अल्लाहचा दूत

जसू पंजवानी
गुरुवार, 29 जून 2017

रिक्षावाले नकार देत निघून जात होते, तीच एक रिक्षा थांबली. त्याने हात देत रिक्षात बसवले. घरापाशी सोडल्यानंतर भाड्याचे पैसेही नाकारले. अल्लाचा आशीर्वाद मिळेल, त्यासाठी दुवा मागितली त्याने. आमच्यासाठी तो अल्लाचा दूत होता.

रिक्षावाले नकार देत निघून जात होते, तीच एक रिक्षा थांबली. त्याने हात देत रिक्षात बसवले. घरापाशी सोडल्यानंतर भाड्याचे पैसेही नाकारले. अल्लाचा आशीर्वाद मिळेल, त्यासाठी दुवा मागितली त्याने. आमच्यासाठी तो अल्लाचा दूत होता.

कोणताही व्यवसाय बदनाम होतो तो त्या व्यावसायिकांमुळेच. त्यातील काही जणच अयोग्य वागतात; पण सगळा व्यवसाय बदनाम होतो. उदाहरणार्थ, पुण्यातले रिक्षावाले. एखाद्या रिक्षाचालकाला अमूक ठिकाणी जायचे आहे, येणार का, असे विचारल्यावर रिक्षाचालक आढेवेढे न घेता लगेच तयार होतो, यावर कुणाचा विश्‍वास बसेल का? पुणेरी रिक्षाचालक म्हटले की, वेठीस धरणारा, मीटरप्रमाणे भाडे न घेता तोंडाला येईल ते भाडे सांगून तडजोडीची भाषा करणारा, बोलण्यात आक्रमक व उद्धट असेच चित्र नजरेसमोर येते; पण त्यालाही अपवाद असतात. मग रिक्षावाल्यांमध्येही माणुसकी असल्याची जाणीव होते, ते देवदूत असल्याची भावना मनात येते.

कडक उन्हाळा. ऊन चांगलेच जाणवत होते. मी रुग्णालयाच्या कर्करोग विभागातून केमोथेरपीची ट्रीटमेंट घेऊन बाहेर येत होतो. चालताना इतका अशक्तपणा जाणत होता की, मी कोणत्याही क्षणी तोल जाऊन पडेन याची भीती वाटत होती. मी काठी टेकत टेकत येत असल्याचे पाहून दरवाज्याजवळ उभा असलेला एक रिक्षाचालक तत्परतेने पुढे आला. अदबीने पुढे वाकून मृदू आवाजात विचारले, ""साहेब, कुठे जायचे?'' माझ्यासाठी हा धक्काच होता. एखादा रिक्षाचालक असा नम्र वागू शकतो; पण हा धक्का काही वेळासाठीच होता. जवळची खूण सांगत मला कॅंपमध्ये जायचे आहे, असे म्हणताच, त्वरित तोंड वेंगाडत जितक्‍या अदबीने पुढे आला होता, तितकाच तिरस्कारपूर्वक तोंड फुगवत नकार देत तेथून निघून गेला. तेथेच उभा असलेला दुसरा रिक्षाचालक लांब पल्ल्याच्या भाड्याची प्रतीक्षा करत होता. पहिल्याला पाहून तोदेखील नकार देत बाजूला सरला. या दोघांना पाहून तिसऱ्याने तर लांबूनच हातवारे करत नकार दिला आणि हे तिघे जण खुशालपणे गप्पा मारण्यात रमून गेले. मला या रिक्षाचालकांच्या अशा वागण्याची सवय झाली आहे. हे असंवेदनशील लोक पुणेकरांच्या सहनशीलतेची जणू सत्वपरीक्षा घेत असतात.

पायात पुरेशी शक्ती नव्हती. केमोथेरपी झाल्याने गठाळून गेलो होतो; पण रिक्षा मिळेना, म्हणून अगदी धीमेपणाने रस्त्यावरून चालत होतो. कुठे तरी वाटेत रिक्षा मिळेल अशी आशा होती. नाहीतर घरापर्यंतचे अंतर कसे काटायचे, हा प्रश्‍नच होता. तेवढ्यात एका रिक्षाचालकाने रिक्षा थांबवून मला विचारले, ""साहब, किधर जाने का है?'' मी अगोदरच वैतागलेलो होतो. म्हणालो, ""हात जोडतो बाबा. तूदेखील इतर रिक्षावाल्यांप्रमाणे जवळचे भाडे नाकारून निघून जाशील आणि आमच्या जखमेवर मीठ चोळशील.'' तरीही त्याने आग्रहाने "बताईए साब' असे म्हटल्यावर खालच्या आवाजात म्हणालो, ""कॅंपमध्ये जायचे आहे. येणार का?'' त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. आम्हा दोघांना रिक्षात व्यवस्थितपणे बसवून घेतले. मला आधार दिला. आमची बॅग व काठी आमच्याकडे सुपूर्द करून म्हणाला, ""साहब, टेन्शन नही लेनेका, मैं तुमको सहिसलामत घर पहुचाएंगा, आप आरामसे बैठो.'' नंतर कसलीही घाईगडबड नसल्यासारखी त्याने मला त्रास होणार नाही, याची काळजी घेत रिक्षा चालवली. रस्त्यावरचे खड्डे सावधगिरीने चुकवित आम्हाला आमच्या घरी एकदाचे सुखरूपपणे पोचवले.

खिशातून पाकीट काढत म्हणालो, ""बाबारे, खूप काळजी घेऊन आणलेस. किती पैसे देऊ?'' त्यावर अगदी नम्रपणे हात जोडून म्हणाला, ""साहेब, मी तुमच्यावर काही उपकार केलेला नाही. मी रोजा सोडण्यासाठी याच रस्त्याने घरी कोंढव्याला जात होतो, तुमचे घर रस्त्यावर आहे, तुम्हाला हळूहळू जाताना पाहून तुम्हाला होत असलेल्या यातना तुमच्या चेहऱ्यावर साफ दिसत होत्या. यामुळे मनात दयाभाव आला.'' असे म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. ""हा आमचा रमजानचा पवित्र महिना आहे, साहेब. तुमची अशाप्रकारे सेवा केल्यामुळे माझा अल्ला मला जन्नत प्रदान करेल. म्हणून मीच तुमचा आभारी आहे. तुम्ही मला योगायोगाने का होईना सेवा करण्याची संधी दिली आणि द्यायचेच जर असेल तर आमच्या अल्लाकडे माझ्यासाठी दुवां मागा, तो तुमची साद नक्कीच कबूल करेल,'' असे म्हणत पटकन रिक्षा स्टार्ट करून तो क्षणार्धात वेगाने निघालाही.

आम्ही दोघेही त्याच्या पाठमोऱ्या रिक्षाकडे पाहतच राहिलो. आम्ही त्याच्या अशा वागण्याने क्षणभर भारावून गेलो. विश्‍वासच बसेना. खुद्द परमेश्‍वरानेच धाडलेला हा देवदूतच होता. त्यामुळे आम्हाला साक्षात देव पावल्याचा साक्षात्कार झाला. म्हणूनच सांगावेसे वाटते, की वाईट अनुभव देणारे रिक्षावाले भेटल्यामुळे सगळ्या रिक्षावाल्यांविषयीच वाईट मत झालेले असते; पण माणुसकीचे भान असलेले पापभीरू रिक्षाचालकदेखील याच समाजात वावरत असतात, हे विसरता नये.