देवबी भित्राच! (मुक्तपीठ)

Muktapeeth
Muktapeeth

आज पाडवा. पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा अधिक गोड करण्याचा उत्सवी दिवस; पण पती-पत्नीतील गोड नातं समाजाच्या सर्व स्तरांत असतं? आपल्या आसपास पाहायला हवं. 

आमच्याकडे तीन मावश्‍या कामाला आहेत. एक स्वयंपाक करते. दुसरी झाडू-फटका-भांडी करते. तिसरी बाथरूम, फर्निचर सफाई व वरकाम करते. शिवाय धुण्याचे काम व इतर सटरफटर कामे करायला मी आहेच. सून, मुलगा नोकरीला, नवरा लष्कराच्या भाकरी भाजायला आणि नातवंडे शाळेत. त्यामुळे घरी मी आणि या मावश्‍या यांचेच राज्य. दिवसभर ठरलेल्या वेळी एकेक जण येणार. त्या त्या वेळी येणाऱ्या मावश्‍या आणि मी असे आमच्या चौघींचेही ट्युनिंग चांगले जमलेय. गप्पा-टप्पा, रुसवे-फुगवे, समजूत काढणे, गुपित सांगणे सारी काही आमच्यात चालू असते. अलीकडे माझ्या तीनही मावश्‍या खुशीत असायच्या. मला कळेना, तिघींनाही एकदम खूश व्हायला काय झाले? त्या कधी एकमेकीत बोलतानाही खुसुपुसु करायच्या. आपापसात इतके गूळपाणी कसले चालू आहे, त्याची दाद लागू द्यायच्या नाहीत. काही विचारले की, लाजून मुरका मारत दूर व्हायच्या. मला खूप उत्सुकता वाटत होती. शेवटी मी त्यापैकी वयाने मोठ्या असलेल्या मावशींना विचारलेच, ""काहो मावशी, खूश दिसताय. काही विशेष?'' 

त्या चक्क लाजल्या. खरे तर स्वयंपाकाच्या मावशी संसारात मुरलेल्या, मुली-नातवंडात रमलेल्या. आता त्यांचे काही लाजायचे वय नव्हते; पण आजीबाईही लाजल्या. खोदून खोदून विचारल्यावरही त्यांनी आपल्या खुशीचे कारण सांगितले नाही. भांडीवाल्या मावशीला विचारले, ""मावशी, आज-काल खूप आनंदात दिसता तुम्ही?'' काही उत्तर देण्याऐवजी "तुम्हाला नाही कळायचे', असे म्हणत मस्त मुरका मारत गालातल्या गालात हसली आणि तिथून बाजूला झाली. पलीकडे गेल्यावरही ती कितीतरी वेळ एकटीच काही आठवून हसत होती. मला कळेना, या तिघींनाही एकाच वेळी असे काय झालेय? इतकी हसोळी खाल्लीत का या तिघींनीही! या बायकांची अशी काय गंमत आहे की ती मला कळणार नाही? आणखी एक म्हणजे या तिघी तर खूश होत्याच; पण आमच्या आसपास येणाऱ्या आणखी दोघीही अशाच खूश दिसल्या. तशा या सगळ्या मावश्‍या नीटनेटक्‍या, स्वच्छच असायच्या; पण आलटून पालटून दोनच साड्या नेसून येणाऱ्या या बायका आता आणखीही वेगळ्या साड्या नेसायला लागलेल्या दिसल्या. रोज एखादे फूल, गजरा डोक्‍यात दिसायला लागला आताशी. त्यामुळेच त्यांचे वागणे मला आधीपेक्षा वेगळे वाटत होते. 

मला आता राहवले नाहीच. सफाईवाल्या मावशीला विचारलेच, ""आज-काल तुम्ही उत्साहात असता. रोज वेगळ्या वेगळ्या साड्या नेसता, गजरा माळता.'' 
ती तोंड भरून हसली. म्हणाली, ""काय सांगू आजी तुम्हाला! स्वर्गात राहतोय आसं वाटायलंय बगा. दोन म्हयने झाले, आमच्या मालकांनी दारूच्या थेंबाला हात लावला न्हाई. रोज कामावर जातात. कमवून आणतात. पोराबाळास्नी रोज दोन्ही वेळा भरपेट खायला भेटतंय. भांडणतंटा न्हाई, हाणामारी न्हाई. बेस चाललंय. जिंदगी इतकी चांगली असती ते आता कळांलं बगा. आमचं घरदार खूश आहे. आमच्या झोपडपट्टीत सगळ्यांच्याचकडे खुशी आहे बगा.'' 

ओह! बाकीच्या दोन्ही मावश्‍यांच्या आनंदाचे कारणही हेच असले पाहिजे, मी अंदाज बांधला. 

मग आणखी एक गोष्ट लक्षात आली, मावश्‍याची कामंही विनातक्रार, मनपसंद होत होती. रजा, आजारपण, रडगाणे कशाच्याही तक्रारी नव्हत्या. उसने पैसे मागणे नव्हते. त्यामुळे मीही खूश होते. या सगळ्याला कुणाची नजर लागली कोण जाणे! तीन महिन्यांतच मावश्‍यांचा उत्साह कमी कमी होऊ लागला. भांडी वाजू लागली. वस्तू फुटू लागल्या. आदळआपट वाढली. आधीसारख्याच रजा होऊ लागल्या. मी मावशींना विचारले तर उत्तर मिळाले, "काय न्हाई! रोजचंच रडगाणं!' 

सफाईवाल्या मावशीने माझ्या प्रश्‍नावर कडाकडा बोटे मोडली. रागाने फणफणत उत्तर दिले, ""आमचा बेवडा परत दारू प्यायला लागला बगा. काम न्हाई, धंदा न्हाई. मारहाण करून पैसं काढून घ्यायचं नी प्यायला पळायचं. त्यानं घरी यिऊच नये, आसं वाटायलंय. रोज रातच्याला भांडण, हाणामारी, परत सगळं सुरू झालंय. मुडदा बशीवला त्याचा. सरकारनं दारूची दुकानं बंद केलती, कुटं ढोसायला मिळतंच नव्हतं. म्हणून ही कुत्री सुधारली व्हती हो. कुणाचा मुडदा गाडला काय की दारूबंदी उटली बगा. दारूची दुकानं उगडली आन्‌ आमच्या झोपडपट्टीत पुन्यांदा नरक सुरू झाला. सरकार कोनाचबी आसू दे, दारूबंदी व्हणार न्हाई म्हंजी न्हाई. बायामानसांची फिकीर कशाला करतील हे बाप्ये? आमच्या शिव्या शापानंबी त्यांचं काई वाइटं व्हणार न्हाई. देवबी बाप्यांना घाबरतो. देवबी भित्राच!'' 

तिच्या डोळ्यांतून घळाघळा आसवं गळत होती. अंगावरच्या सिंथेटिक साडीच्या पदराने ती डोळे पुसायचा प्रयत्न करीत होती. त्या पदरामध्ये तरी तिची आणि तिच्यासारख्या असंख्य जणींची आसवं पुसायची ताकद कुठून येणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com