देवाचा शोध

muktapeeth
muktapeeth

आई-वडील हे आपल्या जगण्यासाठी दिलेले "ऍडव्हान्स' पाठबळ असते, सतत मायेची सावली असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये "मातृ देवो भव, पितृ देवो भव' म्हटले आहे.

हिंदू धर्मामध्ये खूप देवदेवता आहेत. निरनिराळ्या पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपवास करताना आपण पाहत असतो. कुठलीही पूजा, आरती किंवा एखादे व्रत हे शेवटी आपण का करतो, याचा विचार केल्यावर असे लक्षात येते, की ते केल्यानंतर आपल्याला समाधान मिळते, आनंद मिळतो. संध्याकाळी साधा दिवा जरी देवाजवळ लावला, तरी घर आणि मन प्रसन्न वाटते.
थोडक्‍यात काय तर, स्वतःचा स्वार्थ आपण परमार्थात शोधत असतो.

आम्ही लंडनमध्ये राहतो. परदेशात असताना तुमच्या डोक्‍यावर कायम एक प्रकारची टांगती तलवार असते. सतत नोकरी, व्हिसा, घर, मुलांचे शिक्षण या गोष्टींची काळजी लागून राहिलेली असते. दहा-बारा वर्षांपूर्वी अशाच प्रसंगातून गेलो. माझे यजमान जेथे काम करीत होते, ती स्टार्टअप त्यांच्या सिलिकॉन व्हॅलीमधील गुंतवणूकदाराने अचानक विकली आणि त्यांना ले ऑफ दिला. दुसरीकडे नोकरीची शोधाशोध सुरू झाली. पण ते इतके सोपे नव्हतेच. येथे केव्हा तुमचा जॉब जाईल, हे सांगता येत नाही आणि आपण परदेशात असल्याने आर्थिक मदतही कुणाकडून मिळणे, हेही थोडे अवघड असते. अशा वेळेस देवच आठवतो. तसेच आमचेही झाले. परमेश्‍वरावर विश्‍वास होता. यातून काही तरी मार्ग नक्कीच निघेल, याची खात्री होती.

त्या वेळेस मी आणि माझे मित्र विनय साठे यांनी सॉफ्टस्पिनची शाखा लंडनला नुकतीच सुरू केली होती. त्यामुळे थोडा आर्थिक हातभार लाभत होता. पण, त्या वेळी मुलगी कविकाचे अभियांत्रिकीचे शिक्षण चालू होते. तिच्या शिक्षणासाठी भले मोठे अमेरिकन डॉलरचे कर्ज काढलेले होते. स्थानिक नसल्याने शैक्षणिक शुल्क प्रचंड होते. त्यात आमचा व्हिसा संपत आलेला. पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही, माहीत नव्हते. अशा वेळेस काय करावे, हेच कळत नव्हते. म्हणतात ना एकदा संकटे यायला लागली, की ती चहूबाजूंनी येतात. अगदी तसेच आमचे झाले. सर्वच गोष्टी अस्थिर व अशक्‍य वाटत होत्या. केव्हा गाशा गुंडाळून भारतात परतावे लागेल, हे सांगता येत नव्हते. आमची दोघांची इच्छा होती, की आपण येथे लंडनला असेपर्यंत आपल्या आई-वडिलांना लंडन दाखवावे. परंतु आता पैसे, व्हिसा व इतर सर्व गोष्टी जुळून येणे अवघड वाटू लागले होते. बरे त्यांना येथे बोलावले आणि त्यात विकासला नोकरी नाही, असे त्यांना कळाले तर ते फार दुःखी होतील, हे माहीत होते. तरीही आम्ही ठरविले, काही करून त्यांचा व्हिसा करू. थोडी फार बचत होती. त्यातून व्हिसा, तिकिटे झाले.
माझे आई-बाबा आणि सासरे अशा तिघांनाही एकाच वेळी बोलावले. आम्ही त्यांना दोन पर्याय दिले - तुम्हाला एखाद्या पर्यटन कंपनीबरोबर युरोप ट्रीप करायला आवडेल का फक्त लंडन बघायला व आमच्याकडे यायला आवडेल. तिघांनीही लंडन, हेच उत्तर दिले. त्यामुळे सर्व सोपस्कार करून आम्ही त्यांना लंडनला आणले. हिथ्रो विमानतळावर आम्ही त्यांना घेण्यास गेलो, त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मग आम्हाला शक्‍य होती ती सर्व लंडन व सभोवतील प्रेक्षणीय स्थळे दाखविली. कधीही परदेशी न गेल्याने प्रत्येक गोष्टीचे त्यांना कुतूहल होते. लहान मुलाप्रमाणे ते सर्व समजावून घेत असत. त्यांचे सुखी, आनंदी चेहरे आम्हालाही खूप समाधान होत होते!

छोट्या छोट्या गोष्टीतील त्यांचा आनंद हा आमच्यासाठी आशीर्वादच होता.
सहा आठवड्यांच्या त्यांच्या वास्तव्यात किती चांगल्या गोष्टी घडून आल्या. त्या अनुभवाने आम्ही थक्कच झालो. कित्येक महिने अडकून राहिलेली कामे सहजच पूर्ण होत गेली. आमच्या व्हिसाची मुदत वाढली आणि आम्हाला कायमस्वरूपी इंग्लंडमध्ये वास्तव्य करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे मुलीचे अभियांत्रिकीचे पुढील सर्व शैक्षणिक शुल्क स्थानिक विद्यार्थी म्हणून मान्य झाले. माझ्या मिस्टरांना नवीन नोकरीही मिळाली. आमचा सॉफ्टस्पिनचा बिझिनेसही चांगला सुरू झाला आणि अचानक सर्व अडकलेल्या प्रश्‍नांचा गुंता अगदी सहज नकळत सुटला.
यानंतर परमेश्‍वराला भेटण्यासाठी मंदिरात जाण्याची कधी आवश्‍यकता वाटली नाही. किंबहुना तो माणसातच असतो. आपल्या सभोवतालीच असतो. फक्त त्याला शोधण्याची आणि ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असावी लागते, हे पटले. त्यासाठी निःस्वार्थ मनाने चांगले आणि प्रामाणिक काम करीत राहावे. एक दिवस देव नक्कीच भेटतो, ही श्रद्धा दृढ झाली.
आपले आई-वडील, घरातील मोठी माणसे हेच खरे परमेश्‍वराचे रूप असते. आम्हाला आमचे दैवत सापडले...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com