खरे समाधान (मुक्‍तपीठ)

dhanshree-joshi
dhanshree-joshi

डिसेंबर महिन्यात शाळा-शाळांमधून एक नवचैतन्याची लहर निर्माण होते. वार्षिक स्नेहसंमेलनाची गडबड सुरू होते. चौदा विद्या, चौसष्ठ कलांचे संमेलन, प्रदर्शन, कला, क्रीडा स्पर्धा, वर्गावर्गांचे कार्यक्रम, आनंदमेळा, अल्पोपाहार अशा अनेक कार्यक्रमांनी संमेलन बहारदार ठरते. या काळात विद्यार्थिनींमधील अनेक सुप्तगुण, कला लक्षात येतात आणि कळत न कळत अध्यापक व विद्यार्थिनी यांच्यात वेगळे जवळकीचे नाते निर्माण होते. अभ्यास, पेपर, वह्या या सगळ्यांतून जरा बाहेर पडून मिळणारा आनंद दर वर्षी नवीन उत्साह निर्माण करणारा असतो. नेहमी प्रमाणेच याही वर्षी स्नेहसंमेलनासाठी वर्गावर्गाच्या ‘डान्स’चे विषय सांगितले गेले आणि विद्यार्थिनींमध्ये एकच चर्चा सुरू झाली, गाणे कोणते निवडायचे? कोणाकोणाला घ्यायचे? डान्ससाठी मुली निवडणे हे मोठे कठीण काम, कारण प्रत्येकीलाच सहभाग घ्यायचा असतो, या वेळी खरी कसोटी असते ती वर्गशिक्षिकेची! अशीच एक घटना मनात कायमचे घर करून राहिलेली. 

मी नववीची वर्गशिक्षिका होते. नृत्यातले मला फारसे काही कळत नाही. माझी अट एकच असते ती म्हणजे गाणे चांगले अर्थपूर्ण असावे आणि गाण्यावर शालेय स्तरावर शोभतील अशा ऍक्‍शन्स असाव्यात. त्या वर्षी कोळी नृत्य होते. उत्तम बसले होते; पण एक जण नीट नाचत नव्हती. ताल, डावे-उजवे तिला कळतच नव्हते. एकंदरीतच सगळा घोटाळा होता. बाकी सगळ्या उत्तम नृत्य करत होत्या. वर्गाच्या सेक्रेटरीने माझ्याजवळ येऊन त्या मुलीला काढून टाकण्याची मागणी केली. जवळच्या चार-पाच जणीनींही होकार भरला. ती मागे एकटीच उभी होती. तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. मी वर्गाबाहेर पडले, तशी ती धावत धावत माझ्याजवळ आली, ""बाई, त्या तुम्हाला काय म्हणाल्या? मला काढून टाका असे बोलल्या ना?'' ""नाही गं; पण तूसुद्धा जरा लक्ष दे ना, नीट कर, तुला करायचेय ना?'' ""बाई, मी खूप प्रयत्न करते; पण मला जमत नाही इतरांसारखे, मग भीती वाटते आणि ऍक्‍शन चुकते.'' ""तू नीट कर, तुला नाही काढणार, उद्या न चुकता करून दाखवायचे.'' ""हो बाई, मी प्रयत्न करते.'' दुसऱ्या दिवशीही पहिले पाढे पंचावन्न! बाई, तिला काढा, तिच्यामुळे बाई सगळ्या वर्गाचाच डान्स नीट होत नाही, ती खूप चुकते बाई! इतर विद्यार्थिनींची एकच मागणी. मला खरे तर ते पटत होते, कारण वर्गाचा डान्स उत्तम होणेही आवश्‍यक होते. काहीतरी करायला हवे होते, तिला कसे सांगायचे हा माझ्यापुढचा मुख्य प्रश्‍न होता. टीचर्सरूमपाशी ती मला भेटायला आली, ""बाई, मला तुम्हाला काही सांगायचेय.'' ""हं, बोल.'' ""मला काढू नका ना डान्समधून. बाई, मी पाचवीपासून स्वप्न बघत आहे, मला स्टेजवर डान्स करायचा आहे. मला माहीत आहे की मी चुकते, मला जमत नाही; पण या वर्षी नाही तर मला कधीच डान्स करता येणार नाही, पुढले दहावीचे वर्ष. माझीही एक इच्छा आहे, बाई, प्लीज मला स्टेजवर नाचायचेय, '' तिच्या डोळ्यात पाणी होते. हा तिढा सोडवणे कठीण होते. 

वर्गातील डान्समधील प्रमुख विद्यार्थिनींना बोलावून घेतले. त्यांच्याशी बोलले, ""हे बघा, तुम्ही पाचवी ते नववी एका वर्गात आहात, एकमेकींच्या मैत्रिणी आहात, हाताची पाचही बोटे सारखी नसतात, प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते, तरीही ती एकत्र येऊन उत्तम काम करतात, आपल्या वर्गाचा डान्स उत्तम झाला पाहिजे आणि तो सर्वांनी एकत्र मिळून केला पाहिजे. एखाद्या मैत्रिणीला कायमचे दुखवून मिळालेले यश काय कामाचे? आपण तिला डान्समध्ये घेऊ. तिचे स्वप्न पूर्ण करायला हातभार लावू. त्यात खरे समाधान आहे. काही जणींना माझे म्हणणे पटले, ""चालेल बाई, आपण तिला घेऊ, आम्ही तिला शिकवतो.'' ""बाई, ती कशीही नाचली तरी चालेल, आम्ही तिला सांभाळून घेऊ.'' तिला डान्समध्ये घेतले. 

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. सर्व मैत्रिणींबरोबर साडी नेसून, मेकअप करतानाचा तिचा उत्साह अवर्णनीय होता. वर्गाचा डान्स सुरू झाला. माझे सर्व लक्ष नकळत तिच्याकडे होते. ती चुकत होती, सावरत होती, मनापासून नाचत होती. बाकी मैत्रिणींनी चुका सावरत तिला साथ दिली. डान्स झाल्या झाल्या ती नाचतच माझ्याकडे आली. माझ्या पाया पडली, ""बाई, कसा झाला माझा डान्स?'' ""उत्तम, फारच छान!'' असे म्हणताच तिचे डोळे पाण्याने भरले. ""आज मी प्रथमच स्टेजवर नाचले. माझे स्वप्न पूर्ण झाले. बाई, केवळ तुमच्यामुळे. हे वर्ष मी कधीही विसरणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनासुद्धा. मला खूप आनंद झालाय. '' तिच्या चेहऱ्यावरचे समाधान मला खूप काही शिकवून गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com