असेही संस्कार

असेही संस्कार

‘आम्ही संस्कार करतो’, असा फलक लावून कोणी कोणावर संस्कार करू शकत नाही, ते आपल्या कृतीतून होत असतात. एखादी छोटीशी कृतीही खूप खोलवर संस्कार करणारी ठरते. 

संस्कार हे फक्त घरातून, मोठ्या माणसांकडून किंवा शाळेतून होतात असं आपण म्हणतो; पण मी ऐकलेल्या संस्कारांचा अनुभव काही वेगळाच आहे. मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे, अमृताकडे गेले होते. तिची मुलगी अविका आता अभिनव शाळेत आहे. आम्ही दोघी गप्पांमध्ये रंगलो होतो आणि अविका एकटीच खेळत होती. खेळता- खेळता तिची बडबड चालू होती; पण त्या बडबडीत गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, पसायदान असे एकामागून एक चालूच होते. मी म्हटले, ‘‘वा! अविका छान म्हणतेस गं. कोणी शिकवले तुला एवढे?’’ तर ती म्हणाली, ‘‘व्हॅनवाल्या काकांनी.’’ मी आश्‍चर्याने विचारले, ‘‘काय? व्हॅनवाल्या काकांनी?’’ खरे तर रिक्षावाले काका, व्हॅनवाले काका यांची आपल्याला गरज असते, म्हणून आपण मुलांना त्यांच्याबरोबर शाळेत पाठवतो; पण गाडीतली ती गर्दी, मुलांचे चेंगरून बसणे, सगळेच दुःखदायक असते. काहीवेळा काकांविषयी वेडेवाकडे ऐकलेले असते. येथे तर काकांविषयीची एकदम वेगळीच बाजू समोर आलेली. मी अवाकच झाले.

तेव्हा अमृता म्हणाली, ‘‘अगं हो, कोणाचा विश्‍वास बसणार नाही; पण तिचे व्हॅनवाले काका आहेत, ते रोज सकाळी व्हॅनमध्ये सगळ्या स्तोत्रांची सीडी लावतात, त्यामुळे वातावरणपण एकदम प्रसन्न राहते आणि सतत कानांवर पडल्यामुळे नर्सरीपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांची स्तोत्रे पाठ होतात. याचा दुसरा फायदा म्हणजे, मुले व्हॅनमध्ये दंगा- मारामारी न करता शांतपणे ऐकत असतात. हे काका प्रत्येक मुलाला ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात, प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करतात. वर्षाच्या शेवटी स्वतःच्या घरी पार्टी करून सगळ्या मुलांना बोलावतात. एवढेच नव्हे, तर आधी व्हॅनमध्ये असलेली; पण आता मोठी झालेली मुलेसुद्धा त्यांच्याकडे पार्टीला येतात.’’

मी हे ऐकून थक्कच झाले. मला वाटते, संस्कार हे कोणत्याही जागेवर किंवा व्यक्तींवर अवलंबून नसतात, ते प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतात. काकांनी हा चालू केलेला संस्कारांचा ठेवा खरेच स्तुत्य आहे.

कारण, रोज एकत्र जाणारी मुले एकमेकांकडून चांगल्या- वाईट गोष्टींची देवाणघेवाण करत असतात. अशा वयात झालेले हे संस्कारच त्यांना उपयोगी पडणार असतात.

माझ्या ओळखीत एक लहान मुलगा आहे. त्याच्या घरातील सगळेच सज्जन. त्यांच्या तोंडून कधी कुणाला दुखावणारा वाईट शब्दही निघणार नाही. मात्र, हा मुलगा अचानक मित्रांबरोबर खेळताना मित्रांना, घरातल्यांना, शेजारच्या, येणाऱ्या- जाणाऱ्या माणसांना सारख्या शिव्या द्यायला लागला होता. जरा कोणी त्याच्या मनाविरुद्ध केले की दिलीच शिवी त्याने, असे सुरू होते. बरे, रोज नव्या शिव्यांची त्यात भर पडत असे. अखेर त्यालाच विचारले, की तो अशा शिव्या का देतो? तो म्हणाला, ‘‘आमचे रिक्षावाले काका रस्त्यात कोणी मध्ये आले, ट्रॅफिक जाम असला, की असेच बडबडतात. म्हणून मीपण मला राग आला, की असेच म्हणतो.’’

माझा मुलगा लहान असताना शाळेत जाताना शर्टच्या कॉलरच्या आत रुमाल लावून जाण्याचा हट्ट करायचा. का, तर त्याचे पीटीचे सर असाच रुमाल लावतात. म्हणून त्यालाही तसाच लावायचा असायचा. कित्येक लहान मुले घरी शाळा-शाळा खेळत असतात आणि शाळेतल्या बाई जसे शाळेत वागतात किंवा बोलतात, ओरडतात, तसेच अनुकरण मुले करतात.

घरात बाबा सिगारेट ओढत असतील, तर मुलेही पेन्सिल, खडू तोंडाला लावून बाबांची नक्कल करतात, त्यांना ती गोष्ट चांगली आहे की वाईट, या गोष्टीचे ज्ञान नसते. फक्त त्यांना वाटते, घरातील मोठी माणसे करतात ते चांगलेच असते. मीपण कितीतरी बाबालोकांना आपल्या लहान मुलांच्या पुढ्यात रस्त्यात थांबून सिगारेट ओढताना बघितले आहे. त्यांना जाऊन सांगण्याचा मोह मला अनेकवेळा होतो, की बाबा रे, हाच आदर्श तुझा मुलगा ठेवणार आहे.

मुलांना कुठल्याच गोष्टींचा, शब्दांचा अर्थ कळत नसतो, ती फक्त अनुकरणप्रिय असतात. लहान मुले तर जास्त संवेदनशील असतात, त्यांच्यामध्ये केवळ निरीक्षणशक्ती असते. त्या निरीक्षणातून मिळालेले काय चांगले, काय वाईट हे कळण्याची विवेकबुद्धी नसते. ही मुले घरापेक्षा बाहेरच जास्त असतात. कारण शाळा, क्‍लासेस, पाळणाघर यामध्ये जाण्या-येण्यासाठी रिक्षा यामधून अनेक लोकांच्या सान्निध्यात येत असतात.
त्यामुळेच या व्हॅनवाल्या काकांनी मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी उचलली, ही गोष्ट खरेच कौतुकास्पद आहे. प्रत्येक शाळेतील प्रत्येक व्हॅन किंवा रिक्षावाल्या काकांनी अशा पद्धतीने मुलांवर संस्कार केले तर खरेच नवीन पिढी संस्कारित होईल. त्या काकांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. त्या काकांना परत एकदा सलाम! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com