ऑपरेशन आयएसआर

डॉ. चित्रलेखा पुरंदरे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अंधांनाही चित्रं "पाहता' येतील? त्यांच्या अंतर्चक्षूनी ती समजावून घेता येतील? कॅनव्हासवरच्या रंग-रेषांतील संवेदन स्पर्शातून पोचेल? ही किमया एका चित्रकाराने साधली आहे.

अंधांनाही चित्रं "पाहता' येतील? त्यांच्या अंतर्चक्षूनी ती समजावून घेता येतील? कॅनव्हासवरच्या रंग-रेषांतील संवेदन स्पर्शातून पोचेल? ही किमया एका चित्रकाराने साधली आहे.

दोन लहान मुलं हत्यारबंद सैनिकांना फुलं देत आहेत. सीमेवरील कुंपणाच्या काटेरी तारा नजरेत भरणाऱ्या. मध्यभागी पृथ्वीचा गोल...
ते चित्रं पाहिलं आणि भारत-पाक सीमेवर "फिरोजपूर बॉर्डर'वर कमांडिंग चार्ज हनुमतसिंग व तिथे असलेल्या सगळ्या सैनिकांचे डोळे पाण्यानं भरले! चित्राच्या डाव्या-उजव्या बाजूचा "मोर्स'सारख्या लिपीतला मजकूर सतीश वाचत होता. सगळ्यांची मनं हेलावून गेलेली. तेवढ्यात त्यानं पाकिटातून तिरंगा काढला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम चमक आली. फिरोजपूर कॅम्पच्या मध्यभागी मोठ्या दिमाखात तिरंगा रोवला आणि सगळ्यांनी "भारत माता की जय' म्हणून वातावरण दुमदुमवून टाकलं.

चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी हे चित्रं तयार केलेलं. हसबनीस पुण्याच्या नूमवित शिकलेले. पोट्रेट पेटिंगमधले "मास्टर' म्हणावेत असे. त्यांनी "क्‍लोज आइज ऍण्ड ओपन माइन्ड' ही पेंटिंग्ज मालिका केली आहेत. डोळसांबरोबर अंधांनाही चित्रं पाहता यावीत, हाच उद्देश. हा विचारच किती विलक्षण! त्या चित्रांवर त्यांनी ब्रेलमधून मजकूर लिहिलेला. त्यासाठी ते ब्रेल शिकले. त्यांच्या या चित्रांची पुणे, नागपूर, आनंदवन आणि मुंबई येथे प्रदर्शनं भरवली गेली.

एक दिवस त्यांना कोल्हापूरहून दूरध्वनी आला. तो ऐकून त्यावर कसं व्यक्त व्हावं हेच त्यांना कळेना. कोल्हापूर, भुसावळ, पुणे, सातारा इथून हनुमंत जोशी, सतीश, प्रवीण, शर्वरी, सविता आणि बिलावल असे सहा जण-त्यातले चार जण पूर्ण अंध आणि दोघे त्यांचे मार्गदर्शक, दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कपडे, फराळ बरोबर घेऊन जातात. प्रसंगी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचीही इच्छा सैनिकांजवळ ते बोलून दाखवतात. तर एकदा त्यांच्या मनात आलं, मणीदादा अंधांसाठी पेंटिंग्ज करतो तर, त्याच्याकडून असं एखादं पेटिंग जवानांसाठी करून घेऊन तेही सीमेवर घेऊन जावं. आपल्या अंधाऱ्या आयुष्यात मणीदादाच्या चित्रांनी एक वेगळा "प्रकाश' आणला. जवानांच्या दिवाळीचा आनंदही चित्रामुळे द्विगुणित होईल! अशा आशयाचा तो दूरध्वनीवरील संदेश ऐकून हसबनीस चक्रावूनच गेले. अंध व्यक्ती सीमेवर जातात काय... जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात काय आणि फराळ, कपड्यांबरोबर आता त्यांना चित्रही घेऊन जावं वाटतं... माणुसकीच्या संवेदना अशाही असतात? आणि मग हसबनीस या विचारानं झपाटून गेले. चित्र कसं असावं याबद्दल रात्रंदिवस सतत विचार... मग ते तयार झालं. ते हजारो मैल लांबवर न्यायचं कसं याचा विचार... हातातला वेळ अगदी कमी. पण तरीही एक उत्तम कलाकृती तयार झाली. ती या सहा जणांनी मोठ्या परिश्रमांने सैनिकांपर्यंत पोचवली. त्यांनी ती पाहिली. त्यांना झालेला हजारो फूट उंचीचा आनंद त्यांनी त्या चित्राबरोबर हसबनीसांना पाठवला.

ते चित्र नुकतंच फर्ग्युसन महाविद्यालयातील प्रदर्शनात मांडलं होतं. शेकडो अंधमित्रांनी आणि डोळसांनीही ते पाहिलं. हसबनीसांना अंधांसाठी पेटिंग्ज करावीत, त्यांनी ती स्पर्शानं... नव्हे त्यांच्या मनाला असलेल्या संवेदनांच्या नेत्रांनी ती पाहावीत म्हणजे ज्ञानदेवांच्या भाषेत "आरिसे उठिले लोचनांसि'... हे सगळं असं सुचणं, तशी चित्रं प्रत्यक्षात काढणं, हे सगळं अविश्वसनीयच. या चित्राबद्दल त्यांनी एक वेगळा विचार केला. त्याबद्दल ते सांगत होते, ""माझ्या या चित्रानं इतिहास घडवला. "फर्ग्युसन'मध्ये आम्ही अंध मित्रांसाठी चित्र आकलनाची एक स्पर्धा घेतली. माझं "बॉर्डर' हे पेंटिंग त्यांनी पाहावं आणि ते पाहून त्यांना काय समजलं, काय वाटलं हे मग त्यांनी ऑडिओ अथवा ब्रेलमधे लिहून आयोजकांकडे पाठवायचं होतं. सुमारे पासष्ट अंध मित्रांनी हे पेंटिंग पाहिलं. सोळा जणांनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेतला. "अंधांना पेंटिंग समजतात का?' अशी पुसटशी शंका मनात असेल, त्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मारोती इंगळे यांनी केलेलं रसग्रहण जरूर ऐकावं. मारोती "फर्ग्युसन'मध्ये "टीवाय बीए'ला आहेत. ते म्हणत होते, "हसबनीस सरांनी चित्र वाचायला नव्हे, जगायला-वागायला शिकवलं. त्यांचं चित्रं उच्च वैचारिक पातळीवरचं. बापूंनी (महात्मा गांधी) सांगितलेली राष्ट्रद्रोहाची सात पातके त्यावर ब्रेलमध्ये आहेत. खूप काही शिकवणारी. ती अर्थपूर्ण वाक्‍यं मी कधीही विसरू शकणार नाही. त्या वाक्‍यांतून भारताचं जगाच्या पाठीवरचं अग्रस्थान लक्षात येतं. त्या चित्रातील पृथ्वीवर भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवता आला... धन्यता वाटली.' मारोतीचे हे रसग्रहण ऐकून "ऑपरेशन आयएसआर' (इन्डिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) यशस्वी झाल्याची भावना हसबनीसांच्या मनात दाटून आली... दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे अंध असलेल्या मारोतीनं केलेलं हे रसग्रहण तेही केवळ स्पर्शानं... थरारून टाकणारा अनुभव होता तो! वातावरण भारावलेलं... हॉलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रूंची दाटी झालेली. कोण डोळस आणि कोण अंध... विचारांचा मनात गोंधळ.

कुणाकुणाचं कौतुक करावं? संवेदनशील, कविमनाच्या चित्रकार हसबनीसांचं तर नक्कीच. त्यांना आलेले असंख्य अनुभव थक्क करणारे! अशी चित्रं काढण्याचं वेड लागावं लागत,ं म्हणजे त्या वेडातून इतिहास घडतो...