जुने कशाला हवे? गा नवे! (मुक्‍तपीठ)

जुने कशाला हवे? गा नवे! (मुक्‍तपीठ)

बदलत्या काळात लोक रीत बदलली. पण आपली लोकगीते जुनीच राहिली. माहेरचा गोडवा सासरीही मिळायला लागला. जुने द्वाड सासर आता उरले नाही. मग भोंडल्याची गाणीही बदलायला हवीतच ना!

का  कोणास ठावूक, पण सासरच्या लोकांचे कौतुक करणारी गाणी नवरात्रातल्या भोंडल्यांमधून ऐकायला मिळत नाहीत. सासर म्हणजे वाईटच, असाच समज अगदी लहानपणापासून मुलींच्या मनांत घर करून देताना आढळून येत असे. काही प्रमाणात अगदी आजच्या जमान्यातसुद्धा! ‘अक्कण माती चिक्कण माती’ सारख्या भोंडल्याच्या गाण्यामधूनही, सासरहून माहेरी अत्यंत निगुतीने करून, पालखीतून, शेला झाकून करंज्या पाठवूनही माहेरचाच गोडवा ‘अस्सं माहेर गोड बाई खेळाया मिळतं’ म्हणून गायला जाई. एवढा करंज्याचा व्याप करूनही ‘अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं’ असे ऐकवले जाई. यासारखी वाक्‍ये मुलींच्या कानावर वर्षानुवर्षे पडत आलीत. अगदी एखादा अनमोल वारसा जपावा, तशी ती वाक्‍ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अलगदपणे नकळत सुपूर्द होताना दिसून येतात.

खरे तर लग्न झाल्यानंतर सोनपावलांनी घरी येते ती सून. या सुनेच्या रूपात घरात चैतन्य नांदते. त्या उत्साहातून घराला नवे रूप प्राप्त होते. मुलाबरोबरच्या तिच्या सहवासाने संपूर्ण नव्या-जुन्या संसाराला नवे वळण लाभते. अशी ही सून बघता बघता सासरच्या मंडळींबरोबर घरामध्ये दुधात साखर मिसळून जावी तशी कशी केव्हा मिसळून जाते हे तिलाही कळत नाही आणि काळाने एका नव्या दिवशी तीही पुढच्या पिढीच्या सासूंच्या रांगेत प्रवेश करते.

सध्याच्या जमान्यात बहुतेक सासरची मंडळी ही सुनेला त्रास देणारी नाहीत. उलट तिच्या कलाकलाने, तिला समजून घेऊन तिला परकेपण जाणवणार नाही अशा प्रकारे घरातील वातावरण ठेऊन, तिच्याकडून घरात आल्याआल्याच अपेक्षाचे ओझे न लादणारी, तसेच अनेक प्रकारे सहकार्य करणारी दिसून येतात. माहेरीही जेवढे स्वातंत्र्य उपभोगता येत नव्हते, त्यापेक्षाही जास्त स्वातंत्र्य आणि लाडही जास्त प्रमाणात पुरवले जात आहेत. रागाचा खटका कुठे उडत नसेल असे नाही. पण सुनांना समजून घेऊन प्रेमाने वागणारी सासर मंडळीची संख्या जोराने वाढतेय. 
आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या या सुनांच्या कष्टांची जाणीव सासरच्या मंडळींना नक्कीच आहे. नोकरी-घर सांभाळण्याची कसरत करताना त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी सासरची मंडळी नक्कीच सातत्याने मदतीचा हात पुढे करताना दिसून येतात. विशेषतः पूर्वीच्या सासवांना जो मिळाला नाही तो स्वातंत्र्याचा मान जाणीवपूर्वक अबाधितपणे राखला जाताना दिसतोय. अनेक सासरची मंडळी सुनांच्या नोकरीसाठी-व्यवसायासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीसाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देताना दिसून येतात. यात नवरेही कुठे मागे नाहीत. एखाद्या मोठ्या अभिमानास्पद पदावर काम करणाऱ्या सुनांना घरातही एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे मान दिला जातो हे दिसून येते. हळूहळू मुरलेल्या एखाद्या गोड पदार्थाप्रमाणे या मुली सासरी मुरून जाताना दिसून येतात. अनेक मुलींना माहेरी फार दिवस राहावतही नाही. त्यांना सासरचाच ओढा वाटतो. घरातील सोवळे-ओवळे, चालीरीती, परंपरा, सणवार यासारख्या कर्मकांडाचा दुराग्रहही त्यांना सासरची मंडळी करत नाहीत. कारण नोकरी, व्यवसाय यामुळे वेळेच्या कमतरतेची जाणीव बहुसंख्य सासरच्या मंडळींना असते. 

पूर्वीच्या काळातील टिपिकल सुनेने फक्त उणेदुणे काढणारी सासू-सासरे, नणंद, दीर, जावा काळाच्या पडद्याआड जाताना दिसून येत आहेत. बहुतेक घरातून ‘सासूबाई’ हा शब्ददेखील लोप पावला आहे. ‘सासू’ या शब्दप्रयोगाची जागा ‘आई’ने घेतलेली दिसते. अगदी प्रेमाचे व मैत्रीचे, तसेच तणावरहित संबंध बहुतेक ठिकाणी या नात्यांमधून दिसून येत आहेत. बहुतेक घरांमध्ये भावनिक व आर्थिक, तसेच पेहेरावासंबंधातील स्वतंत्रपण जपले जाताना दिसून येते. एक समंजसपणाचे नाते नव्या नवरीस सासरी मिळते असे म्हटले, तर अतिशयोक्ती व्हायला नको. खरेतर उगीचच नात्यामधील संवाद हरवत चालला आहे, असा कांगावा केला जातो. पण सत्य परिस्थिती अशी आहे, की सभोवतालचे जग झपाट्याने बदलत असल्याची जाणीव ठेऊन, बदलत्या परिस्थितीला अनुसरून मोठ्यांनीही स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मग ते घरातील वागणुकीसंदर्भातील असोत किंवा फोन, स्मार्ट-फोन, ई-मेल, वेगवेगळी मशीन्स वापरणे यामधील असोत.
त्यामुळे माहेरच्या मोठेपणास त्याच्या ठिकाणी अबाधित मानून त्यांना म्हणावेसे वाटते, भोंडल्याच्या गाण्यामधील सासरचा उल्लेख आता मानाने व्हायला हवा. भोंडल्याची गाणी आता नव्याने लिहायला हवीत. 
‘अस्सं सासर सुरेख बाई, सूनबाईला प्रेमानेच सांभाळतं...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com