एकेकाचे स्वप्न!

यशवंत भागवत
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मला खरे तर रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर व्हायचे होते. धुरांच्या रेषा हवेत काढीत, मोठमोठ्याने हॉर्न वाजवत धडधडत वेगाने गाडी न्यायची, असे स्वप्न होते. ते काही पुरे झाले नाही. वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअर झालो; पण महाविद्यालयात रेल्वे हा विषय शिकवून इच्छा पुरवून घेतली.
 

लहान असताना माझी स्वप्ने भारी असायची; पण माझ्या वडिलांना ती आवडायची नाहीत. माझे वडील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्‍टर होते. पुण्यातील कॅंपातल्या एका थिएटरचे कसले तरी काम आम्ही करत होतो. त्यामुळे चित्रपट चालू नसताना आम्हाला प्रोजेक्‍टर रूम आणि स्टेजमागेही प्रवेश असायचा. खेळ सुरू व्हायच्या वेळी काम बंद करावे लागायचे. आम्हाला ओळखीमुळे चित्रपट फुकट पाहायला मिळायचा. मी एकदा वडिलांना म्हणालो, ""अप्पा, तुम्ही डोअरकीपर झाला असता तर फार बरे झाले असते. आम्हाला रोज फुकट चित्रपट पाहता आला असता..'' त्यांनी त्या वेळी ठेवून दिलेली एकच थप्पड पुरेशी होती. त्यामुळे मग मी माझे रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर व्हायचे स्वप्न कधीच कुणाला सांगितले नाही. अमेरिकेत त्याला "इंजिनिअर' म्हणतात. वडिलांना स्वतःला गरिबीमुळे इंजिनिअर होता आले नाही. निदान मी तरी त्यांचे स्वप्न पुरे करावे, असे त्यांना वाटले असेल.
शाळेत असताना आगगाडीच्या प्रत्येक प्रवासात गाडीचा मुक्काम जिथे जास्त वेळ असेल, तिथे मी डब्यातून उतरून इंजिनजवळ जाऊन बारकाईने निरीक्षण करत असे. धुरातून बाहेर पडलेले कोळशाचे कण केसात जाऊ नयेत म्हणून वाफेच्या इंजिनाचा ड्रायव्हर नेहेमी डोक्‍याला रुमाल बांधत असे. कोळशाच्या टेंडरमधला दगडी कोळसा फावड्याने सतत बॉयलरमध्ये फेकणाऱ्या, डोक्‍याला रुमाल बांधलेल्या कर्मचाऱ्याचे मला फार कौतुक वाटायचे, त्याची हालचाल यंत्रासारखी असायची. एकदा फावडे कोळशाच्या ढिगात मारायचे आणि फिरून तो कोळसा धगधगणाऱ्या बॉयलरच्या उघड्या तोंडात फेकायचा. स्टेशनजवळ राहणाऱ्या झोपड्‌पट्टीवासीयांची मजा असायची. सकाळी आठच्या सुमाराला जर गाडीचा थांबा असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पत्र्याच्या बादल्या रांग लावून तयार असायच्या. खरं तर ही इंजिन ड्रायव्हरची मेहेरबानी असायची. तो गरम पाणी ओव्हरफ्लोमधून बादल्यात सोडायचा. वाफेच्या इंजिनाची शिट्टी वाफेवरचीच असायची. लोंबती दोरी ओढली की शिट्टी वाजायची. गाडी सुरू होताना समोरचा आडवा दांडा खाली दाबला की गाडी हलायची. मग खूप वाईट वाटायचे. मधल्या स्टेशनवर इंजिनात कमी झालेले पाणी भरण्याचे जाड स्टॅंड (उभे पाइप) असायचे. त्यांच्या तोटीला हत्तीच्या सोंडेसारखा होज पाइप लावलेला असायचा.
इंजिनाच्या पुढे लोखंडी अँगलची एक जाळी बसवलेली असते. त्यामुळे एखादे जनावर समोर आले, की ते रेल्वेमार्गाबाहेर फेकले जाते आणि त्याचा प्राण वाचतो. त्याला "काऊ कॅचर' म्हणतात. गाडी सुरू होताना जास्त शक्ती लागते. कित्येकदा इंजिनाची चाके जागेवरच गरागरा फिरतात, मग रूळ आणि चाकांमधले घर्षण वाढविण्यासाठी इंजिनाच्या पाइपातून बारीक वाळू दोघांमध्ये सोडतात. दुसरी गोष्ट अशी, की आपण जेव्हा डब्यातली साखळी ओढतो तेव्हा ब्रेक सिस्टीममध्ये हवा शिरते आणि ड्रायव्हर आणि गार्डला कळते, ब्रेक लागतात. गार्डला कुठून साखळी ओढली ते बरोबर कळते, ज्या डब्याची वरची पट्टी फिरली तिथून साखळी ओढली हे समजते. आणखी एक गंमत म्हणजे लाइन क्‍लिअरचा गोळा. सिंगल लाइनवर अपघात होऊ नये म्हणून मागच्या आणि पुढच्या स्टेशनात गाडी नाही ना याची खात्री करणारा गोळा बॅडमिंटन टाइप रॅकेटमध्ये बसवलेला मला पाहायला मिळायचा. तो घेतल्याशिवाय ड्रायव्हर पुढे जाऊच शकायचा नाही. मला इंजिनात बसून प्रवास करायची संधी एकदा मिळाली होती. त्या प्रवासात जरी थ्रिल होते, तरी तो प्रवास सुखाचा नव्हता. भयंकर धड धड!
डेक्कन क्वीनची गंमत न्यारीच! पुण्याकडे जाताना घाटात कर्जतला गाडी चढावर ढकलण्यासाठी बॅंकर (बॅंक म्हणजे चढ) इंजिन मागे लावले जाते. त्याचे नाव "सर रॉजर लम्ले' असे होते. मुंबईच्या गव्हर्नरपदी हा होता. ते इंजिन पाहिल्यावर "सर रॉजर लम्ले राजाला नमले' असे शाळेत वाचलेले विधान आठवायचे. हे बॅंकर इंजिन लावले नाही आणि डब्यांचे कपलिंग तुटले तर डबे मागे उतारावर घसरू शकतील. तसे होऊ नये म्हणूनही बॅंकरचा वापर केला जातो. हे इंजिन लोणावळ्याला काढले जाते. अमेरिकेत लांब गाड्या ओढायला चार चार इंजिने पुढे लावतात, उताराला ब्रेकसारखा इंजिनांचा उपयोग केला जातो. इंजिनाला स्टिअरिंग व्हील नसते. रूळ गाडी वळवतात, त्यासाठी केबिनमधून दांडे हलवून रूळ हलवले जातात. मगच सिग्नल दिले जातात. त्यात गफलत होऊ नये म्हणून सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग पद्धत वापरतात. रेल्वे हा एक स्वतंत्र विषय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आहे. तो मी शिकवत असे. म्हणजे अमेरिकन भाषेत मी इंजिनिअर झालो. माझे स्वप्न पुरे झाले.

 

मुक्तपीठ

नदीकाठावर ढोल-ताशाचा सराव जोरात सुरू आहे. घराच्या ओढीने निघालेली वाहनेही रेंगाळत आहेत. ठेका तालबद्ध असेल तर थिरकणारी पावलेसुद्धा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

व्यवहार रोजचाच. विंदा करंदीकरांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘तेंच ते आणि तेंच ते.’ कंटाळवाणे रहाटगाडगे. पण एखादा थोड्या वेगळ्या...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

भावासाठी राखी पाठवायचे म्हटले की बहिणीला बाकी काही सुचत नाही. रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीची शिस्त काही लक्षात येत नाही. हातून नकळत...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017