त्रिपुरारीचे दीपदान (मुक्‍तपीठ)

त्रिपुरारीचे दीपदान (मुक्‍तपीठ)

सरत्या आश्‍विनाबरोबर काकड आरतीचे सूर पहाटवाऱ्यावर झुलत येतात. भजनरंगात ती थंडीही उबदार वाटू लागते. कार्तिकी पौर्णिमा येते ती दीपदानाची आठवण करीत. कृष्णेच्या प्रवाहातही दीपदान केले जाते. 

थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. रानावनात वाढलेल्या लतावेलींचा, हिरव्याकंच गवताचा रंगही उतरणीला लागला आहे. मोरांच्या केकावल्यांनी पहाटही जागी होऊ लागली आहे. दिवसाचा उन्हाचा तडाखा आणि पहाटेला धुक्‍याची दुधाळ दुलई ही हिरवीगार धरित्री परिधान करत आहे. पहाटेचा संधीकाळ विविध पक्षांच्या मंजूळ स्वरांनी भरून जाऊ लागला आहे.

गवताच्या शेंड्यावर उमललेल्या बियांच्या तुऱ्यातून कोणत्याही क्षणी तेजस्वी सोनेरी सळसळ सुरू होईल आणि काही क्षणांतच सर्वत्र सोनेरी सडा शिंपडावा असा माहोल तयार होत आहे. पहाटवाऱ्याबरोबर येणारा गवताळ गंध मनाला मोहवून टाकत आहे. या गवताळ गंधाबरोबर कोठून तरी दूरवरून वाऱ्याबरोबर वाहत येणारा शब्दसमूहांचा सूर मनाला आणि कानाला स्पर्शून जातो. कुठे बरे ऐकला असावा? नवरात्र संपलेले असतात,

कोजागरीचा चंद्रही दुधाने तृप्त जालेला असतो... आणि अचानक वीणेची तार छेडली जावी तशी मनाची तार झंकारू लागते. मनातल्या मनात त्या शब्दसमूहांच्या सुरांची आवर्तने उमटू लागतात. या झंकारातून स्मृतीच्या हिंदोळ्यावर स्वार होत काकड आरतीचे स्वर मनात रुंजी घालू लागतात.
कोजागरी ते त्रिपुरारी असा हा पौर्णिमा ते पौर्णिमा चालणारा काकड आरतीचा मौसम ‘अन्नकोटा’ने संपन्न होईल. भल्या पहाटे पखवाजावर थाप पडली की ताडकन जाग यायची. मुखमार्जनादी विधी उरकून हातात एखादे पात्र आणि खुंटीला अडकवलेला टाळ गळ्यात अडकवायचा आणि निघायचे विठ्ठलाच्या देवळात. पहाटेच्या या दवभरल्या थंडीत कुडकुडत सभामंडपात हजेरी लावायची. या सभामंडपात मात्र उबदार वाटायचे. उन्हाळ्यात मात्र थंडगारपणाची अनुभूती यायची, पर्यावरणपूरक बांधकामाची किमयाच ही; आपल्या पूर्वजांनी केलेली. पखवाजावर पडणारी थाप ही उठा उठा पहाट झाली या गजराची असायची. हळूहळू सभामंडपात गर्दी व्हायची तोपर्यंत एकतारी वीणेकरी, पखवाजवादक, टाळवाले वाद्ये लावून घेत असत.

पोरासोरांच्या हातातले टाळ या वाद्यमेळाशी जुळून घेत असत. खड्या आवाजामध्ये विठ्ठलाची आळवणी सुरू होई. एकामागे एक असे अभंग, भजने श्‍वसनाचे सर्व व्यायाम प्रकार घडवून आणत असत. 

कान-नाक-घसा यांच्या या व्यायाम प्रकाराबरोबरच हळूहळू सुरू होणारी भजने प्रथम डोलायला लावत असत. तर शेवटी शेवटी या डोलण्याचे अंगात भिनलेल्या तालामुळे उड्या मारण्यात झालेले रूपांतर स्ट्रेचिंग, ॲरोबिक्‍स, झुंबा आदी व्यायामप्रकाराचे प्रात्यक्षिकच करून घेत असत. शेवटी आरती होऊन समेवर येत हरिविठ्ठल नामाचा जयघोष झाल्याबरोबर सर्वांचे टाळ, मृदंग, पखवाज आणि आरतीसाठी वाजणाऱ्या टाळ्यांचे आवाज एकदम थांबत असत. वीणेकऱ्याची तार मात्र झंकारतच राही. आरतीच्या प्रसादाचे आगमन झालेले असे नैवेद्य दाखवून झाला की प्रसादाचे वाटप. दह्याचे हे गोडसर तीर्थ सर्वांना वाटण्यात येत असे. आमच्या सुदृढपणाचे गुपित म्हणजेच हे प्रोटीनयुक्त रसायन होते. तनाची आणि मनाची मशागत करणारी ही काकड आरती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नकोटाने सुफळ संपूर्ण होत असे.

अश्‍विनी आमावस्या ते कार्तिक पौर्णिमा असा हा दीपोत्सवाचा कालखंड कार्तिकेपौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाने संपन्न होत असते. तुलसी विवाहही याच दिवशी संपतात. कृष्णेच्या नदीकाठाला लाभलेल्या फरसबंदी कोंदणामध्ये हा दीपदानाचा उत्सव पाहाणे मोठे रमणीय असते. संथ वाहणाऱ्या या आमच्या गावच्या कृष्णामाईत सर्व नगरजन दीपदानासाठी घाटांघाटांवर जमलेले असतात. एक एक करत शेकडोंच्या संख्येने नदीला दान केलेले हे दीप मंद प्रकाश देत हे वाहत्या पाण्यातून जाणारे प्रकाशपर्व द्विगुणित पद्धतीने आपल्या नजरेचे पारणे फेडत मार्गस्थ होत असते. कृष्णानदीतील हा प्रकाशपर्वाचा प्रवाह महागणपती (ढोल्या), काशीविश्‍वेश्‍वर आदी मंदिर समूहांच्या पार्श्‍वभूमीवर नभांगणात उगवलेल्या चंद्राच्या पिठुर प्रकाशात आकाशाच्या निळसर जांभळट रंगछटेच्या पार्श्‍वभूमीवर नटलेल्या घाटांवर झळाळत्या प्रकाशाचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब दाखवत संथ वाहणारी ही कृष्णामाई मोठे विलक्षण निसर्गचित्र पेश करत असते.

याच दीपांच्या काही ज्योती विठ्ठलाच्या मंदिरातील गाभार उजळवत असताना दिसतात. कुणबाव्याच्या या धामधुमीत शेतकऱ्याला दिवाळीत वेळच कुठे असतो, फराळ तयार करायला! मात्र या त्रिपुरारीच्या दिवशी दिवाळीत राखून ठेवलेल्या जिन्नसामधून विठ्ठलाला फराळचा करायला हा कुणबी शेतातल्या धन-धान्य, फळफळावळीसह हजर असतो. तो अन्नकोटासाठीचा फराळ फळफळावळ धनधान्य पाहून करकटीवरचा हा पंढरीचा राजाही प्रसन्न मनाने हा नैवेद्य स्वीकारत असावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com