पम्मा, आय मिस यू

नीलम सांगलीकर
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

पम्मा, धाकटी बहीण. वैद्यकीयदृष्ट्या दिव्यांग; पण किती समज होती तिला. किती प्रेम करायची ती माझ्यावर. लहान मुलासारखी. निरागस. या एकाकी आयुष्यात तिची आठवण दाटून येते.

पम्मा, धाकटी बहीण. वैद्यकीयदृष्ट्या दिव्यांग; पण किती समज होती तिला. किती प्रेम करायची ती माझ्यावर. लहान मुलासारखी. निरागस. या एकाकी आयुष्यात तिची आठवण दाटून येते.

धाकट्या बहिणीचे निर्व्याज, निरपेक्ष, निर्मळ प्रेम मी अनुभवले.
पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात माझी आई गेली. त्यानंतर सात वर्षांनी वडिलांचेही आम्हाला शवच दिसले. आम्हा सहा भावंडांवर आभाळच कोसळले. एका नातेवाईकाने आम्हाला मुंबईस नेले. पुढे प्रत्येक जण स्वतंत्रपणे धडपडत पुण्यात जगलो. भावंडांत मी थोरली म्हणून शशिकला ऊर्फ पम्माची जबाबदारी माझ्यावर आली. आई-वडील हयात असतानाच पम्माची मानसिक चाचणी केली. ती "मेंटली रिटार्डेड' असल्याचे निदान झाले होते. तिचे शिक्षण जेमतेम दुसरी इयत्तेपर्यंत. रंगरूपाने ती गोरी, नाजूक, देखणी. आवाज आणि बोलण्यात माधुर्य; पण या सगळ्याचा तिला काहीच उपयोग नव्हता. देहाने वाढली, तरी मनाने लहानच राहिलेली. त्यामुळे ती कुणाच्याही घरी जाई आणि कुणालाही परस्पर निमंत्रण देई. पशु-पक्ष्यांपासून सर्वांवर ती प्रेम करी. माझ्यावर संपूर्ण विश्‍वास टाकून ती निर्धास्त जगली.

आघारकर संस्थेत माझी नोकरी म्हणून तिला झेपेल इतके घरकाम शिकवले. स्वयंपाकाची तयारी इतकी छान करायची की, मला फक्त गॅसवर पटापट अन्न शिजवण्याचे काम असे. काही महिने आम्ही एक स्वयंपाकीण दर रविवारसाठी नेमली. त्या बाई दुचाकीवरून येत. नेहमीप्रमाणे पम्मा सगळी तयारी ओट्यावर करून ठेवत असे. शिवाय, एकत्र जेवण्याचा आग्रह धरत असे. आयते, साधे जेवण तिघी आनंदात जेवत असू.

इतक्‍या वर्षांच्या सहवासात दोघींचे छान जमले, जणू एकमेकींचे आधार बनलो. एकदा सहज तिला सांगून ठेवले, ""पम्मा, जर माझी छत्री घरी राहिली, तर संध्याकाळी गेटपाशी थांब.'' ही सूचना मी पार विसरून गेले. एकदा मलाच ऑफिसमधून घरी पोचायला उशीर झाला, तर ती चक्क छत्री घेऊन मला शोधायला बाहेर पडली. मला अगदी गहिवरून आले. ही बाब छोटी असली तरीही त्यातून तिचे निर्व्याज प्रेम दिसले.
एकदा फर्ग्युसन रस्त्यावर मला अपघात झाला. डाव्या हाताला फ्रॅक्‍चर झाले, म्हणून एकाच ठिकाणी तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दीनदयाळ रुग्णालयात पम्माच माझ्या सोबतीला. माझे बहीण-भाऊ भेटायला येतील, म्हणून त्यांना शोधायला वॉर्डाच्या बाहेर जायची. ती वार्ड चुकली की, कोणीतरी माझ्या कॉटपाशी आणून तिला सोडत. त्यामुळे माझी चिडचिड होई. हा ताण सोडला तर तिने आईच्या मायेने माझी सेवा केली. त्या काळी "आमचे पुढे कसे होईल?' अशी चिंता कधी मनातही आले नाही. हाताला कॅलिपर असल्यामुळे हात मागे जात नव्हता. अशावेळी अडीच वर्षे न कंटाळता पम्माने माझी वेणी घातली.

एका वर्षी धाकटा भाऊ प्रदीप अचानक भेटला. त्याला दुसऱ्या फ्लॅटची किल्ली दिली. दिवसा आमच्याकडे यायचा आणि रात्री साईनगरला जायचा. पम्मा त्याला चहा, नाश्‍ता दोन्ही वेळचे जेवण द्यायची. प्रदीप वारजे माळवाडीहून सहा आसनीने न येता चालतच येई, त्यामुळे भुकेला होऊन सगळे अन्न संपवायचा. मग पम्मा दिवसभर पाणी, चहा-बिस्किट घेऊन वेळ मारून नेई. हे मला खूप महिन्यांनी समजले. एके रात्री जेवताना माझ्या ही बाब लक्षात आली. मला खूप वाईट वाटले. तेव्हापासून भरपूर स्वयंपाक करून ठेवू लागले.

दोघींच्या आयुष्यातील 2007 ते 2009 ही दोन वर्षे सर्वांत वाईट गेली. आम्ही राहत होतो, त्या इमारतीची पुनर्बांधणी होत होती. त्या काळात आम्ही अक्षरशः विस्थापितांचे आयुष्य जगलो. त्यातच शरीराची तक्रार सुरू. मोतीबिंदूसाठी पम्माच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया ठराविक अंतराने झाली. लगेच तिला कावीळ झाली. त्याआधी हात मुरगळला, गळ्याचा टीबी आढळला. ही दुखणी काढली. आम्ही दोघीच एकमेकींना सांभाळत होतो; पण आता ती डायलेसिस सहन करू शकत नव्हती. दोन वर्षे विविध आजारांशी झुंजल्यानंतर एके दुपारी मला कायमची सोडून गेली. नियतीने तिला योग्य वेळी माझ्या आधी सोडवले खरे; परंतु मी मात्र पार कोलमडले. त्याच वर्षी निवृत्त झाले. आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. अशा वेळी निस्वार्थ प्रेमाची प्रचिती तिच्या आठवणीतून झाली. मला जगण्याची नवीन ऊर्मी, मार्ग सापडला.
पुण्यातील स्वमदत गट, एकाकी ज्येष्ठांसाठी "आनंदयात्रा'ची सभासद झाले. नवीन ओळखी झाल्या. पुण्याजवळील सहली, भारतात काही राज्यांत सहलीला जाऊन मी खूप सावरले. दर रविवारी वेळ चांगला जाऊ लागला. हताश, निराश मनाला उभारी मिळाली. घराजवळच्या "आनंदसखीं'चीही खूप मदत झाली. पैसा लागतोच; परंतु आसपास माणसे असली, की सर्व संकटांवर सहज मात करू शकतो.

आता पम्माला जाऊन आठ वर्षे लोटली. दिवस गडबडीत जातो; पण सायंकाळनंतर पम्माची आठवण येतेच. मग "पम्मा, आय मिस यू' म्हणत एकटीच रडत बसते.