सायकल रेस

muktapeeth
muktapeeth

सहा घाट. साडेसहाशे किलोमीटर. विनाथांबा अडतीस तास सायकल प्रवास.... ऐकणारा थक्क होतो; पण ते कठीण नाही. मी केलेय पूर्ण. मित्र होते प्रोत्साहन द्यायला, काळजी घ्यायला; पण शेवटचा तासभर प्रवास अटीतटीचा गेला आणि एक मिनीट राखून रेस पूर्ण झाली. आयुष्यातील मिनिटाची किंमत त्या वेळी कळली.

नुकतीच पुणे ते गोवा अशी डेक्कन किल्फहॅंगर सायकल रेस झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या रेसमध्ये एकट्याने विनाथांबा साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अडुतीस तासांमध्ये पूर्ण करावे लागते. मी दीड वर्षापूर्वी सायकलिंगला सुरवात केली. त्याआधी आठवीत असताना जेवढी सायकल चालवली होती तेवढीच. परत काही माझा आणि सायकलचा संबंध आला नाही. ट्रेकिंग सोडले तर माझा कोणत्याही खेळाशी दुरूनही संबंध आला नाही. नव्वद किलो वजन असूनही आणि रोज दहा-बारा तास एसीमध्ये निवांत बैठे काम करण्याची दिनचर्या असूनही बरोबर एक वर्षापूर्वी ही शर्यत पूर्ण करायचा विडा उचलला. हा लढा माझ्यामधल्या आळसाशी आणि जडत्वाशी होता; मग रोज चाळीस ते पन्नास किलोमीटर हडपसर-यवत हडपसर असा सायकलवरून सराव सुरू होता.

पहाटे पाचला पिरंगुटहून रेस सुरू झाली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात पसरणीचा घाट कधी आला ते कळालेच नाही; मग ऑक्‍टोबर हिट जाणवू लागली. मला मदत करण्यासाठी सहा जणांची एक सर्पोर्ट टीम आणि दोन चारचाकी गाड्या माझ्यामागे होत्या, त्यांना इशारा करताच बर्फाच्या पाण्याचे फवारे गार्डनपंपाने मारायला त्यांनी सुरवात केली. त्यामुळे आठ किलोमीटरचा घाट सुसह्य झाला. पाचगणी मागे टाकल्यानंतर अचानक वातावरण बदलले आणि महाबळेश्वरमध्ये जे बर्फाचे पाणी आल्हाददायक वाटत होते तेच आता हुडहुडी भरणारे वाटू लागले. विशेष म्हणजे मेढा घाट उतरल्यानंतर पुन्हा कडाक्‍याचे ऊन जाणवू लागले. साडेसहाशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याकरिता हा एक वळसा घ्यावा लागला होता.

दुपारी तीन वाजता सातारा शहरात प्रवेश केल्यानंतर महामार्गावर सातारकर मित्रमंडळी फुले घेऊन हजर होती. त्यामुळे त्या उन्हातही प्रेमाचा गारवा मिळाला. साताऱ्यानंतर आता माझा आवडीचा टप्पा सुरू झाला. सातारा ते धारवाड हे तीनशे किलोमीटरचे सपाटीचे अंतर आम्हा सायकलस्वारांना फार आवडते. कारण मागच्या घाटात ( कात्रज-खंबाटकी-पसरणी) जो वेग कमी झाला होता. तो आता पुन्हा वाढवता येणार होता; पण एक समस्या उद्भवली. माझ्या सायकलच्या पॅडलची किल्प कोल्हापुरात तुटली. सायकल परदेशी बनावटीची असल्यामुळे क्‍लिप कोल्हापुरात बदलता येत नव्हती. त्यामुळे उरलेले साडेतीनशे किलोमीटर फक्त उजव्या पॅडलवर जावे लागणार होते. रात्री निपाणी आणि बेळगाव या अंतरात हाडे गोठवणारी थंडी होती. त्यामुळे झोपसुद्धा अनावर झाली होती. पूर्ण अडतीस तासांत अजिबात न झोपता संपूर्ण अंतर कापण्याची टीमची योजना होती. त्यानुसार सपोर्ट टीमने हत्यारे बाहेर काढली. अफ्रिकन ड्रम, झांज, गावठी ताशा, डमरूसह टीम रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरली. चढावर उभी राहून आमची डॉक्‍टर मंडळी वाद्यांच्या जल्लोषात मला प्रोत्साहन देऊ लागली. आणि एकदाचे पहाटेचे पाच वाजले. सूर्यनारायण आपल्या सोनेरी छटा दाखवू लागले. पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर पडू लागले. आत्तापर्यंत चोवीस तास विनाथांबा सायकल चालवून आलेला थकवा, भूक, वेदना, नैराश्‍य, कुठल्याकुठे पळाले. सूर्याचा प्रकाश पसरला.

सकारात्मकता पसरली आणि वेगही दुपटीने वाढला. आत्मविश्वास दुणावला. सकाळी दहाला धारवाड गाठले. दर शंभर किलोमीटरला टीम फिजिओथेरपीस्टकडून स्ट्रेचेस करून घ्यावे लागत होते. एकूण सहा घाटांमधले सत्तर किलोमीटर चढाचे अंतर माझ्या सपोर्ट टीमने आळीपाळीने माझ्याबरोबर पळून काढले होते.
दर तासाला मला देण्यात येणाऱ्या पाणी, प्रोटीन शेक आणि अन्न याचा आढावा टीमकडून घेतला जात होता.

सकाळी अकरा वाजता व्याघ्र प्रकल्पातील चढाचा थरार सुरू झाला. माझ्या नव्वद किलो वजनाचा मला आत्ता खूप राग आला. टीम पुन्हा गाडीतून उतरून माझ्याशी गप्पा मारत पळू लागली. आयोद घाट उतरल्यानंतर माझा उजवा गुडघा खूपच दुखू लागला. कारण डावी पॅडेल क्‍लिट काम करत नसल्यामुळे त्याच्यावर भार आला होता. गोव्यातल्या उंचसखल रस्त्यावर शेवटी सायकल पळविताना ताकदीचा कस लगाला. त्या रस्त्यांच्या चढांच्या कात्रीत मी चांगलाच सापडलो. आपल्या शरीरातही काही अधिकची शक्ती असते याचा प्रत्यय आता आला. सहाशे किलोमीटरमध्ये मला जो वेग मिळाला नाही, तो शेवटी थकूनही दुपटीने मिळाला. शेवटचे अटीतटीचे असे एक तासाचे अंतर अगदी उभे राहून पार पडले. अखेर मी शर्यत 37 तास 59 मिनिटांत पूर्ण केली. खरं सांगतो, एका मिनिटाची किंमत मला त्याक्षणी कळली. अडतीस तासांचा कट ऑफ होता. त्या एका मिनिटावर मी शेवटी विजय मिळवला. वर्षभराची मेहनत फळाला आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com