सार्थकाची घटिका (मुक्तपीठ)

Madhusudan Ghanekar
बुधवार, 22 जून 2016

दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणं ही मोठी कला असते, असं लहान असताना वाचलं होतं. आयुष्यभर तेच करीत आलो. मन कमकुवत होऊ न देता सातत्यानं दुसऱ्याला आनंद देण्याचं भाग्य मिळालं, याचं समाधान वाटतं. हीच तर सार्थकाची घटिका! 

दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणं ही मोठी कला असते, असं लहान असताना वाचलं होतं. आयुष्यभर तेच करीत आलो. मन कमकुवत होऊ न देता सातत्यानं दुसऱ्याला आनंद देण्याचं भाग्य मिळालं, याचं समाधान वाटतं. हीच तर सार्थकाची घटिका! 

आयुष्यात जेव्हा प्रतिकूलता निर्माण होते, तेव्हा माणसं उदास होतात, खचून जातात, असं सर्वसाधारणपणे दिसतं. माझ्याही आयुष्यात संकटांनी थैमान घातलं. अडचणी तर सातत्यानं आल्या. पण जिद्दीनं त्या साऱ्यांना सामोरा गेलो आणि प्रतिकूलतेचा तो प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यात जणू सार्थकाची घटिका होऊन आला! चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. मी काविळीनं आजारी होतो. आजारपणातलं रिकामपण फार त्रासदायक असतं. माझ्यासारख्या चळवळ्या माणसाला ते स्वस्थ बसू देईना. तोवर माझ्या एकूण बारा टेंपररी नोकऱ्या करून झाल्या होत्या! पण त्या नोकऱ्यांच्या साऱ्या खडतर आठवणी माझ्यातील प्रतिभेची उमेद वाढवत राहिल्या. बिछान्यावर पडून असतानाच्या त्या काळात मी लिहीत राहिलो. बघता-बघता लेखणीतून ‘दिवस‘ ही कादंबरी साकार झाली आणि मी काविळीच्या आजारातून कधी सुखरूप बाहेर पडलो, ते माझं मलादेखील कळलं नाही!

2003 मध्ये माझ्यावर बायपास सर्जरी झाली. हृदयविकाराचा झटका ही मी ध्यानधारणाच मानली. जणू पुनर्जन्माची अनुभूतीच होती ती. त्या वेळी सक्तीनं विश्रांती घ्यावी लागली, पण त्या कालावधीत आत्मशोधाची संधी मला लाभली. सभोवतालच्या वातावरणात ज्या प्रतिमा अंतर्मनाला जाणवल्या, त्यातून जीवनाचा निराळाच अर्थ जाणवत गेला. हे ‘इदं न मम‘ असं प्रतिभेचं रूप आयसीयूमधील मुक्कामात लिहिलेल्या माझ्या ‘तावदान‘ कवितासंग्रहाद्वारे प्रकट झालं. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीत शेवाळ्यावरून पाय घसरून पडलो आणि उजवा हात मोडला. मग जिद्दीनं डाव्या हातानं लिहू लागलो. उजवा हात जायबंदी झालेला असताना सारं बळ डाव्या हातात एकवटून संकल्पना, कथा, पटकथा, संवाद, चित्रपटातील तिहेरी भूमिका, गीतलेखन, दिग्दर्शन, प्रसिद्धी, जाहिरात, निर्मिती, जनसंपर्क आदी सोळा जबाबदाऱ्या सांभाळून मी साकारलेल्या ‘घुसमट‘ चित्रपटाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस‘मध्ये झाली! खऱ्या अर्थानं तो माझा ‘बाये‘ हाथ का खेल हो गया! 

पुण्यातील एका संस्थेत ‘बे दुणे चकली‘ कार्यक्रम झाला. त्यात मी हसण्याचे विविध प्रकार दाखविले आहेत. एक मुलगा ते लक्षपूर्वक बघत होता. खळखळून हसत होता. कार्यक्रमानंतर भेटून तो म्हणाला, ‘काका, मी यापुढे कधीच रडणार नाही!‘ गरवारे कॉमर्स कॉलेजमधील माजी कर्मचारी संघटनेनं एक कार्यक्रम ठेवला होता. तो संपल्यावर एक तरुणी व्यासपीठावर आली. म्हणाली, ‘माझी आई दोन महिन्यांपूर्वी गेली. गेले दोन महिने त्याच दुःखात होते. परंतु तुमच्या कार्यक्रमानं माझं दुःख हलकं झालं.‘ माझ्यासारख्या कलावंताकडे यापेक्षा मोलाचं सर्टिफिकेट दुसरं कुठलं असेल? 

सात नोव्हेंबर 2014 रोजी पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाला. ‘आता सगळं बंद करा!‘ घरच्यांनी बजावलं. मात्र तेवीस डिसेंबरला धारावी झोपडपट्टीत गेलो. सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सलग अठरा तास चालता-बोलता ‘सबकुछ मधुसूदन‘ कार्यक्रम मी केला. त्याबरोबरच विश्‍व जोडो अभियानांतर्गत ‘मानव धर्म ः सर्वश्रेष्ठ धर्म‘, ‘साऱ्या विश्‍वावर प्रेम करा‘, ‘सत्य-अहिंसा-शांतता आचरणात आणा‘, ‘पाणी वाचवा-झाडे वाचवा-झाडे जगवा‘, ‘रक्तदान, अवयवदान, देहदान करा‘ अशी विविध संदेशपत्रके वाटत राहिलो. त्या अठरा तासांच्या कालावधीत धारावी झोपडपट्टीचा दहा किलोमीटर परिसर पिंजून काढला. या उपक्रमाला कुठलाही प्रायोजक नव्हता! माझाच खर्च आणि माझाच आनंद! बायपास सर्जरीपूर्वी माझा एकाच देशात एकपात्री कार्यक्रम झाला होता. सर्जरीनंतर भारतासह चौदा देशांत कार्यक्रम झाले! कार्यक्रमांना संख्यात्मक यश खूप लाभले. पण मन कमकुवत होऊ न देता सातत्यानं दुसऱ्याला आनंद देण्याचं भाग्य मिळालं, याचं समाधान वाटतं. अजून बरंच काही करायचंय. काम चालूच ठेवणार आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणं ही मोठी कला असते, असं लहान असताना कुठंतरी वाचलं होतं. आयुष्यभर तेच करीत आलो. सार्थकाची घटिका यापेक्षा काय निराळी असते?