुंदर गात होतो. माझे भजन गाऊन झाल्यावर अचानक समोरच्या खोलीतून एक गृहस्थ बाहेर आले. पायजमा, झब्बा, अंगावर शाल असा पेहेराव केलेल्या त्या गृहस्थांनी विचारले, ""हे भजन तुला कोणी शिकवले?'' माझे उत्तर तयार होते. मी पंडित यादवराज फड यांच्या ध्वनिफिती ऐकून ही भजने बसविली आहेत. ""अस्स! पण मित्रा अगदी हुबेहूब नक्कल करतोस, की त्यांची, ती कशी काय?'' म्हणालो, ""आवडतात त्यांची भजने. पण मी त्यांना अद्याप पाहिले नाही.'' थोड्या वेळाने ते सद्‌गृहस्थ स्वतःच गायला बसले. तेवढ्यात शब्द ऐकू आले, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख गायक पंडित यादवराज फड आपल्यासमोर सेवा रुजू करतील. ""बाप रे हेच ते.'' मनांतून घाबरलो, पण सावरलोही लगेच. डोळ्यात, कानात, मनात सर्वत्र ते गाणे मी साठवीत होतो. कार्यक्रमानंतर मी गुरुजींचे पाय मस्तकी लावले. त्यांनी आशीर्वाद दिला, उठवून मला छातीशी कवटाळले. माझे डोळे पाणावले होते. मला पत्ता दिला. घरी बोलावले आणि रीतसर शास्त्रीय संगीताचे धडे सुरू झाले. माझ्याकडे गुरुजींची शिकवणी देण्याइतपत पैसे नव्हते, त्यावर गुरुजींचे उत्तर होते, ""सुनील, तुझ्या एका खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका असेल, तर दुसऱ्या खांद्यावर किराणा घराण्याच्या गायकीची गुढी असेल. ती उंच उंच ने, सर्वदूर ने आणि गळ्यात सच्चे, निकोप सूर असू दे, तीच माझ्या शिकवणीची फी असेल.''

दहा वर्षांच्या अथक शिकवणीनंतर गुरुजींनी मला मैफिलीत गाण्याची परवानगी दिली. नुसती परवानगी दिली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होतात, त्या प्रत्येक ठिकाणी गुरुजींनी मला पेश केले, अनुभव दिला. सवाई गंधर्व संगीत महोत्सव व्यासपीठावर गुरुजींची तंबोऱ्यावर साथ करताना मी अनुभवला आहे. श्रीक्षेत्र चाकरवाडी शास्त्रीय संगीत महोत्सव, आकाशवाणी, दूरदर्शन येथेही गुरुकृपेने गानसेवा करू शकलो. गुरू आज्ञेने शास्त्रीय संगीताच्या शिकवण्या घेऊन प्रपंच चालविला आहे. मावळ भागात भजन, भारूड जोरात चालते. मात्र आम्ही थोडी रागदारी गायला लागलो, की श्रोते गायब. नुसती भजने, गौळणींचा आग्रह. परंतु गुरुआज्ञा प्रमाण मानून आलेला प्रेक्षक धरून ठेवण्याची किमया घशातूनच बाहेर काढायची.

अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन व्यवस्थापनातून खूप शिकता आले. त्यातूनच मिळालेला गीत नृत्य वाद्य पुरस्कार, वारकरी भूषण पुरस्कार, शिवश्री पुरस्कार मला चैतन्य देतात. गुरुजींनी माझ्या दोन तपांच्या शिकवणीनंतर मला दिलेला रौप्य महोत्सवाचा आशीर्वाद, संगीतसाधनेचा प्रसाद, शिस्त, रियाज, वेळ यांची शिकवण, सच्च्या सुरांची देणगी हे सारे सारे मला आयुष्याच्या प्रत्येक पावलांवर सोबत करणारे ठरणार आहेत. गुरुजींनी माझ्याकडून संगीत साधनेशिवाय कोणतीही फी घेतली नाही. मात्र माझ्या परिस्थितीकडे आणि प्रपंचातील प्रत्येक क्षणांकडे लक्ष ठेवून मला प्रत्येक कार्यक्रमाचे भरपूर मानधन मात्र दिले. परंतु इदं न मम। कारण "दान करी रे गुरुधन अतिपावन'. मला पावन व्हायचे आहे.