आपुलकीचा स्वाद

Sujata-Ranade
Sujata-Ranade

कोणतीही गोष्ट देताना त्यामागे देणाऱ्याची आपुलकीची भावना असेल, तर घेणाऱ्यालाही समाधान वाटते, त्याचा स्वाद वेगळाच असतो.

मध्यंतरी आम्ही दोघे नृसिंहवाडीला गेलो होतो. नृसिंहवाडी तशी आम्हाला नवीन नाही, पण बरेच वेळा जाऊनही नृसिंहवाडीत मुक्काम करता आला नव्हता. कधी मुलांच्या शाळा यांची कामाची गडबड. पण आता निवृत्तीचे निवांतपण असल्याने आम्ही पुण्याहून वाडीत मुक्काम करून दत्तदर्शन घ्यायचे ठरवले. वाडीत पोचेपर्यंत जरा उशीर झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचे ठरवले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी दत्तदर्शन घेतले. मंदिराच्या खालच्या बाजूने वाहणाऱ्या कृष्णामाईला सभामंडपातून नमस्कार केला. खरेतर तिचा वाहता प्रवाह पाहून खाली जाण्याची इच्छा होत होती. पण, घाटावरून जाणे वयानुसार अवघड वाटले. सभामंडपातच बसलो. गडबड असूनही परिसर मनाला शांतता देतो. थोडा वेळ तेथे बसून मंदिराच्या मागे असणाऱ्या म्हादबा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास गेलो. ते देही असताना माझ्या वडिलांकडे, नंतर भावाकडेही सांगलीत येत असत. एक निर्मोही, पैसा - अडका जवळ न बाळगणारे, अनवाणी चालणारे दत्तभक्त होते. समाधीचे दर्शन घेऊन दत्तमंदिराच्या परिसरातल्या पारावर टेकले. या वेळी कृष्णा नदीच्या पैलतीरावर असणारे औरवाड येथील अमरेश्‍वर मंदिर पाहण्यासाठी जायचे ठरवले होते. इतक्‍या वेळा नृसिंहवाडीला जाऊनही मंदिर पाहायचे राहून गेले होते. मंदिराबद्दल ऐकले होते आणि आमचे आध्यात्मिक मार्गदर्शक मनोहर सरांनी याबद्दल सांगितले. ‘गुरुचरित्रा’त अमरेश्‍वर मंदिराचा उल्लेख आहे, नृसिंहसरस्वतींचे तेथे स्थान आहे. आम्ही मंदिरात दर्शन घेतले. मंदिरात चौसष्ट योगिनींच्या मूर्ती आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वतींचे वास्तव्य तेथे होते असे समजले. अमरेश्‍वराचा शांत परिसर, समोरून वाहणारी कृष्णाबाई यामुळे मन अंतर्मुख होत होते. थोडा वेळ थांबून पुन्हा नृसिंहवाडीत आलो.

एव्हाना बारा वाजायला आले होते. आतापर्यंत भुकेची जाणीव झाली नव्हती.
आता पोटपूजेसाठी कुठेतरी जायला हवे होते. आमचे वाहन-चालक रमेश पासलकर यांच्या लक्षात आले, की पूर्वी ते तेथील एका खाणावळीत जेवले होते. आम्ही उतरलेल्या लॉजपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याने पायीच निघालो. खाणावळीत गेलो. ताटात मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, भाजी आदी पदार्थही वाढले जात होते. वाट्यातून आमटी व एका वाटीत बासुंदी वाढली. दोन-तीन मावश्‍या वाढप करीत होत्या. एकीने साधा भात पानात वाढला. दुसऱ्या मावशी वरण वाढत होत्या. माझी समजूत ते वरण तुरडाळीचे असावे. मी नको म्हटले. तब्ब्येतीसाठी खात नाही. त्यावर मावशी म्हणाल्या, की मुगाचे वरण आहे. गरम वरण-भात मनापासून खाल्ला. खाणावळीचे मालक देखरेख करीत होते. आम्ही पोळी-भाजीबरोबर खात होतो. तेवढ्यात सोमण आमच्या टेबलसमोर येऊन म्हणाले, की पोळी बासुंदीबरोबर खा म्हणजे चांगली लागेल. खरीच चवीची, कृष्णाकाठची बासुंदी आहे. त्यावर तशा चवीने आम्ही जेवलो. जेवण होत आले, साधा भात वाढायला मावशी आल्या. आम्ही नको म्हटले, त्यावर त्या मावशी म्हणाल्या, मागचा ताक-भात घ्यायचा असतो. पोटात शांत वाटते. त्यांच्या शब्दाखातर ताक-भात खाल्ला. अन्नाला आपुलकीचा स्वाद होता. हॉटेल खानावळीसारख्या ठिकाणी अपवादात्मक अगत्य, आपुलकी अनुभवायला मिळाली. 

आजकाल लग्नकार्यातल्या पंगतीत वाढप असते. पण, जेवणाऱ्या अतिथीला अगत्याने वाढणे दुर्मिळ. अगदी लहानपणी आईने सांगितले होते, अन्न देणाऱ्यात भगवंत, शेतकरी, घरचा कर्ता - यजमान (आता स्त्रीही अर्थार्जन करते म्हणून तीही) अन्न रांधणारी, वाढणारी घरातील स्त्री, गृहिणी, यांना ही कृतज्ञता असते. जेवण होताच त्या मावशींना जेवण छान असल्याचे सांगितले. 

भोजनालयातून बाहेर पडताना मला नाशिकच्या लॉजमध्ये भेटलेल्या वेटर रामधनची मनात आठवण झाली. लग्नानिमित्त नाशिकला गेलो होतो. लॉजवर आल्यानंतर दिवे गेले. लिफ्ट चालेना. तीन मजले चढणे-उतरणे अवघड वाटले म्हणून खोलीवरच आम्हा दोघांसाठी इडली-चटणी मागवली. इडली व चटणीच्या दोन वाट्या घेऊन वेटर आला. माझे यजमान म्हणाले, की एकच चटणीची वाटी पुरेशी आहे, यावर तो वेटर आमच्यासमोर जमिनीवर बसला आणि म्हणाला - ‘काहे वापस लेंगे. आरामसे आपभी खाओ, दादी भी खा लेंगी.’ त्याचे कौतुक वाटले. आम्हाला त्याच्या शब्दांत आपुलकी जाणवली. कोणतीही गोष्ट देताना त्यामागे देणाऱ्याची आपुलकीची, अगत्याची भावना असेल, तर घेणाऱ्यालाही समाधान वाटते, त्याचा स्वाद वेगळाच असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com