हरवलेले गवसले मज!

हरवलेले गवसले मज!

थोरांचे ऐकावे. प्रवासाला निघताना स्टेशनवर तासभर आधी पोचले पाहिजे, ही वडिलांची शिस्त पाळली, म्हणून हरवलेले पाकीट व तिकिटे मिळू शकली.

मी मुंबईत नोकरीला लागलो होतो. मुंबई महापालिकेत काम केलेल्या आमच्या तीर्थरूपांनी दूरदृष्टी दाखवून मुंबई व पुणे अशा दोन्ही ठिकाणी बिऱ्हाडे केली होती. कारण, सेवानिवृत्तीनंतर पुणे जिल्ह्यात असलेल्या आमच्या गावी शेती करून स्थिरावण्याची त्यांची मनीषा होती. माझ्या आईचे मधुमेही असल्याचे निदान झाल्याने तिला बरीच औषधे घ्यावी लागत व त्यासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करणे मुश्‍कील असे. मला मुंबईत नोकरी लागल्यावर तो भार साहजिकच माझ्यावर पडला. छोट्या भावंडांना पुण्यात सेवानिवृत्त झालेल्या वडिलांच्या देखरेखीखाली सोपवून आई माझ्याकडे मुंबईत रहावयास आली. तरी तिला माझ्या छोट्या भावंडांची काळजी व त्यांच्या सहवासाची ओढ असे. मी, आई व माझा मामा असे तिघे परळच्या खोलीत राहत होतो. माझी भावंडे वडिलांबरोबर राहत. वडील अधूनमधून शेती असलेल्या गावी चक्कर मारत.

जूनमध्ये रविवारला जोडून सुटी आल्याने मी व माझी आई पुण्याला असलेल्या माझ्या भावंडांना भेटण्यास सकाळी पुणे मेलने जाण्यासाठी निघालो. गाडी सुटण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी निघण्याची आमच्या वडिलांनी घालून दिलेली प्रथा पाळत असल्याने आम्ही दोघे व आमच्याबरोबर राहत असलेल्या राममामांसोबत सकाळी लवकरच निघालो. परळ नाक्‍यावर सचिवालयास जाणारी दुमजली बस आम्हाला मिळाली. बसमध्ये खालच्या मजल्यावर शिरल्याबरोबर लागणाऱ्या आडव्या सीटवर मी आरामात बसलो, आई व मामा पुढे बसले.

बोरीबंदरला उतरून आम्ही मेलच्या डब्यात घुसलो व बसलो. आईने तिकीट वगैरे बरोबर घेतलंय ना, असे विचारल्यावर मी खिशात हात घातला, तो काय! खिसा रिकामा. तिकिटे व सुमारे पन्नासेक रुपये होते ते पाकीट कुठेतरी पडलं. हे कळल्याबरोबर आई व राममामा दोघेही अवाक व हताश होऊन माझ्याकडे पाहू लागले. या धक्‍क्‍यातून बाहेर पडून शेवटी राममामा म्हणाला, ""मी नवी तिकिटे काढून येतो'' आणि तो गेला. तोवर मी पाकीट कुठे पडले असावे, याचा अंदाज बांधत होतो. अचानक माझ्या डोक्‍यात ट्यूब पेटली. मी घातलेली पॅंट घट्ट होती आणि तिचे खिसे चिंचोळे होते. मी बसल्यावर खिशातील पाकीट कुठे तरी पडले, हे लक्षात आल्यावर मी आईला सांगून गाडीतून उतरलो. आईने मला अडवले व म्हणाली, ""जाऊ दे ते पाकीट. आता कुठे जाऊ नकोस;'' पण मी काही न ऐकता स्टेशनच्या बाहेर पडलो. आम्ही पकडलेली बस त्याच मार्गे परत फिरणार, याची मी बेस्टच्या स्टार्टरकडून खात्री करून घेतली. मग मी रस्ता ओलांडून आझाद मैदानाच्या बाजूला जाऊन स्टॉपपाशी उभा राहिलो. मला फार वाट पाहावी लागली नाही, बस आलीच तेवढ्यात स्टॉपला. मी झटकन बसमध्ये चढलो व आडव्या सीटच्या मागे पहिले ते माझे पाकीट अलगद तेथे विसावा घेत होते. मी ते उचलले व बस कंडक्‍टरला बस थोडी थांबवावयास सांगून खाली उतरलो. त्याने ओळखले, आधी त्याने मला अडवले व पाकीट पोलिसचौकीला जमा करावे लागेल, असे तो म्हणाला; पण सगळी हकिगत ऐकल्यावर माझे कौतुक करून हात हातात घेतला व म्हणाला, ""नशीबवान आहेस; पण सावध राहा. नेहमी हुशारी कामाला येत नाही बाबा!'' त्याचे आभार मानून मी धावत पळत गाडीत पोचलो, तोवर राममामाने तिकिटे काढून आणली होती. ती तिकिटे हातात घेऊन मी धूम ठोकली. रिफंडच्या खिडकीपाशी जाऊन तिकिटांचे पैसे परत घेतले. फक्त पैसे कापून मला बाकीचे पैसे मिळाले. मी धावत जाऊन राममामाच्या हातात ते पैसे ठेवले हे पाहून तो अगदी चकित झाला!

एकूण सर्व प्रकार मी सांगितल्यावर आई व राममामा दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. पैसे आणि तिकीट हरवल्याची आपत्ती टळल्यामुळे आम्ही सावरलो. सर्वांना हायसे वाटले व पुढचा प्रवास आनंदाचा झाला. आईने सगळ्या डब्यांतील लोकांसमोर मला कुरवाळून माझे कौतुक केले. तिच्या डोळ्यांत जमलेली आसवे पुसली. माझी हकिगत ऐकून डब्यातील सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हरवलेले अखेर गवसले खरे; पण अडाण्यासारखी वाटणारी खेडवळ गोष्ट खरी कामाला आली. ती ही, की गाडी सुटण्याआधी किमान एक तास आधी निघावे! कसे? लवकर नसतो आलो, तर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी वेळ कुठून मिळाला असता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com