बाप नावाचे विद्यापीठ

प्रकाश रोकडे
मंगळवार, 25 जुलै 2017

घरात आर्थिकदृष्ट्या गरिबी होती; पण आई-वडिलांकडे मनाची श्रीमंती होती. पोटात भूक असायची; पण त्याहीपेक्षा शिक्षणाची भूक महत्त्वाची, हेच त्या दोघांनी शिकविले.

घरात आर्थिकदृष्ट्या गरिबी होती; पण आई-वडिलांकडे मनाची श्रीमंती होती. पोटात भूक असायची; पण त्याहीपेक्षा शिक्षणाची भूक महत्त्वाची, हेच त्या दोघांनी शिकविले.

पोरगं शिकायला पाहिजे म्हणून वडिलांनी मला पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या अशोक विद्यालयामध्ये पाठवले होते. याच संस्थेच्या बाल विकास वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेत होतो. मॅट्रिकला होतो. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. परीक्षा फी भरण्यास पैसे हवे होते. माझ्याकडे पैसे नसायचेच. वडिलांना निरोप पाठविला. महिनाअखेर असल्याने अर्थातच त्यांच्याकडेही पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी आसपास प्रयत्न केले; पण पैशाची व्यवस्था होत नव्हती. अन्य पर्याय काहीही नव्हता. माझ्या उभ्या आयुष्याचा प्रश्‍न होता. वडिलांनी चक्क आईचा विरोध केला. तिला पसंत नसतानाही, तिची किती मोठी अडचण होईल, याची फिकीर न करता घरातील एकुलता एक स्टोव्ह अक्षरशः तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि खडकी येथील एका सावकाराकडे गहाण ठेवून वीस रुपयांची रक्कम घेऊन त्यांनी थेट पुणे गाठले. माझ्या परीक्षेच्या फीचा विषय संपवला. माझ्या परीक्षेची फी भरण्यासाठी त्यानी केलेली ही धडपड आणि पुढे काही महिने चूल फुंकून स्वयंपाक करणारी माझी आई, मला कशी बरे विसरता येईल?

मला चालता, बोलता, उभा राहता केला माझ्या बाप नावाच्या विद्यापीठाने. अशिक्षित वडिलांनी मला शिकवण्याचा ध्यास घेतला होता. माझ्या आईनेही त्यांना यासाठी मनापासून साथ दिली. अत्यंत निष्ठा, निर्धार आणि त्याग या तीन गोष्टी त्या दोघांनीही जपल्या आणि माझ्यावर तेच संस्कार केले. माझे नाव त्यांनी प्रकाश ठेवलेच; पण त्या दोघांच्या अथक परिश्रमामुळेच माझे आयुष्यही खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाले. त्यांचा त्याग, उत्कट प्रेम, त्यांचे जीवनच माझ्यासाठी आयुष्यभर दीपस्तंभासारखे आहे.

मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर मी माझ्या चिखली या गावी परत गेलो. घरी राहून चिंचवड येथील संघवी-केसरी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. लहानपणापासून अगदी 1977 मध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला लागेपर्यंत भुकेने माझी अजिबात साथ सोडली नव्हती. अगदी पिच्छाच पुरवला होता. मी सायकलने कॉलेजात जात होतो. कारण शिक्षणाचा निर्धार केलेला असल्याने संघर्षाशिवाय पर्याय नव्हता. नीटनेटके सोडाच, बऱ्यापैकी कपडेही अंगावर नसायचे. स्वच्छ धुतलेले असायचे इतकेच. सायकलही जुनीच. तिला फक्त सायकल म्हणावे इतकी जुनाट. एकदा या सायकलने दगा दिला. वाटेत पंक्‍चर झाली. पंक्‍चर काढण्यासाठी, थिगळ देण्यासाठी ट्यूबवर अजिबात जागा शिल्लक नव्हती. टायर जुनाच झाल्याने त्यामध्येही भरपूर गेटर्स होते. त्यामुळे ट्यूब आणि टायर बदलले पाहिजेत, असे सायकल कारागिराने सांगितले होते; पण त्यासाठी पैसे नव्हते. सायकल नसल्याने जवळपास सहा किलोमीटरची पायपीट करून दररोज कॉलेजला जाऊ लागलो. मीही कठीण वाट तुडवितच होतो. कॉलेजची आणि आयुष्याचीसुद्धा. दहा-बारा दिवस गेले. सकाळी केवळ बिनदुधाचा चहा पिऊन कॉलेजला गेलो होतो. दुपारी तेवढीच पायपीट करून घर गाठले. सोबतीला भूक होतीच. घरात काही नव्हतेच. त्यामुळे कोणाला काही सांगण्याची परिस्थिती नव्हती. सांगणार तरी काय? घरात गेलो, तांब्याभर पाणी घेऊन ढसाढसा प्यालो आणि मटकन खाली बसलो. आई हे सर्व पाहात होती, ती माझ्याजवळ येऊन बसली. माझ्या डोक्‍यावरून मायेने हात फिरविला आणि आत्यंतिक प्रेमाने म्हणाली, ""परकासा, भूक लागलीय का रे?'' मी अक्षरशः कळवळून म्हणालो, ""होय आई.''
आईच्या डोळ्यांत अश्रूही होते आणि वात्सल्यही. त्याहीप्रसंगी मला ते जाणवले. आई म्हणाली, ""मला रस्त्यावरच्या मजुरीच्या कामाचे (म्हणजे रोजगार हमी योजनेतील दुष्काळी कामाचे) पैसे आजच मिळालेत. ते घे आणि तुझी सायकल दुरुस्त करून आण.'' तिने तिच्या तिजोरीतून म्हणजे कंबरेला लटकवलेल्या कापडी पिशवीतून पन्नास रुपयांची नोट काढून माझ्या हाती दिली. किती प्रचंड आनंद झाला. अगदी एक लाखाची लॉटरी लागल्यासारखा. पुन्हा उठलो. घोटभर पाणी प्यालो, सायकल घेतली आणि दुकान गाठले. दुकानदाराला टायर आणि ट्यूब बसविण्यास सांगितले आणि तात्काळ शेजारचे हॉटेल गाठले. एक भेळ सांगितली आणि त्याबरोबर पाव किलो गरमागरम जिलबीही. अतिशय तृप्त झालो. दुरुस्त झालेली सायकल घेतली आणि गावभर गरगर चक्कर मारली. मग मात्र नेहमीप्रमाणे सायकलनेच इंद्रायणी नदीच्या काठी माझ्या नेहमीच्या एकांत ठिकाणी जाऊन शांतपणे बसलो, एकटक पाहात नदीच्या विशाल पात्रामधील नितळ, शांत आणि निर्मळ पाण्याकडे. मनात विचार होते, आई-वडील, त्यांची जिद्द, धाडस, वात्सल्य आणि त्याग ही विविध रूपे आणि विविध भूमिका.

आजही आठवतो आहे, आजही जपतो आहे त्यांच्या अविस्मरणीय प्रसंगांना अगदी काळजात घेऊन.