हेही एक नातेच!

निर्मला दाते, पुणे
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

वेळ मध्यरात्रीची. सगळीकडे सामसूम झालेली. त्या शांततेला छेद देणारा "फट्‌' असा आवाज एकापाठोपाठ येऊ लागला. शांतता भंगली. खिडकीतून डोकावले तर विजेच्या खांबाजवळून ठिणग्या उडताना दिसू लागल्या...

वेळ मध्यरात्रीची. सगळीकडे सामसूम झालेली. त्या शांततेला छेद देणारा "फट्‌' असा आवाज एकापाठोपाठ येऊ लागला. शांतता भंगली. खिडकीतून डोकावले तर विजेच्या खांबाजवळून ठिणग्या उडताना दिसू लागल्या...

मी नव्या पेठेत राहते. घराच्या समोर बाग आणि बागेच्या कुंपणाला लागून महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाची तांबडी वितरण पेटी (डिस्ट्रीब्युशन बॉक्‍स) आहे. उजव्या, डाव्या आणि मागील बाजूस धामणकर, जाधव, जोशी आणि जोगळेकर अशा कुटुंबीयांचे बंगले आहेत. समोरच्या बाजूस सदनिकांच्या उंच इमारती आहेत. सांगायचे कारण, आसपासची बरीचशी मंडळी वर्षांनुवर्षे इथे राहात असल्यामुळे एकमेकांच्या चांगली परिचयाची आहेत. काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एकच्या सुमारास कसल्याशा आवाजाने मला जाग आली. स्कूटरला किक्‌ मारल्यासारखा आवाज आला. त्यानंतर लगोलग फट्‌ असा आवाज आला. वाढत्या सेकंदागणिक आवाजाची तीव्रता वाढतच गेली. तो आवाज फटाक्‍यांचा निश्‍चित नव्हता. गोळीबार किंवा स्फोटाचा आवाज मी फक्त सिनेमातच ऐकलाय; पण तरी ते आवाज तसेही नव्हते. त्यामुळे मनात शंकांचे काहूर माजले. न राहवून मग समोरची खिडकी उघडून पाहिले तर समोरच्या लाल रंगाच्या वीज वितरण पेटीतून ठिणग्या उडत होत्या.

काही तरी वेगळे घडतंय असं मला वाटू लागल्याने मी त्वरेने डाव्या बाजूची खिडकी उघडून बघितलं तर जोशी पती-पत्नी गॅलरीतच उभे होते. जाधव आणि जोगळेकर कुटुंबीयदेखील बाहेर रस्त्यावर आले होते. एव्हाना वितरण पेटीतील वायरनी पेट घेतला होता. माझे घर आणि आग यात खूप थोडे अंतर होते. शिवाय या दोन्हींच्या मध्ये लाकूड किंवा पाचोळा असे काहीही नव्हते. तरी आग ती आगच. ""काकू, मागल्या दाराने बाहेर या'', सगळे मला रस्त्यावरून ओरडून सांगू लागले. हळूहळू तो आवाज वाढू लागला. मी धडपडतच कुलूप, किल्ली हातात घेतली. स्वेटर, चपला शोधल्या. अंधार गुडूप होता. अंदाज घेतच मागले दार उघडले तर दारात गौरी आणि ऋचा जाधव टॉर्च घेऊन मला न्यायला आल्या होत्या. त्यांच्या मदतीने दाराला कुलूप लावून रस्त्यावर गेले. एव्हाना आगीने चांगलाच पेट घेतला होता. परिणामी, गोंधळ वाढू लागला होता.

त्या गोंधळातच ज्याला जसे उमगेल तसे काही करता येईल का, याचा विचार प्रत्येक जण करत होता. रस्त्यावरच उभे राहून सगळे फोनाफोनी करत होते. 100 नंबर बराच वेळ लागत नव्हता. शेवटी कोणाचातरी 101 नंबर लागला. दरम्यान, अनिरुद्ध जोगळेकर सेनादत्त पोलिस चौकीकडे गेला होता. अग्निशामक दलाची चौकी - ऑफिस राजा मंत्री उद्यानाजवळच आहे. त्यांची गाडी पंधरा मिनिटांतच आली. पाठोपाठ पोलिस आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची (एमएसईबी) गाडीही आली. आग विझवण्याच्या कामाला झपाट्याने सुरवात झाली. कर्मचारी वाळू घमेल्यात भरून भराभर आगीवर फेकत होते. उपाययोजनांचा वेग चांगला असल्याने आग लवकरच आटोक्‍यात आली. पेटीतील वायरचे जाळे आणि त्यांची वेटोळी जळून खाक झाली होती; पण आग विझल्याने सर्वांना हुश्‍श झाले.

आग कशी विझवली गेली यावर थोडा वेळ आपसात चर्चा सुरू राहिली. नंतर एकेक जण घरी जाऊन झोपायच्या तयारीला लागला. मीदेखील घरी जायला निघाले, तर मंजुश्री, अपर्णा, भाग्यश्री सगळ्याच म्हणू लागल्या, ""काकू, तुम्ही आज घरात झोपू नका. आमच्याकडे चला.'' ""काही होत नाही गं. आता तर आग विझलीये,'' असं मी म्हणाले. त्यावर, ""नको तुमच्या काळजीने आम्हाला झोप लागणार नाही'', त्यांच्या या वाक्‍याने मी हेलावून गेले. कोणीतरी आपली काळजी करत आहे, ही भावना सुखावणारी असते. त्या रात्री मग मी शेजारच्या घरातच झोपले.

अनेक वर्षे एकाच परिसरात आसपास राहिल्याने शेजारपाजारची मंडळी, त्यांची कुटुंबे, एवढेच काय एकमेकांचे नातेवाईकदेखील ओळखीचे होतात. अधूनमधून जाता-येता भेट होते. बोलणे-चालणे झाल्याने एकमेकांचे स्वभाव आणि बऱ्या-वाईट सवयी माहितीच्या होतात. स्नेहबंध निर्माण होतात. हे धागे फार चिवट असतात. रक्ताची नाती प्रत्येकाला महत्त्वाची असतातच. इतरही नातेवाईक असतात. त्याचप्रमाणे शेजारी हेही स्नेहबंधाने जोडलेले एक नातेच आहे, असे वाटते. रोज गाठभेट झाली नाही तरी ही मंडळी अपघात, दुर्घटना, आजारपण यांसारख्या प्रसंगी धावून येतात. माणुसकीच्या नात्याने हातचे राखून न ठेवता मदत करतात. धीर देतात. मनाला त्यातून उभारी येते. कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी आत्मिक बळ निर्माण होते. या घटनेनंतर शेजारी हेही एक भावनिक नाते आहे, हे प्रत्ययास आले.

Web Title: nirmala date write in muktapeeth