...हाच रियाजाचा मूलतंत्र

जुई धायगुडे-पांडे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

संगीतापलीकडे काही जग आहे हेच आम्हाला माहीत नव्हते. एकाच ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे बहुतेक बाह्य गोष्टींचे आकर्षण आपोआप गळून पडले. स्वर कुठून येतो, कसा प्रवास करतो आणि अनंतात कसा लय पावतो; म्हणजे स्वरांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्थांचा अभ्यास करणे हाच रियाजाचा मूलतंत्र होता.

आज मागे वळून पाहताना भूतकाळातील प्रवासवाट पुन्हा एकदा लख्ख उजळू लागते. भरभरून शिकण्याचे ते सुवर्ण दिवस. तसं आम्ही धायगुडे कुटुंब पुणं कायमचं सोडून तळेगाव दाभाडे या ठिकाणी स्थायिक झालेलो. तिथल्या सांस्कृतिक आणि निसर्गरम्य वातावरणात आम्ही केव्हा समरस होऊन गेलो हे कळलंच नाही.

बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकत असताना अभ्यास आणि संगीताशी नातं जुळलं ते कायमचंच. शालेय जीवनापासूनच संगीत स्पर्धांमध्ये खूप मेहनत घेत असे. यात उत्तम गाणं सादर करून शाळेचे नाव मोठं करायचं ही खूणगाठ मनाशी पक्की होऊन गेली. सुरांशी नातं जुळू लागलं आणि प्रश्‍न उभा ठाकला की संगीताचं पुढील शिक्षण कुठे घ्यायचं?
पुण्यातील सुप्रसिद्ध वाद्यनिर्माते युसूफभाई मिरजकर यांच्या मध्यस्थीने सुरमई विदुषी शीला जोशी यांच्याकडे पुण्यातच माझी विधिवत तालीम सुरू झाली. त्या किराण्या घराण्याच्या श्रीमती सरस्वतीबाई राणे, विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे मार्गदर्शन घेत होत्या. गाणं शिकणं म्हणजे काय, हे तिथं मला कळू लागलं. गाताना ताई, मी, तानपुरे आणि स्वर यांचच विश्‍व! तिथं कोणत्याही बाह्य विश्‍वाला थार नव्हता. मग अगदी मनालासुद्धा. त्या गातील तसंच गायचं. एखादी स्वराकृती जशीच्या तशी आपल्या गळ्यातून आणणं हे किती महाकठीण काम आहे हे तेव्हा मला कळून चुकले. स्वर आणि त्यांच्या अंतर्भूत असणाऱ्या लयीचा पाठपुरावा करता करताच खूप दिवस निघून गेले. तो स्वर स्वच्छ आकारात लावणे हे मूलतत्त्व होते. तीनही सप्तकात तो आकारयुक्त स्वर तसाच गोलात्मक फिरला पाहिजे ही त्यातील शिस्त. तीन-तीन तास आमची हीच मेहनत चालत असे. कोणताही ठराविक राग न गाता केवळ स्वरांची साधना.

यानंतर ताईंनी मला भूप राग शिकवायला घेतला. त्या स्वतः डग्गा घेऊन बसत आणि मी तानपुऱ्यावर दोन अडीच वर्ष एकच राग. पाच स्वरांचा भूप किती मोठा होऊ शकतो याची मला त्यामुळे कल्पना आली. प्रत्येक दिवशी भूपाचा नवीन विस्तार, नवीन वाट! ताईच्या अठरा वर्षांच्या सहवासात त्यांनी मला केवळ दहा एक राग शिकवले असतील. पण ते शिक्षण इतकं मूलभूत होतं की त्या बीजातच वृक्षाचं विस्तारलेपण सामावलेले होतं. राग हा एक विशिष्ट भाव आहे आणि त्या भावाची उपासना शिष्याला वर्षानुवर्षे करावी लागते. याचा परिपाठच होता तो.
सकाळ सायंकाळ आम्हा शिष्यवर्गीची तालीम चालत असे. त्या मंजुळ नादाचे इतके आकर्षण वाटत असे की त्यापुढे इतर बाह्य गोष्टी बेसूरच! एक राग गायला घेतला की तीन तीन तास त्याच्याच सानिध्यात रमणे हा शोधप्रवास अतिशय मनोहर असे. त्या रागाशी इतकी जवळीक होई की त्याचेच अखंड चिंतन आपसूकच चाले. ही चिंतनप्रक्रिया ताईंनी नकळतच आमच्याकडून करवून घेतली हेच त्यांचे मोठेपण होते. याचं मूळ किशोरीताईंच्या शिकवणुकीतून, त्यांच्या चिंतनातून, सानिध्यातून आलं हे ताई आम्हाला आवर्जून सांगत असत.
गुरुगृहीच राहत असल्याने संगीता बरोबरच जीवनसुत्रांची ओळख देखील ताईंनी मोठ्या खुबीने करविली. भाषा म्हणजे काय? ती कशी बोलली जावी, साधे पण स्वच्छ राहणीमान कसे असावे? कशा प्रकारचे वाचन असावे? चांगले साहित्य म्हणजे काय? एखाद्या विषयाचा गाभा कसा जोखावा? संगीताचा अध्यात्माशी संबंध कसा? याबरोबरीनेच घरगुती कामे टापटिपीने कमीतकमी वेळात कशी उत्तम करावीत? म्हणजे तो वेळ संगीतासाठी सत्कारणी लावता येईल, अशी कित्येक गोष्टी मनात पक्‍क्‍या बिंबवल्या.

ताईबरोबर मला कित्येक वेळा किशोरीताईंकडे जाण्याचा योग आला. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्या प्रत्यक्ष परब्रम्हाचे दर्शन घडले. आपण शिकत असलेल्या तत्त्वाच्या मूलस्त्रोताचे याची देही याची डोळा दर्शन झाले. हे गुरू ऋण कसे फेडू?